Next
महिला कर्मचारी घेण्याकडे कंपन्यांचा वाढता कल
मोठ्या ब्रेकनंतरही महिलांना वरिष्ठ पदावर घेण्याची तयारी
BOI
Monday, June 10, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘मोठमोठ्या कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी घेण्यावर भर देण्यात येत असून, विवाह, बाळंतपण अशा कारणांमुळे दीर्घ कालावधीसाठी नोकरीत नसलेल्या महिला उमेदवारांनाही मध्यम आणि वरिष्ठ पदांवर पुन्हा रुजू करून घेण्याकडेही कंपन्यांचा कल वाढला आहे,’ अशी माहिती ‘स्टॉकरूम डॉट आयओ’ या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नरेन कृष्णा यांनी दिली.

नरेन कृष्णा
‘कंपनीला पुण्यात गेल्या वर्षी कंपन्या आणि महिला उमेदवार यांच्याकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे यंदाही पुण्यात ‘विमेन चेंजमेकर्स करिअर फेअर अँड कॉन्फ्लुएन्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आघाडीच्या कॉर्पोरेट संस्थांमधील बहुविध अशा नोकरीच्या संधींविषयी माहिती देण्यात आली. कंपन्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या महिला उमेदवार यांच्यासाठीचे हे व्यासपीठ असून, सहभागी कंपन्या उपस्थित उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड करतात. यंदा इन्फोसिस, डेल, क्रेडिट सुसी, सिमेंटेक, सिंजेंटा, यूबीएस झेडएस आदी दहा मोठ्या कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या असून, तीन हजार अर्जांमधून ८५० महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ४९८ महिला दीर्घ कालावधीनंतर पुन्हा नोकरीसाठी इच्छुक आहेत. यांतील ४३० ‍महिला बाळंतपणानंतर पुन्हा काम करण्यास उत्सुक आहेत,’ अशी माहिती देण्यात आली.

‘त्यापैकी १४० उमेदवार नुकतेच शिक्षण पूर्ण झालेले आहेत. ५७५ महिलांना तीन वर्षांपर्यंतचा अनुभव आहे. त्यामध्ये ४६ महिला उमेदवारांना १५ वर्षांहून अधिक अनुभव असून, वरिष्ठ पदावरील नोकरीसाठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे. पुण्यातील महिलांमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र सर्वाधिक पसंतीचे असून, ५० टक्क्यांहून अधिक सहभागी महिला या क्षेत्राशी निगडित आहेत. गेल्या वर्षी पाच कंपन्या आणि ७८० महिला उमेदवार या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या,’ असे नरेन कृष्णा यांनी नमूद केले.

महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या प्राधान्याची कारणमीमांसा करताना नरेन म्हणाले, ‘महिला कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी वाढली, तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) ७०० अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते, असा निष्कर्ष एका अभ्यास अहवालात नोंदवण्यात आला आहे. यावरून अर्थव्यवस्थेत महिला कर्मचाऱ्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे कंपन्या आता जास्तीत जास्त महिला कर्मचारी घेण्यावर भर देत आहेत. महिलांची आपल्या कामाप्रति असणारी निष्ठा हेदेखील सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. कोणत्याही कंपनीची कामगिरी सुधारण्यासाठी संमिश्र कर्मचारी वर्ग असणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आता कंपन्या आपल्या कर्मचारीवर्गामध्ये फक्त पुरुष न ठेवता महिला कर्मचारीही मोठ्या प्रमाणात असतील याकडे लक्ष देत आहेत.’ 

‘मॅकेन्झी, पीडब्ल्यूसी आदी संशोधन करणाऱ्या कंपन्यांचे अहवाल बघितले, तर त्यांनीही महिला कर्मचारी असलेल्या कंपन्यांची कामगिरी चांगली असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. विकेंद्रित कर्मचारीवर्ग असणे कंपन्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढवण्यावर कंपन्या भर देत आहेत. मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील पदांसाठी अनुभवी महिला उमेदवार निवडले जात आहेत. यामध्ये विवाह, बाळंतपण अशा कारणांमुळे दीर्घ काळ रजा घ्यावी लागत असेल, तर घरी बसून काम करण्याचा पर्याय दिला जात आहे. तसेच रजा संपल्यानंतरही नोकरीवरचा हक्क कायम ठेवला जात आहे. प्रदीर्घ काळ नोकरीपासून दूर असणाऱ्या अनुभवी उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षण देऊन पुन्हा मोठ्या पदाची जबाबदारी देण्यासाठी कंपन्या तयार आहेत. सध्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २८ टक्के असून, पुरुष कर्मचाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्के आहे. ही तफावत खूप मोठी आहे; मात्र ती कमी करण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. हे महिलावर्गासाठी एक उत्तम संधी आहे,’ असेही त्यांनी सांगितले. 

ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ‘डेब्यू २.०’ या चार आठवडे चालणाऱ्या विशेष इंटर्नशिप कार्यक्रमाचीही पुण्यात सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात उपस्थित महिलांना अनेक मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये लेखक, तसेच पॅराऑलिम्पिक विजेते हितेश आर., ‘इन्फोसिस’च्या एचआर विभागाच्या उपाध्यक्षा शर्मिष्ठा आध्य, ‘डेल’च्या वरिष्ठ संचालक विनिता गेरा, झेडएस असोसिएट्सच्या विद्यासागरी सुंदरम् यांचा समावेश होता. 

‘डेल टेक्नॉलॉजिज’च्या विनिता गेरा म्हणाल्या, ‘सर्व कर्मचाऱ्यांना संधी दिल्यामुळे क्रियाशील वातावरण निर्माण होते. त्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देणे शक्य होते, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी लिंगभेद न करता सर्वांना समान वागणूक देणे आवश्यक आहे.’ 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Gayatri Vagal About 131 Days ago
I am also interested if it is possible to I enroll please think about me.i was searching this kind of event. Thank you
0
0

Select Language
Share Link
 
Search