Next
डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे सांगणार ‘हेमलकसा’तील ‘राम-सीते’ची कथा
‘कलर्स मराठी’वरील कार्यक्रमात देणार वैयक्तिक आठवणींना उजाळा
BOI
Friday, February 22, 2019 | 03:04 PM
15 0 0
Share this story

डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे

समाजासाठी आयुष्य वेचलेल्या कित्येक व्रतस्थ लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असते. असेच एक समाजसेवी जोडपे म्हणजे डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे. छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात या दोघांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याचे पदर उलगडत हेमलकसातील राम-सीतेची कथा सांगितली आहे. 

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमातून डॉ. आमटे दांपत्याशी मनमोकळेपणाने साधलेला संवाद प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा कार्यक्रम ३७५ भागांचा टप्पा पूर्ण करत असून यानिमित्ताने या समाजसेवी जोडप्याला बोलावण्यात आले आहे. येत्या रविवारी म्हणजेच २४ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘नवरा असावा तर असा’च्या विशेष भागात त्यांच्याशी साधलेला संवाद पाहता येणार आहे. 

या असामान्य जोडीची संसारगाथा त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा हा योग चुकवू नये असाच आहे. डॉ. मंदाकिनी यांच्याशी प्रकाश आमटेंची झालेली भेट, मैत्री, मैत्रीचे प्रेमात झालेले रुपांतर, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न करताना आनंदवनात कुष्ठरोग्यांच्या साथीने केलेला सोहळा अशा सगळ्या आठवणी प्रकाश आमटे यांनी या कार्यक्रमात शेअर केल्या आहेत. मंदाकिनी यांनीदेखील शहरी वातावरण सोडून हेमलकसामध्ये राहायला येणे, कसलीही अपेक्षा न करता डॉक्टरांनी स्वीकारलेल्या व्रतात त्यांची साथ देणे याबाबतच्या आठवणी शेअर केल्या. 

डॉ. आमटे दांपत्य लग्न करून पहिल्यांदा हेमलकसामध्ये आले, तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांना ‘राम-सीते’ची जोडी असे संबोधले होते. ही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. यावर प्रकाश आमटे नेहमी म्हणतात तसे या कार्यक्रमातही म्हणाले, ‘राम-सीता वनवासात गेले तेव्हा, सीतेला कस्तुरीमृगाचा मोह झाला होता, मात्र हेमलकसातील या सीतेला कसलाही मोह कधी झाला नाही...’ याशिवाय, ‘संसार म्हटले की छोटी-मोठी भांडणे होतातच. ती आमच्यातही होतात. परंतु मग समजूतीने घेऊन ते भांडण मिटवण्याची जबाबदारी मीच घेते’, असे मंदाकिनी ताईंनी सांगितले. 

या जोडीने आजवर जवळपास ५० वर्षांचा प्रवास एकत्रित केला आहे. लोकबिरादरी प्रकल्प, वन्यजीवांचे संरक्षण यांसारख्या कितीतरी समाजसेवी कार्याचा वसा घेतलेले हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत, एकमेकांबद्दलचा विश्वास, आपुलकी, प्रेम, आदर या गोष्टीही त्यांच्यासाठी कशा महत्त्वाच्या आहेत, हे सगळे जाणून घेण्यासाठी ‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमाचा हा भाग जरूर पाहावा. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link