Next
‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही
BOI
Wednesday, April 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ऑरेंज सिटी
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण सैर करू या ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळख असलेल्या, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेल्या आणि देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर आणि आजूबाजूच्या विविध पर्यटनस्थळांची...
..........
नागपूर हे विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक शहर आहे. या शहरात महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. त्यामुळे ऐन थंडीत येथील वातावरण राजकीयदृष्ट्या तापलेले असते. नागपूर हे दिल्ली, चेन्नई व मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे.

रिझर्व्ह बँकनागपूरचा पहिला संदर्भ देवळी या वर्धा जिल्ह्यातील एका ताम्रपटामध्ये आढळून आला. प्रचलित माहितीनुसार छिंदवाड्यातील गोंड राजाचा मुलगा बख्त बुलंद शाह याने या शहराची स्थापना केली. या गोंड राजाने औरंगजेबाच्या पदरी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्याने १२ गावांचे मिळून एक शहर बनविले. तो भाग म्हणजेच नागपूर. नागपूरला फणींद्रपूर असेही एक नाव आहे. येथून एक वृत्तपत्रही ‘फणींद्रमणी’ या नावाने प्रसिद्ध होत असे. फणा म्हणजेच नागाचे फुत्कारलेले तोंड. काहींच्या मते नाग नदी येथून वाहते म्हणून या शहराचे नाव नागपूर, तर काहींच्या मते येथे नागा लोकांची वस्ती होती म्हणून ते नागपूर.

संत्राबर्फीनागपूरमध्ये रिझर्व्ह बँकेचे कार्यालय आहे. ब्रिटिशकालीन सुंदर इमारत हे या इमारतीचे वैशिष्ट्य. तसेच नागपूरमध्ये महालेखापाल (AG) यांचे कार्यालयही आहे. नागपूरमध्ये सध्या मेट्रोचे काम द्रुतगतीने चालू आहे. नागपूर हे कापड व्यापाराचे मुख्य ठिकाण आहे. पूर्वी नागपूरमध्ये कापड गिरण्या होत्या. आताही येथील कापडनिर्मिती (टेक्सटाइल्स) उद्योग मोठा आहे. येथे कापसाची मोठी उलाढाल होते. तसेच रेशीमकामही मोठ्या प्रमाणावर होते. खाद्यपदार्थनिर्मितीचे अनेक उद्योगही येथे आहेत. खवय्यांसाठी पाटवडी ऊर्फ सांबारवडी, तेजतर्रार चणा-चिवडा, बड्या मिठाईवाल्यांकडची संत्राबर्फी, नागपूर स्पेशल सोनपापडी आणि इथले सावजी जेवण खवय्यांसाठी तयार असतेच.

दीक्षाभूमी दीक्षाभूमी: पश्चिम नागपूरमधील चार एकर जागेवर विस्तारलेली दीक्षाभूमी हे सामाजिक क्रांतीचे स्मारक आहे. नागपूर हे बौद्धधर्मीयांचे प्रेरणस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीचा मुहूर्त साधून विचारधारेचे सीमोल्लंघन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून पाच लाख अनुयायांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा येथे घेतली. तेव्हापासूनच हे स्थळ दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले. कलिंग लढाईनंतर सम्राट अशोकाने धर्मांतर केले होते. त्यानंतर झालेले हे मोठे धर्मांतर समजले जाते. फरक एवढाच, की कलिंगची लढाई रक्तरंजित होती. त्यातून सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन झाले; मात्र या वेळी सामाजिक अन्यायातून बाहेर पडण्यासाठी हे क्रांतिकारक पाऊल उचलले गेले. बौद्ध धर्म हा धर्म नसून, एक आदर्श वैचारिक जीवनशैली आहे. दीक्षाभूमीवर विजयदशमीला अनुयायांचा महापूर लोटतो. येथे अत्यंत आकर्षक असा, सांची येथील स्तूपासारखा स्तूप बांधला असून, ते नागपूरचे वैभव आहे. सेओ दान मल (sheo dan mal) या जोधपूर येथील वास्तुविशारदाने याचा आराखडा तयार केला. १९७८ साली या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. ते २००१मध्ये पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्याला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. सुमारे १० हजार अनुयायी येथे बसू शकतील एवढी याची क्षमता आहे. आशियातील मोठ्या स्तूपांत याची गणना होते. याच्या तळमजल्यावरील हॉल २११ फूट बाय २११ फूट एवढा मोठा असून, मध्यभागी बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. अनुराधापूर येथून आणलेल्या बोधिवृक्षाची फांदी येथे लावण्यात आली असून, तो वृक्ष आता मोठा झाला आहे.

डायमंड क्रॉसिंगडायमंड क्रॉसिंग : नागपूर जंक्शन हे उत्तर पूर्व रेल्वे (Old Grand Trunk Railway) आणि मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. येथील दोन्ही मार्गांना जोडणारे क्रॉसिंग डायमंड क्रॉसिंग नावाने ओळखले जाते.

रेशीमबाग : येथे असून, सध्या

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघहे ठिकाण राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी केली. संघाचे कार्यालय सुसज्ज आधुनिक सुखसोयींनी युक्त असून, ते महाल विभागात आहे. संघस्थापना झाली त्या बैठकीला फक्त १० जण उपस्थित होते. सध्या संपूर्ण भारतामध्ये संघाच्या ५६ हजार ८५९ शाखा असून, सदस्य संख्या ‎सुमारे ५० ते ६० लाख आहे.

पूर्णवेळ प्रचारक हे ब्रह्मचर्य पाळणारे असतात. सकाळी व संध्याकाळी रोज शाखा भरविल्या जातात. संकटकाळी सेवेला धावून जाणारे अशी स्वयंसेवकांची ओळख आहे. आंध्र प्रदेशमधील वादळ, किल्लारी भूकंप अशा संकटांवेळी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. उत्तर भारतात संघाचे कार्य जास्त प्रमाणावर आहे.

अंबाझरी तलावअंबाझरी तलाव : हा तलाव नागपूर शहराच्या दक्षिणेकडे असून, नाग नदीचा उगम येथेच झाला आहे. या तलावाला पूर्वी ‘बिंबाझरी’ असे म्हणत. नागपूरच्या गोंड राजाच्या कार्यकाळात या तलावाची निर्मिती झाली. त्यासाठी, नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. उत्तर भारतातून नागपुरात या कामासाठी आलेल्या कोहळी समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केला. भोसले घराण्याच्या शासनकाळात या तलावात सुधारणा केल्या गेल्या. नंतर सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटांनी व क्षमता तिपटीने वाढविण्यात आली. येथे १८ एकर जागेवर सुंदर उद्यान उभारण्यात आले आहे. म्युझिकल फाउंटन हे येथील आकर्षण आहे.

सीताबर्डी किल्लासीताबर्डी किल्ला :
सीताबर्डी शब्दाचा अर्थ सीतेची टेकडी असा होतो. आप्पासाहेब भोसले यांच्या सैन्याने तीन दिवस दिलेल्या निकराच्या लढ्यानंतर २८ नोव्हेंबर १८१७ रोजी हा किल्ला ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात गेला. त्या वेळी येथे किल्ला नव्हता. त्याला ‘बडी टेकडी’ असे संबोधले जात असे. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. तेव्हा या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे. वर्षात फक्त तीन वेळा म्हणजेच, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व एक मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.

बालाजी मंदिरबालाजी मंदिर :
हेही नागपूरमधील एक आकर्षक ठिकाण आहे. भगवान कार्तिकेयाची मूर्तीही येथे आहे.

पोद्दारेश्वर राम मंदिर : राजस्थानमधील उद्योगपती पोद्दार यांनी या राम मंदिराची उभारणी केली. शुभ्र संगमरमर व लाल दगडात हे मंदिर बांधण्यात आले आहे. रामनवमीला येथे मोठ्या शोभायात्रेचे आयोजन केले जाते.

महाराजबाग पशुसंग्रहालयमहाराजबाग पशुसंग्रहालय : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राणी १० हजार रुपये देणगी देऊन दत्तक घेता येतो. राजे भोसल्यांच्या काळातील या बागेमध्ये २० प्रजातींचे जवळपास ३०० पशू-पक्षी आढळून येतात. वाघ, मोर, ससे, काळवीट आदींचा त्यात समावेश आहे.

नॅरो गेज रेल्वे म्युझियमनॅरो गेज रेल्वे म्युझियम : ब्रिटिशांच्या काळात सुरू केलेल्या नॅरो गेज रेल्वेचा ऐतिहासिक वारसा सांगणारे व माहिती देणारे संग्रहालय नागपुरातील मोतिबाग परिसरात आहे. ब्रिटिशांनी मध्य भारतात सातपुडा रेल्वे म्हणून रेल्वेचे जाळे विणले. त्या मार्गावर स्वतंत्र भारतातही अनेक वर्षे प्रवास सुरू होता. हे रेल्वेमार्ग १९०३ ते १९०९ या कालावधीत सुरू झाले होते. जुने वाफेवर चालणारे इंजिन आणि आता नवलाईच्या वाटतील अशा अनेक गोष्टी येथे पाहायला मिळतात. या म्युझियममध्ये परलाखिमुंडी महाराजांचा खासगी कोच, वाफेवर चालणारे इंजिन, रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये तयार करण्यात आलेले रेस्टॉरंट, १९०७ साली इंग्लंडमध्ये तयार झालेले वाफेचे इंजिन ठेवण्यात आले आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन १४ डिसेंबर २००२ रोजी झाले होते. येथे जुन्या आणि पुरातन काळातील भारतीय रेल्वेच्या वस्तू मोठ्या प्रमाणात आहेत.

झाशीच्या राणीचा पुतळा : सीताबर्डी भागात झाशीच्या राणीचा भव्य पुतळा हे मोठे आकर्षण आहे. लांब उडी घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या घोड्यावर बसलेल्या राणीसाहेब आणि घोड्याचे मागील दोन पाय व शेपूट यावर तोललेला हा पुतळा बघत राहावा असाच आहे.

नागपूर म्युझियमनागपूर म्युझियम :
अजब बंगला नावाने ओळखले जाणारे हे संग्रहालय सिव्हिल लाइन्समध्ये आहे. १८६३ साली याची उभारणी झाली. पुरातन नाणी, शिलालेख, शिल्पे, सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू, अश्मयुगीन हत्यारे अशा अनेक गोष्टी येथे आहेत. मुंबई कला संस्थेची अनेक पेंटिंग्जही येथे आहेत. येथे एकूण सहा दालने असून, मंगळवारची सुट्टी वगळता अन्य सर्व दिवशी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत हे म्युझियम उघडे असते.

मिहानमिहान : हा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा प्रकल्प आहे. नागपूरच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकास प्रकल्पांमधील सध्याच्या प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे.

कामटी ड्रॅगन हाउसकामटी ड्रॅगन हाउस : ड्रॅगन पॅलेस नावाचे बुद्धिस्ट सेंटर सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नांतून कांती येथे उभे राहिले आहे. जपानच्या ओगावा सोसायटीमार्फत १९९९मध्ये याची उभारणी झाली. भारत-जपान मैत्रीचे हे प्रतीक आहे. येथील भगवान बुद्धाचे चंदनशिल्प अतिशय देखणे आहे.

बुटीबोरी : ही नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.

कोराडी औष्णिक विद्युत केंद्रकोराडी औष्णिक विद्युत केंद्र : हे केंद्र २४०० मेगावॉट क्षमतेचे असून, ते १९७४मध्ये सुरू करण्यात आले.

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र : कन्हान व कोलार या नद्या या गावाच्या आजूबाजूने वाहतात. पुढे कामठीकडे जाताना बीना या गावाजवळ या नद्यांचा संगम होतो. फार पूर्वी येथे ३० मेगावॉट क्षमतेचे इंग्रजकालीन औष्णिक विद्युत केंद्र होते. या गावाजवळच वलनी येथे कोळशाच्या खाणी आहेत. नागपूर शहरापासून हे केंद्र सुमारे १४ किलोमीटरवर आहे.

खिंडसीखिंडसी : रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूरपासून ५३ किलोमीटर आणि रामटेकपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोइंग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी खेळांचे पार्कही आहे. मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

पेंच अभयारण्यपेंच अभयारण्य : हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. २७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा १० टक्के भाग महाराष्ट्राच्या हद्दीत येतो. उर्वरित विस्तार मध्य प्रदेशात आहे. हे अभयारण्य खूप सुंदर आहे. पेंच हे पक्षी अभयारण्य आहे. १९९९मध्ये या प्रकल्पाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. या जंगलात सस्तन प्राण्यांच्या ३३ प्रजाती, ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी, १६४ प्रजातींचे पक्षी, ५० जातींचे मासे व १० प्रकारचे उभयचर प्राणी वास्तव्यास आहेत. पेंच नावाच्या नदीमुळे या भागाला पेंच नाव पडले. वाघ, बिबटे, अस्वल, सांबर, चितळ, चारसिंगा, नीलगाय, माकडे इत्यादी प्राणी या अभयारण्यात आढळतात. या जंगलात सागाची भरपूर झाडे आहेत. ऑक्टोबर ते जून या कालावधीतच अभयारण्यात खुला प्रवेश असतो. जुलै ते सप्टेंबर या अतिपावसाच्या काळात येथे प्रवेश दिला जात नाही. हे अभयारण्य नागपूरपासून ८६ किलोमीटर अंतरावर आहे.

उमरेड कोळसा खाण : 
आठ दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेली ही कोळशाची खाण आहे. या भागात हलबा कोष्टी समाजाची वस्ती असून, ते विणकर आहेत. कोळसा खाणीमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

उमरेड-करहांडल अभयारण्यउमरेड-करहांडल अभयारण्य :
हे अभयारण्य १८० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या असलेल्या जय या वाघाचे वास्तव्य येथे होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी व नागपूरमधील भिवा, कुही व उमरेड परिसरात हे अभयारण्य विस्तारले आहे. जंगली कुत्री, बिबटे, शेकरू व अनेक प्रकारची हरणे येथे पाहण्यास मिळतात. नुकतीच (मार्च २०१८) ताडोबा वनक्षेत्रातील एक वाघीण प्रियकराच्या शोधात येथे आली आहे.

खेकरानालाखेकरानाला : येथे एक बंधारा असून, हे सहलीचे ठिकाण आहे. हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खाप्राजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी, विशेषत: पर्वतारोहण करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. खेकरानाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे येथील मुख्य आकर्षण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे ठिकाण नागपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.

मरकड : हे २४ मंदिरांचा समूह असलेले ठिकाण असून, खजुराहो शैलीची छाप यावर पडली आहे. संत मार्कंडेय यांचे नावावरूनच या ठिकाणाचे नाव पडले.

रामटेक : रामटेक किल्ल्यावरून गावाचे विहंगम दृश्य दिसते. येथे वर आल्यावर लालतोंडी माकडे आपल्याजवळ येतात व आपल्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न करतात. नागपूर-जबलपूर मार्गावर थोडे आतील बाजूस हे ठिकाण आहे. आख्यायिकेप्रमाणे, हिरण्यकशिपूचा नाश केल्यावर नरसिंहाने आपली गदा येथे फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले.

राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर असून, त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी करण्यात आली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी, तर इतर काम नंतरचे आहे. नागपूरचे राजे रघूजी (पहिले) यांनी देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम केले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा या नावाने ओळखला जातो. कारण तेथून आत गेल्यावर लगेच वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा हा या रेषेतील दुसरा दरवाजा असून, त्यातून आतील तटबंदीत प्रवेश मिळतो, तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.

आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवताली इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत.

नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबांच्या बांधणीचे बारकावे या वास्तूत दृग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो.

शिखरे भूमिज प्रकारची आहेत. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीव काम खास उल्लेखनीय आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वांत उंच भागात असून, अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरात यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर दिवे लावले जातात.

येथे अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली असेही म्हणतात. येथे चक्रधरस्वामी यांचे प्राचीन मंदिर आहे. १२व्या शतकात परिभ्रमण करत असताना भरुच (गुजरात) येथून स्वामी रामटेकला आले होते, असा उल्लेख मराठीतील आद्यग्रंथ असलेल्या लीळाचरित्रामध्ये आला आहे. येथे स्वामींचे १० महिने वास्तव्य होते. हे ठिकाण नागपूरपासून ५४ किलोमीटर अंतरावर आहे.

मनसर : नागपूर-जबलपूर मार्गावर रामटेकजवळील मनसर येथे पुरातन बौद्ध संस्कृती वसली असल्याचा शोध नुकताच लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे. मनसर येथे महाविहार होता, असे उत्खननात आढळून आले आहे. ही आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभूमी असल्याचे मानतात. इ. स. २५०मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या आधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या काळात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ. स. ३५०मध्ये त्यांचा पाडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास होऊन गेले, असे मानले जाते. हे ठिकाण नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटरवर आहे.

तोतलाडोह धरण : रामटेकजवळील पेंच नदीवर तोतलाडोह नावाचे धरण आहे. हा परिसर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या जवळ येतो. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे. हे धरण नागपूरपासून ८० किलोमीटरवर आहे.

नगरधन : हा भुईकोट किल्ला आहे. वाकाटककालीन या किल्ल्यास जुना इतिहास आहे. रामटेकपासून वायव्येला सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याची जागा इसवी सनाच्या चौथ्या शतकात नंदीवर्धन म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी गणेशाचे शिल्प आहे. उमलती कमलपुष्पे हे यादवांचे चिन्ह प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना आहे. डाव्या बाजूला द्वारपालाचे एक शिल्प आहे. येथे पायऱ्यांची एक विहीर असून, छोटे अभयारण्याही आहे.

नागपूरमध्ये राहण्यासाठी सर्व श्रेणीतील उत्तम प्रकारची हॉटेल्स आहेत. रेल्वे, विमान, रस्तेमार्ग अशा सर्व मार्गांनी हे ठिकाण भारताशी जोडले गेले आहे. थंडीत कडाक्याची थंडी, तर उन्हाळ्यात कडक उन्हाळा असे येथील वातावरण असते. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा येथे जाण्यासाठी उत्तम काळ असतो.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)


(‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि  काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Mangesh G. Kavale About 329 Days ago
सुंदर लेख, अतृप्त माहिती उठावे व त्वरित सर्व ठिकाणे पुन्हा तुम्ही दर्शविलेल्या नजरेप्रमाणे पाहून घ्यावीत हि ओढ लागली .....
0
0
जयश्री चारेकर About 332 Days ago
खूप छान सविस्तर माहिती मिळाली याआधी १/२ठिकाणी गेलो होतो पण या लेखाच्या निमित्ताने छान माहिती मिळाली
1
0
विशाखा अभ्यंकर About 334 Days ago
खूप विविध प्रकारची माहिती. नागपूर व त्याचं या आधीचं नाव यांचा अर्थ, तसंच आणखीही काही ठिकाणं नव्याने कळली. छान लेख.
1
0
Anu Amlekar About 335 Days ago
I loved this article. However as always I request that the essential information about bathroom/washroom/restroom should be provided at each tourist place. Most of the times only food information is provided which of no use until you are sure there are good / accessible restrooms nearby. Similarly accessible accommodation information is also necessary at all these nature places. Unless we have a decent accommodation we cannot go to these places. Please consider these for travel articles. More and more people are using wheelchairs - can they go? Thanks for your consideration. Best Regards
1
0
Milind Lad About 335 Days ago
khup sundar article. Vivid elaboration with photos & nice video. Absolutely awesome. Madhavji...
1
0

Select Language
Share Link