Next
‘जीवनगाथा’ प्रबोधनकारांची..
मानसी मगरे
Monday, February 12 | 06:06 PM
15 0 0
Share this story

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे विसाव्या शतकामधील महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक कर्तृत्ववान आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आयुष्याची संघर्षगाथा कथन करणारे ‘माझी जीवनगाथा’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
........
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे विसाव्या शतकामधील महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक कर्तृत्ववान आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व. छायाचित्रकार, वादविवादपटू, तैलचित्रकार, शिक्षक, संपादक, नाटककार, समाजसुधारक, टंकलेखक, वक्ते, नेते, लेखक अशा विविध भूमिका वठवताना त्यांनी जीवनाच्या अनेक छटा पहिल्या. संघर्षाचे अनेक प्रसंग अनुभवले. येणाऱ्या प्रत्येक संकटाला नेटाने तोंडही दिले. त्यांच्या आयुष्याची संघर्षगाथा कथन करणारे ‘माझी जीवनगाथा’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. 

आयुष्यातील प्रसंगांच्या आठवणींना एकत्रित गुंफून त्यांना त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना हे आत्मचरित्र लिहिण्याची इच्छा झाली हेही खरे तर विशेष आहे. त्यांच्या भोवतीची परिस्थिती, बाह्य घटना यांचा त्यांच्या आयुष्यावर जास्त प्रभाव होता, असे एकंदरीत त्यांच्या लिखाणातून दिसून येते. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग आणि त्यांनी त्या प्रसंगांना धीराने दिलेले तोंड यावरून आयुष्यातली कोणतीही भूमिका प्रबोधनकारांनी अशीच जाऊ दिली नाही, ती ठामपणे वठवली असेच दिसते.  

आयुष्याच्या रंगभूमीवरील कोणतीही भूमिका साकारताना तिला पूर्ण न्याय देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. इतकेच नाही, तर आपला जीवनप्रवास कथन करताना त्यांनी त्या त्या प्रसंगांनुसार निगडित असलेल्या व्यक्तींचाही उघडपणाने उल्लेख केला आहे. प्रसंग कोणताही असो, तो अगदी जसाच्या तसा आणि खुलेपणाने मांडला आहे, असे लक्षात येते. 

महात्मा फुले यांनी केलेल्या बहुमोल कार्याचा प्रबोधनकारांवर खूप प्रभाव होता. समाजव्यवस्थेचे समग्र परिवर्तन आणि संपूर्ण शुद्धीकरण हे त्यांच्या कार्याचे ध्येय होते. त्यानुसार त्यांच्या सत्यशोधक आंदोलनाची संहिता त्यांनी तयार केली होती. त्यांची सत्यशोधक चळवळ त्यांच्या हयातीत महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचू शकली नाही. महात्मा फुले यांच्या निधनानंतर म्हणजेच १८९०नंतर साधारण दोन दशकांनी फुले यांच्या सत्यशोधक आंदोलनाला गती देण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी स्वीकारली. त्यांच्या या प्रसाराच्या कार्यात ज्या कार्यकर्त्यांनी धडाडीने सहभाग घेतला, त्या कार्यकर्त्यांमध्ये प्रबोधनकार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 

प्रबोधनकार सत्यशोधक चळवळीचे कार्य करत असताना महाराष्ट्रातील तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांबाबत सतत अनेक घडामोडी घडत होत्या. या सगळ्या स्थित्यंतरांची रसभरीत वर्णने त्यांनी या आत्मचरित्रातून केली आहेत. हे प्रसंग वाचताना ते जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात. या सगळ्या लिखाणावरून त्या वेळच्या सामाजिक जीवनाचे प्रबोधनकार कसे सच्चे साक्षीदार आहेत, याची कल्पना येते. त्यांनी वर्णन केलेल्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत किती मोठा फरक आहे, किती बदल आहे, हेदेखील लक्षात येते. स्त्रियांनी नाटकांत काम करणे, रस्त्यावरून पायात जोडा किंवा चप्पल घालून चालणे हे रुचणारे नव्हते. त्यासाठी स्त्रियांना बोल लावला जायचा. पुण्यात टिळकांनी गणपती हे दैवत चव्हाट्यावर आणले म्हणूनच ‘प्लेग’ची साथ पसरली, घरात लग्नानंतर काही विपरीत घडले, तर त्यात ती स्त्री पांढऱ्या पायांची, बालविवाह न करता एखाद्या स्त्री ने जरठ-कुमारी विवाह केला तर तेही अशुभच... अशा काही समजुती, अंधश्रद्धा त्या काळात होत्या. यांचेदेखील हुबेहूब वर्णन या चरित्रात दिसते. 

वकील होण्याचे स्वप्न प्रबोधनकार उराशी बाळगून होते. शिक्षणासाठी त्यांना खूप खस्ता खाव्या लागल्या. दहावीच्या परीक्षेसाठी केवळ दीड रुपया शुल्क कमी पडल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नव्हते. पुढेही ते जमले नाहीच. परंतु महत्त्वाकांक्षी प्रबोधनकारांनी आपल्या स्वाध्यायाच्या बळावर जे ज्ञान संपादन केले, ते विश्वविद्यालयाची डॉक्टरेट संपादन केलेल्या एखाद्या पंडितापेक्षाही अफाट होते, याची कल्पना त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल वाचल्यावर येते. 

लोकहितवादी यांना प्रबोधनकारांनी परात्पर गुरू मानले होते. पहिला गुरुपदाचा मान त्यांनी ‘केरळ कोकीळ’कार कृष्णाजी नारायण आठल्ये यांना दिला आहे. प्रबोधनकारांनी लहान-मोठे असे सुमारे २५ ग्रंथ लिहिले आहेत. या जीवनगाथेत त्यांनी आपल्या कौटुंबिक, सांसारिक, गृह-प्रपंच अशा गोष्टींवर फार भर दिलेला दिसत नाही. वयाच्या अगदी ८८व्या वर्षीही ते फारसे त्रासिक किंवा असमाधानी दिसत नाहीत. विजिगिषू पुत्रांचे वाढते वैभव, कर्तृत्व आणि नेतृत्व हेही त्यांच्या समाधानी आयुष्याचे महत्त्वाचे कारण होते, असे त्यांच्या लेखनातून समजते. त्यांची ही जीवनगाथा म्हणजे मराठी साहित्यात एक मौलिक भरच आहे.

पुस्तक : माझी जीवनगाथा 
प्रकाशक : नवता प्रकाशन 
पृष्ठे : ५११ 
मूल्य : ४०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link