Next
वाशिष्ठी बॅकवॉटरची रम्य सफर!
BOI
Friday, May 03, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

वाशिष्ठी बॅकवॉटरचा आनंद घेताना पर्यटक.

चार मे २०१९पासून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील वाशिष्ठी खाडीत ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाइल सफारी’ सुरू होत आहे. त्या निमित्ताने, वाशिष्ठी खाडीचे ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व, त्या भागातील निसर्गसौंदर्य, प्राणिसंपदा, पक्षीसंपदा आणि वनसंपदा, वारसा वास्तू अशा विविध अंगांनी माहिती देणारा आणि ‘क्रोकोडाइल सफारी’चे वेगळेपण सांगणारा हा लेख...
..............
मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी पाहायच्यात? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे? रम्य खाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल, तर पर्यटकांना चिपळूणमध्ये ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे. इतकी वर्षं हे सौंदर्य लोकांपुढे आलं नव्हतं. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ या चिपळूणच्या पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या संस्थेच्या सततच्या प्रयत्नांनी आता येथे पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे.

आपल्या देशात फक्त चेन्नईत क्रोकोडाइल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी पाहता येतात. ‘क्रोकोडाइल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. ‘मगर’ हा घटक चिपळूणच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकतो, याची जाणीव झालेल्या चिपळुणातल्या पर्यटनप्रेमींनी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेच्या माध्यमातून ‘क्रोकोडाइल सफारी’ उपक्रम सुरू केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही कधीही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटीदरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी आठ-१० फुटांच्या अंतरावरून त्यांना पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतल्या नैसर्गिक वातावरणात पाहता येतं. सरकारने चेन्नईप्रमाणे इथंही ‘क्रोकोडाइल पार्क’ होऊ शकेल का, याची शक्यता तपासण्याची, तसंच या मगरींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. सध्या इथल्या मगरी चिपळूणच्या पर्यटन व्यवसायाला आकार देण्याचं काम करत आहेत, हे नक्की! 

वाशिष्ठी खाडीत पाहायला मिळणाऱ्या मगरी.

वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाइल टुरिझमचा आनंद घेण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. २०१४पासून वर्षातून दोन वेळा म्हणजेच नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जातो. प्रति वर्षी किमान २५ हजार पर्यटकांची उपस्थिती या उपक्रमाला सातत्याने लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवंगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातली वाशिष्ठी खाडी, तिच्यातली छोटी-मोठी बेटं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि इथल्या समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे. 

वाशिष्ठी बॅकवॉटरचा आनंद घेताना नामवंत हास्यकवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आदी.

खाडीत साधारणत: पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच; पण वूली नेक्ड स्टॉर्क, ओरिएंटल हनी बझार्ड, पफ थ्रोटेड बॅब्लर, लिटल रिंग प्लोव्हर, युरेशियन कॉलर्ड डव्ह, प्लेन प्रिनिया, अॅशी प्रिनिया, लिटिल स्टिंट, मार्शलज आयोरा, कॉमन आयोरा, पाइड अॅव्होसेट, सिट्रिन वॅगटेल, युरेशियन स्पूनडिल, ब्लॅक हेडेड आयबीस, कॉमन रेडशॅक, चेंजेबल हॉक इगल, ब्राह्मणी काइट, मोर, पेंटेड स्टॉर्क, जांभळी पाणकोंबडी, आयबीस, डार्टर, आल्बिनो किंगफिशर, हेरॉन आदी दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही इथं होतं. ‘क्रोकोडाइल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात येते. मे २०१८मध्ये मुंबई-पुण्यातल्या साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाइल सफारी’च्या उद्घाटनासाठी चिपळुणात आलेले नामवंत हास्यकवी अशोक नायगावकर यांनीही ‘वाशिष्ठी नदीतल्या पर्यटनाला अत्याधुनिक पातळीवर आणा’ असा सल्ला दिला होता. 

साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मालदोलीचे संदेश आणि शैलेश संसारे, तुंबाडचे शैलेश वरवाटकर, हॉटेलियर रविकिरण जाधव यांनी खाडीत ‘क्रोकोडाइल सफारी’ची सुरुवात केली. त्यानंतर २०१० साली संपूर्ण कोकणात ‘क्रोकोडाइल टुरिझम’साठी ‘मालदोली (वाशिष्ठी) बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा निर्वाळा आम्हीही रत्नागिरी जिल्ह्यातल्या अभ्यासू तरुणांचे संघटन असलेल्या ‘झेप क्षितिजापलीकडे’ संस्थेच्या आनंदमेळ्यादरम्यान दिला होता.

वाशिष्ठी खाडीत पाहायला मिळणाऱ्या मगरी.

वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्नािगिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरच्या झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्यानं, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून २०१५ साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीनं घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचं मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश असतो. वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूणच्या पर्यटनातला महत्त्वाकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. 

वाशिष्ठी बॅकवॉटर

वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती, वैतरणा आणि शिवनदी या नद्या येऊन मिळतात. कोयना अवजलामुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बावी, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ यांसह खारफुटीची जंगलं, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणिसंपदा असून, ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपं आहेत. 

वाशिष्ठी बॅकवॉटर

फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्चिीम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीच्या पात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातला माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचं अवजल उपलब्ध झाल्यानंतर शिवनदीचं महत्त्व झपाट्यानं कमी होऊन तिचं अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे. 

वाशिष्ठी बॅकवॉटर

कोयनेच्या या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा, याबाबत उपाय सुचवण्यासाठी शासनानं जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबर २००५ रोजी पाच सदस्यांच्या अभ्यासगटाची स्थापना केली होती. २९ ऑगस्ट २००६ रोजी या समितीनं राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीनं कोकणातलं सुमारे एक लाख ७० हजार ५०५ एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं, असं पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे ४०० पानांचा हा अहवाल २०१३पर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. पेंडसे समितीचा अहवाल आजही राजकीय साठमारीत इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुनर्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावं, असं कधीही वाटलेलं नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचं रासायनिक प्रदूषण, सडणाऱ्या पाइपलाइन, जळणारी पिकं, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशु-पक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळूउपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही. आजही वाशिष्ठीच्या खोऱ्यात वैविध्याची रेलचेल आहे.

वाशिष्ठी बॅकवॉटर

अंजनवेलचा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी आमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होते. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित असून, चौथ्या बाजूला खंदक आहे. भोवतालचा तट जाड दगड व चुन्यापासून तयार केलेला, २० फूट उंच, आठ फूट रुंद आणि चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत. गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हबशांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर दोन एकर आहे. या किल्ल्यात रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातल्या तोफा व पाण्याचा मोठा हौद असून, सहा तोफांचं हल्लीच एकत्रित जतन केलेलं पाहायला मिळतं. 

मराठी भाषेतले श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ‘तुंबाडचे खोत’ ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच आमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षांचा प्रदीर्घ कालखंड हा या कादंबरीचा गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणाऱ्या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरीसारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षांचा असला, तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटं आणि दोन्ही तीरांवरची विविधता पर्यटक अनुभवू शकतो. 

वाशिष्ठी नदीच्या उगमाकडे जाणारा मार्ग

वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी आश्चर्य ठरलेली ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही वारसा वास्तू आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते. खाडीकिनारी वसलेल्या या वास्तूची आजची काठिण्यपातळी मोहवून टाकणारी आहे. साडेसात एकर जागेत अंदाजे दोन हजार चौरस फूट आकारात ही वास्तू आहे. उंचीवरील जिने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही, असे पाहून या जिन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. ९० वर्षांनंतरही या वास्तूतल्या लाकडाला काहीही झालेलं नाही. वास्तूतल्या जवळपास वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतली दोन कपाटं आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतल्या प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. छताच्या ‘लगी’ आज नव्वदीनंतरही मजबूत असून, त्यांना कुठंही बाक आलेला नाही. छपराच्या नऊ इंच आयबीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. भिंतींचा मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. वास्तू परिसरात आंब्याच्या ८० झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरीचे (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) झाड आहे. पीक भरपूर यायला हवं, याकरिता वनस्पतिशास्त्रानुसार परागीकरण भरपूर व्हायला हवं. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येऊन भरपूर परागीकरण व्हावं, म्हणून या सुगंधी झाडांची रचना इथं करण्यात आली आहे.

दापोली तालुक्यातलं पन्हाळेकाझी हे गाव कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातली कोटजाई नदी पुढे वाशिष्ठी खाडीला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर महाराष्ट्रातला दुसरा सर्वांत मोठा नितांतसुंदर लेणीसमूह आहे. इथल्या गुंफा ऐतिहासिक असून, त्या जवळपास हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. एकूण २९ भल्यामोठ्या दगडांमध्ये लेणी पाहायला मिळतात. या ठिकाणी श्री गणेश, सरस्वती यांसारख्या देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसंच, भिंतींवर महाभारत आणि रामायणातले काही प्रसंग चित्रित केले आहेत. पन्हाळेकाझी इथं नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक लेण्यांचं अनोखं मिश्रण आहे. एके काळी शिलाहार राज्याची राजधानी असलेल्या या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्ध स्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचं कोरीव मंदिर, रामायण आणि महाभारतातले प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पं कोरलेली आहेत. 

हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी किमान दोन-तीन तास लागतात. कोटजाई नदीकाठचं दृश्य अतिशय रमणीय आहे. इथला परिसर हिरव्यागर्द वनराईनं समृद्ध आहे. दापोलीपासून पन्हाळेकाझी २१ किलोमीटरवर आहे. चिपळूण तालुक्यातल्या गोंधळे इथल्या तांबी नदीच्या किनारी असलेलं पेशवेकालीन हरिहरेश्वर मंदिर, परिसरातली इंग्रजी ‘एल’ आकाराची प्राचीन विहीर (घोडेबाव), शेकडो वर्षांपूर्वीचं वडाचं झाड पाहण्यासारखं आहे. भरती-ओहोटीचं गणित सांभाळून छोट्या बोटीनं खाडीमार्गानं आपण पन्हाळेकाझीसह इथंही पोहोचू शकतो. 

वाशिष्ठीचा उगम (सर्व छायाचित्रे : धीरज वाटेकर)

वाशिष्ठीच्या जोडनद्यांमध्ये गोंधळेसह दापोली तालुक्यातल्या उन्हवरे गावातले गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, मालदोली बंदरासमोरची गुहा लहान बोटीनं भरती-ओहोटीची वेळ बघून, साधारण द्वादशी ते चतुथीपर्यंत जाऊन बघू शकतो. गाडीनं जाण्यासारखी दोन प्राचीन ठिकाणं म्हणजे बिवली गावचं प्राचीन लक्ष्मीकेशव मंदिर आणि दोणवलीचं सिद्धिविनायक मंदिर होय. दाभोळ ते चिपळूण-गोवळकोट बंदरांचं अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ किलोमीटर आहे. 

आम्ही सहा ऑक्टोबर २०१८ रोजी हा प्रवास केला. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचं सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. २६ जानेवारी १९३७ रोजी जगातल्या सर्वांत नामांकित नौकायानतज्ज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहणी केली होती. भारतातलं सर्वांत सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब असलेल्या या खाडीत एका वेळी दोन-तीन टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. १९५०पर्यंतच्या ३०० वर्षांत ही निरीक्षणं अनेकांनी नोंदवली. त्या वेळी मुंबई-न्हावाशेवा ही बंदरं जन्मलीही नव्हती. १८०८ साली अमेरिकेत बोस्टन येथे ‘विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते. त्यातही या दाभोळसंदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतला फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

धीरज वाटेकरओहोटीच्या वेळी खाडीकिनाऱ्यावर शरीराचं तापमान नियंत्रित करण्याकरिता ‘बास्किंग’ करीत निवांत पहुडलेल्या, ‘मॅन्ग्रूव्ह’मध्ये (कांदळवन) लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी बोटीतून बघायला धमाल मजा येते. या बोट प्रवासात सुमारे आठ ते १० फूट लांबीच्या किमान १० तरी मगरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल, तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. अर्थात त्यासाठी ओहोटी असली पाहिजे. पावसाळ्यात हा सगळा परिसर हिरवागार असतो. हिवाळ्यात इथं कुडकुडायला लावणारी थंडी असते. या खाडीपट्ट्यात आजवर पक्ष्यांच्या ७० ते ८० जाती नोंदवल्या गेल्या आहेत. हे बॅकवॉटर आणि इथल्या मगरी हे मोठं आकर्षण आहेच; पण वाशिष्ठीच्या खाडीतीरावर आणि जोडनद्यांमध्ये भरपूर प्राचीनता, लोकसंस्कृती, जीवनपद्धती, चालीरीती पाहायला मिळतात. आपल्या मातीतलं हे सारं वैभव अनुभवण्यासाठी एकदा तरी या वाशिष्ठीच्या खाडीची सफर करायलाच हवी!

- धीरज वाटेकर, चिपळूण
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com

(लेखक हे कोकणाचा इतिहास, पर्यटन, पर्यावरण आणि सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार आहेत. ‘पर्यटन आणि चरित्रलेखन’ या विषयावर त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

(चिपळूणच्या वैभवशाली वस्तुसंग्रहालयाबद्दलचा सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra Ghatage About 169 Days ago
बोट सुटण्याची वेळ .फेरी बोट सुटण्याचे ठिकाण दरपत्रक .मोबाईल.नं याबाबतीत माहिती द्यावी
0
0
Mohan N Ketkar About 170 Days ago
Very nice detailed description of my Chiplun. It was very close from our house at Pag.i had seen few places but not so much details. Thanks & regards .9814657735
0
0

Select Language
Share Link
 
Search