Next
गुरुकुलाने गाठला विकासाचा टप्पा
BOI
Friday, July 06, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story

गुरुकुल, चिंचवड

‘भटक्या-विमुक्तांसाठी सुरू केलेल्या गुरुकुलामध्ये कला, कौशल्य, संगीत, चित्रकला, इंग्रजी, संस्कृत सेवाभावीपणे शिकवणारे अनेक जण येतात. गीता शिकवायला सुरुवात झाली आहे. इथल्या इथे आम्ही त्यांना व्यवसायाचं वेगळं मार्गदर्शन देतो. विकासाचा एक टप्पा यातून गाठता आला आहे...’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा सहावा भाग...
.........
पारधी आणि अन्य जमातींच्या कौशल्यांच्या दस्तऐवजीकरणासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
गिरीश प्रभुणे : होय. पारधी आणि अन्य जमातींमध्ये असलेल्या कौशल्यांचं आणि आणखी अनेक गोष्टींचं विविध प्रकारे दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करायला आम्ही गेल्या दहा वर्षांत सुरुवात केली आहे. म्हणजे, ओतारी कसा काम करतो,  हे कळायला हवं, म्हणून त्याचं सगळं व्हिडिओ शूटिंग केलं. टिपणं काढलेली आहेत. ते त्यात काय काय नवीन अॅड करतात, असं सगळं त्यात नोंदलं जातं. सरदारजीसारखे दिसणारे शिकलकरी असतात, ते पारध्यांच्यातलेच. चोऱ्यामाऱ्या कुठे काही झालं, की त्याला पकडून नेतात. तलवारी उत्तम करतात ते. त्यांचंही डॉक्युमेंटेशन केलं.

गिरीश प्रभुणेगुरुकुल सुरू होईपर्यंतचा प्रवास कसा होता? त्यातून विकास कसा साधला जात आहे?
गिरीश प्रभुणे : इथे (चिंचवडच्या गुरुकुलमध्ये) असलेल्या पारधी मुलांच्या कहाण्या आहेत एक-एक. पारधी पुस्तक तुम्ही वाचलंय का? ‘विवेक’मध्येही मी लेख लिहिले होते. ‘मौज’च्या दिवाळी अंकातही लिहिले होते. परिवर्तनाचे विषय त्यात असायचे. पाबळच्या विज्ञानाश्रमाचे डॉ. कलबाग यांना आम्ही यमगरवाडीला बोलावलं होतं. आठवडाभर ते राहिले होते. वारले ते आता. मी सांगतोय ती २००२ सालची गोष्ट. पारधी मुला-मुलींनी शिकावं आणि वेगवेगळ्या पालावरती जाऊन शिक्षण द्यावं, असा विचार होता. वसतिगृह काढायचं तर संख्या वाढते. व्यवस्थापनाचे प्रश्न येतात. त्याच्याऐवजी हा कार्यकर्ता किंवा ही कार्यकर्ती पालावर गेली, त्यांनी एक-दोन तास मुलांना शिकवलं, तर मुलं आई-वडिलांबरोबरच राहतील आणि कुटुंबात परिवर्तन होईल. आपलाही तिथे संपर्क राहील. वसतिगृहात आणल्याने पालकांऐवजी फक्त मुलांशी संबंध राहतो. या कामात अजून काय करता येईल, याची चर्चा करण्यासाठी मी डॉ. कलबागांकडे गेलो होतो. यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचं रूपांतर करता येईल, असा विचार त्यामागे होता. ती यांची एक प्रकरची ताकद आहे. कोल्हाट्यांकडे नृत्यकामाचं स्किल आहे. डोंबाऱ्यांकडे जिम्नॅशियमचं स्किल आहे. त्यांचा व्यवसाय बंद न करता शिक्षण कसं देता येईल आणि मग शिक्षणाने ती वेगवेगळी स्किल आणखी विकसित कशी करता येतील, याच्या आधुनिक शिक्षणाचं तंत्र मी दिल्ली, आग्रा, बऱ्हाणपूर अशा अनेक ठिकाणी आणि डॉ. कलबागांकडे शिकलो. त्यांनी यमगरवाडीला आठ दिवसांचं एक शिबिर घेतलं होतं. त्या आठ दिवसात शुभांगीची (गुरुकुलमध्ये असलेली एक लहान मुलगी) आई तिथे आली होती. तिचं नाव पुष्पा. ती त्या वेळेला अगदी लहान होती. (नंतर तिला अजून एक मुलगी झाली.) ती नवऱ्यासहित आली होती. 

आमचं असं ठरलं होतं, की आम्ही प्रत्येकाने एका एका पालावर जायचं. पालावरची शाळा. मग त्या मुलांना ‘अ ब क ड’, गणिताप्रमाणेच काही वेगळ्या प्रकारचं स्किल देता येईल का? गोधडीला वेगळं डिझाइन देउन, नवीन कापड देउन, पॅचवर्कसारखं काही करतील का त्या महिला? किंवा दोरीवर चलण्याचं जे त्यांचं कसब आहे, त्याला सर्कससारखा चांगला पोशाख देता येईल का? भीक मागायची त्यापेक्षा, कला दाखवायची तर मग तिकीट लावून करा, असं काही करता येईल का, असा विचार आम्ही करत होतो. त्या सगळ्या चर्चेत डॉ. कलबागांनी सांगितलं, की ऊर्जा नष्ट होत नाही. ऊर्जेचं रूपांतर होतं. त्यांनी त्याची अनेक उदाहरण दिली. सूर्याच्या किरणांतून ऊर्जा जमिनीवर पडते. पाऊस पडतो. बीज अंकुरतं. ते हिरवं गवत खाऊन गाय दूध देते. दूध आपण पितो. ती ऊर्जा आपल्यात येते. आपली ऊर्जा आपण अनेक कामांत वापरतो. हे ऊर्जेचं चक्र तुम्ही समजून घेतलं, तर तुमचं जीवन सफल होईल. तुमच्या प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुम्ही जाणा आणि त्या ऊर्जेचं रूपांतर योग्य गोष्टीत करा. गवत जाळलं, तर त्याची राख होते, असं सगळं डॉ. कलबाग सांगत होते. शेवटी पुष्पा उभी राहिली. तिने झाडावरचा एक रेशमाचा कोष आणला होता. तो तिने दाखवला. आणि काडेपेटीत दोन फुलपाखरं आणली होती पकडून. म्हणाली, ‘हे बघा. सूर्याची किरणं पडली झाडावरती. पानं उगवली. सुरवंटाने झाडाची पानं खाल्ली. स्वतःभोवती एक कोष विणला. आणि या कोषातून पंख फुटून फुलपाखरं बाहेर आली.’ डॉ. कलबाग म्हणाले, ‘केवढी मोठी समज आहे हिची. ही उत्तम शिक्षिका बनेल, तिला सोडू नका.’ १५-१६ वर्षांची मुलगी होती ती; पण तिचं लग्न झालं होतं, तिला मूल होतं. तिचा नवरा बरोबरच होता. तोही पोरगाच. 

नंतर असं घडलं, की तिचा नवरा, भाऊ, आई-वडील, सासू-सासरे सगळेच पारधी समाजाचे. पोलिसांनी पकडून आत टाकले. कमवणारे सगळेच आत गेले. पैसे मिळेनात. खायला काय घालायचं? मग पुष्पा काम करू लागली. पुष्पाची धाकटी बहीण ती वेडी होती, ती हिच्या-भावाच्या, अशा दहा-बारा मुलांना सांभाळायची. एकदा शुभांगीची धाकटी बहीण (वर्ष-दीड वर्षाची) रडायला लागली. म्हणून ती मारायला लागली. ती वेडी असल्यामुळे मारण्याची क्रिया सतत करत राहिली. त्यातच मुलगी गेली. लोकं आली, पुष्पा आली. पाहिलं तर ती लहान मुलगी बेशुद्ध पडलेली आहे. तिला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणाले, ‘गेली आहे ती.
पोस्टमॉर्टेम करावे लागेल. कंम्प्लेंट द्यावी लागेल. कारण तिच्या पाठीची सर्व हाडे मोडली आहेत.’ आणि मग तिच्या लक्षात आले, की आपल्या बहिणीने मारले आहे. पोलिस आलेच. मग तिने मला फोन लावला. सगळी कहाणी सांगितली. माझी बहीण वेडी आहे आणि तिच्या मारहाणीमध्ये ही गेली आहे. ती म्हणाली, ‘काका मी पोलिसांना सांगितले, ती पडली आणि गेली, तर पोलिस म्हणाले हिला मारलेलं आहे आणि तिचा मारहाणीत मृत्यू झालेला आहे. पडून अशी हाडं नाही मोडत. काका तुम्हीच सांगा पोलिसांना.’ मग पोलिसांना समजावलं. ‘ही वेडी मुलगी आहे. तिला पकडून तुम्ही आत टाकलंत, तर रिमांडहोमला जाईल. शेवटी काही ना काहीतरी शिक्षा होईल. शिक्षा झाली, तरी ती सज्ञान नाही, अठरा वर्षांची नाही. त्यामुळे पुन्हा सुटणार. एवढं करून मिळणार काय? मेलेली मुलगी परत येणार नाही आणि जी वेडी आहे तिला इस्पितळात पाठवावं लागणार. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या. आम्ही तिला वेड्याच्या इस्पितळात पाठवतो. पोलिस केस करून तिकडे पाठवण्यापेक्षा हे बरं. तिला काहीच कळणार नाही. दुर्दैवी घटना आहे; पण तिच्याकडून हे अनवधानानं झालेलं आहे. मुलं रडायला लागली, तर आई मारते, म्हणून ती मारत राहिली आणि त्यातच मुलगी मेली.’

(ती वेडी असली, तरी दिसायला खूप चांगली होती आणि ती अशा परिस्थितीत तिथं गेली, तर तिच्यावर अत्याचार होण्याची शक्यता.) पोलिसांनी आमचं ऐकलं. अधिकाऱ्यांनी तिच्यावरची केस रद्द करून टाकली. तिला आम्ही चिंचवडमध्ये गुरुकुलात आणली. येरवड्याजवळ वेड्या महिलांसाठीचं इस्पितळ आहे, त्यात नेऊन दाखल केली. दरम्यान, घरचे सगळे तुरुंगात अडकल्यामुळे एकाने पुष्पाला सांगितले, की आम्ही तुला पैसे मिळवून देतो. एक मूल तर गेलंच, शुभांगीला घेऊन ती त्या अनोळखी राजकीय कार्यकर्त्याबरोबर निघाली. त्या कार्यकर्त्याने पुष्पाला विकून टाकलं पाच हजारांत. तिथून तिचा बहिणीला फोन आला. मी मोतीबागेत (संघाचे पुण्यातील कार्यालय) होतो. शिरीषराव, गडसगावकर, मी, मुकुंद लागू असे आम्ही बसलो होतो. आमच्यापर्यंत माहिती आली, की पुष्पाला विकले आहे. आम्ही लगेच फोनाफोनी केली. पोलिसांना कळवलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन सगळ्यांना पकडलं. रात्री पोलिसांनी आम्हाला फोन करून सांगितलं. मग तिचा जबाब घेतला. ती म्हणाली, मी स्वखुशीनं आली आहे. तिने फोन केला होता, की मला विकण्यात आलं आहे; पण जबाब देताना मात्र वेगळंच बोलली. म्हणजे ते सगळे राजकीय लागे-बांधे असणार. पैसा-बिसा चारला असणार. मग आम्ही पुन्हा केस लावली, की जबाबात जरी ती स्वखुशीने यात आली असं म्हणत असेल, तरीसुद्धा तुम्ही तिच्यावर केस लावा आणि तिला अटक करा. तिथनं सोडवा तिला; पण त्यांनी सोडवलं नाही. आम्हाला कंप्लेंट द्यायला सांगितली. मग मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली. ते म्हणाले, ‘तिने स्वखुशीने आल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे काही करता येत नाही. कोणालाही कुठलाही धंदा करता येतो.’ म्हटलं, ‘वेश्याव्यवसाय करणं कायद्याने गुन्हा आहे. कुठल्याही बाईनं केला तरीसुद्धा तिला शिक्षा होते. तिने जर स्वतःहून सांगितलं असेल, तर तुम्ही लगेच तिच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे.’ आमचा उद्देश होता तिला त्या निमित्तानं तिथून बाहेर आणणं. मग सोडवता येईल तिच्या घरच्यांना. त्याच्यातनं तिची सुटका केली; पण सुटकेनं काही नाही झालं. वकिलांनी एक लाख रुपये मागितले, दहा जणांना सोडविण्याकरता. पैसे तर नाहीत. ही बारा-तेरा मुलं सांभाळायची आहेत. त्यामुळे सोडवून आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती त्याच व्यवसायात गेली. या मुलीला (शुभांगीला) मात्र आमच्याकडे सोडलं. बाकीची दहा-बारा मुलं माझ्याकडेच उतरली होती. हिचे दोन भाऊ छोटे, चार थोड्याश्या मोठ्या असणाऱ्या मुली, तिच्या भावाची मुलं, अशी आठ जणं दोन महिने माझ्या घरी होती. आणि मग लक्षात आलं ही समस्या कशी सोडवायची ते. तिला मी म्हटलं, की ‘तुला मी इकडे बालवाडीचा कोर्स देतो, तू इकडे ये.’ तिनं उत्तर दिलं, की ‘सुरवंटाचं फुलपाखरू होतं. मी आता पुन्हा सुरवंट झालेली आहे फुलपाखराची. आता मी पुन्हा कसं फुलपाखरू होऊ. मी आहे तिथेच ठीक आहे. माझ्या मुलीला तुम्ही शिकवा.’ ही मुलगी, तिची भावंडं अशी सगळी ठेवून घेतली आणि लक्षात आलं, की नाहीतरी आपण वेगळ्या वसतिगृहात ठेवतो, एवढा खर्च करतो. त्याऐवजी आपणच एक सुरू करू या. म्हणून मग ही शाळा सुरू केली. अशा या शुभांगीसारख्या प्रत्येकाची काहाणी असणारी ही दुसरी यमगरवाडी इथे (चिंचवड गुरुकुल) आता सुरू झाली आहे.

इथे कला, कौशल्य, संगीत, चित्रकला, इंग्रजीसंस्कृत सेवाभावीपणे शिकवणारे अनेक जण येतात. गीता शिकवायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच जणांचे काही श्लोक पाठ झाले आहेत. इंग्रजीचंही चांगलं अध्यापन सुरू झालं आहे. इथल्या इथे आम्ही त्यांना व्यवसायाचं वेगळं मार्गदर्शन देतो. इथे सांभाळताना यमगरवाडीत येणाऱ्या अडचणी जाणवत नाहीत. तिकडे यमगरवाडीत चांगला शिक्षक नाही मिळत. कार्यकर्ता मिळतो; पण कार्यकर्त्यालाही मर्यादा पडतात. म्हणून मग इथं वाढवायचं मनात आहे. इथं लगेच कुठला तरी रिफ्रेशिंग कोर्स देता येतो. म्हणजे आता हे शिक्षण इथपर्यंत आलं आहे, याच्यापुढचं शिकवायचं आहे, तर कार्यकर्ता जाऊन शिकून येऊ शकतो. त्यामुळे इथलं काम सुलभ झालं आहे. थोडक्यात एक विकासाचा टप्पा त्यातनं गाठता आला.

शासकीय पातळीवरही दोन प्रयत्न झाले. नागपूरला पारध्यांवर अत्याचार झाले होते १९९५ला. त्यांनी इस्लाम धर्मात जाण्याची घोषणा केली. आम्ही इथले सगळे कार्यकर्ते घेऊन तिथे पोहोचलो. सगळ्या वस्त्यांवर जाऊन पोहोचलो. स्व-रूपवर्धिनीतले काही कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, तिथे एक महिनाभर राहिल्या. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांनी धर्मांतर केलं नाही. त्या वेळी युती सरकार होतं. आम्ही हा विषय गोपीनाथरावांपर्यंत नेला. गोपीनाथराव स्वतः त्या वस्त्यांवर आले. आणि शासनाने भटके-विमुक्त विकास संशोधन आणि अभ्यास समिती नेमली. ती समिती तयार होऊन कार्यान्वित होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. दादा इधाते त्याचे अध्यक्ष झाले. किशोर शांताबाई काळे, ज्याचा नंतर अॅक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, तोही त्यात सदस्य होता. आसाराम गुरुजी म्हणून भटक्या-विमुक्तांतले एक चांगले कार्यकर्ते होते. डॉ. भीमराव गस्ती आणि मीही त्यात होतो. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची, खऱ्या कार्यकर्त्यांची अराजकीय अशी समिती तयार झाली. आम्ही वर्षभर सर्व महाराष्ट्र हिंडून, जिल्ह्याजिल्ह्यात प्रत्येक जातीचा अभ्यास करून, जेलमध्ये जाऊन, या सगळ्याचा एक रिपोर्ट तयार केला. समिती झाली त्या वेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, समितीचे काम संपले त्या वेळी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्या रिपोर्टच्या आधारे भटक्या-विमुक्तांचं मंत्रालय सुरू झालं. त्यातून भटक्या-विमुक्तांच्या महामंडळाचा निधी, जो केवळ, दीड-एक लाख होता, तो सव्वाशे कोटीपर्यंत वाढवला गेला.

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link