Next
‘सूर्यफुले’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
प्रेस रिलीज
Saturday, October 20 | 03:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : नामवंत कवी व प्राचार्य सूर्यकांत वैद्य यांच्या ‘सूर्यफुले’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन २१ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आपटे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि शंकर सारडा यांच्या उपस्थितीत साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ‘सूर्यफूले’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. या प्रसंगी वैद्य यांचे समकालीन आणि वर्गमित्र-थोर साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित राहणार आहेत.

१९६०नंतर उदयास आलेल्या मराठी कवींमधील एक नामवंत कवी म्हणून प्राचार्य वैद्य हे साहित्यक्षेत्रात ओळखले जातात. १९६२ ते ६४ या काळात ते नूतन मराठी विद्यालयाचे मराठीचे अध्यापक होते. नूमवीय-६४ला ते शिकवीत असत. विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याची गोडी लावणार्‍या प्राचार्य वैद्य यांच्या सहस्रचंद्रदर्शनप्रसंगी कवितांचा संग्रह गुरुदक्षिणा म्हणून देण्याचे त्यांच्या विद्यार्थ्यांनी योजिले आहे.

१९६४मध्ये राजकवी यशवंत यांच्या हस्ते वैद्य यांचा ‘मारवा’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९७२मध्ये कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या हस्ते ‘माझे जग’ आणि १९८२मध्ये डॉ. वि. म. कुलकर्णी यांच्या हस्ते ‘त्रिमिती’ असे एकूण तीन संग्रह प्रकाशित झाले आहेत. कवितेशिवाय कथा, किस्से, चरित्र, प्रवासवर्णन आदी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले. मराठी व्याकरण, भाषाविज्ञान या विषयांवरील त्यांची पुस्तके अनेक वर्षे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभ्यासली आहेत. महाविद्यालयीन जीवनात काव्यलेखनाला सुरुवात झाल्यानंतर त्याकाळी विविध माध्यमांतून ते प्रसिद्ध होत होते.

कविवर्य ग. दि. माडगूळकर, लोककवी मनमोहन, मंगेश पाडगावकर, राजकवी यशवंत, डॉ. वि. म. कुलकर्णी, डॉ. भा. दि. फडके, डॉ. यू. म. पठाण, डॉ. प्र. न. जोशी अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या काव्याचा गौरव केला असून, साहित्येतिहासानेही त्यांची नोंद घेतली आहे.

पुणे येथील प्रसिद्ध ‘नूमवि’ प्रशाला, स. प. महाविद्यालयात अध्यापक म्हणून काम केल्यानंतर वाई, शिरूर या ग्रामीण भागात नव्याने सुरू झालेल्या, तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील पेठ, आभोणा येथील महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्य म्हणून ४०हून अधिक वर्षे सेवा केली. नव्या महाविद्यालयांना नवी वास्तू, पदव्युत्तर अभ्यासकेंद्र उपलब्ध करून देणे, तालुका ग्रंथालयाचे नूतनीकरण, विस्तार ही कामे त्यांनी केली.

या बरोबरच विद्यापीठीय अभ्यासक्रमात मराठीवर होणार्‍या अन्यायाविरोधात मराठी अन्याय निवारण परिषद सदस्य, पुणे जिल्हा समिती-निमंत्रक या पदांवर राहून त्यांनी लढा दिला. ग्रामीण परिसरात साहित्य अभिरुची रुजावी म्हणून १९७०मध्ये शिरूर येथे रसिक साहित्य मंडळाची स्थापना केली. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर, प्रा. म. ना. अदवंत, प्रा. नरहर कुरुंदकर, जादूगार रघुवीर यांचे सदस्यत्व लाभलेल्या या साहित्यिक चळवळीने ग्रामीण परिसरातील नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशन, विविध नाट्यप्रयोग, कथाकथन, युवक कलावंतांच्या कलेचे नभोवाणीवरून सादरीकरण, संचालन आदी उपक्रम राबविले.

१९९८मध्ये निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांचे लेखन चालू आहे. नुकताच त्यांच्या कवितेवर पुणे विद्यापीठात शोधप्रबंध सादर करून एमफील पदवी हस्तगत केली; तसेच कवितालेखनासाठी दिला जाणारा २०१८ चा कवी केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कारही त्यांना मिळाला.

प्रकाशनाविषयी :
दिवस :
२१ ऑक्टोबर २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : आपटे सभागृह, डेक्कन जिमखाना, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link