Next
पेनलेस व स्टिचलेस गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता ठाण्यात शक्य
प्रशांत सिनकर
Thursday, January 24, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this story

ठाणे : येथील क्युरे हॉस्पिटलमध्ये नियमित स्वरूपात पेनलेस व स्टीचलेस नी रिप्लेससेंट (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रियेची सोय सुरू झाली आहे. या नवीन पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला एका दिवसात त्याच्या दैनंदिन हालचाली सुरू करता येणार असून, घरीही जाता येणार आहे.

गुडघ्याची वाटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्वी कठीण मानली जात होती; मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ती कमीतकमी वेदना देणारी व टाकेदेखील कमी लागणारी झाली आहे. वय वाढत गेले की, गुडघ्याची वाटी बदलण्याची वेळ काही जणांवर येते. या नवीन पद्धतीत रुग्णाला आता शस्त्रक्रियेनंतर तीन-चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचीदेखील गरज राहिलेली नाही. नवीन उपचार पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेनंतर अगदी तीन-चार तासांत रुग्ण त्याच्या पायावर उभा राहून त्याचे दैनंदिन व्यवहार करू शकतो.

शस्त्रक्रियेच्या या नवीन पद्धतीबद्दल माहिती देताना प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेंद्र पाटील म्हणाले, ‘गुडघ्याची वाटी प्रत्यारोपणसाठी आता अॅडक्टर कॅनल ब्लॉक्स वापरला जातो. ज्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची आहे तेथील मांडीच्या शिरेत कॅथेटर घातला जातो. या कॅथेटरमधून वेदनाशामक औषध रुग्णाला दिले जाते, ज्याचा परिणाम फक्त गुडघ्यावर ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करायची आहे तेवढ्याच भागावर होतो. एरवी कमरेतून अॅनेस्थेशिया दिला जात असल्याने कमरेखालील अवयव, दोन्ही पाय यात शस्त्रक्रियेसाठी बधिरता आणली जाते. पायाची शस्त्रक्रिया झाल्यावरही ही बधिरता काही काळ तशीच असल्याने रुग्णाला एक-दोन दिवस तरी बेडवरून हलता येत नाही. त्याच्या दैनंदिन क्रियेसाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो.’

‘एडक्टर कॅनल ब्लॉक्समुळे शस्त्रक्रियेनंतरची वेदना कमी होते. शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांनी कॅथेटर काढून टाकला जातो. त्याचा फायदा रुग्णाला होतो. पूर्वी रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर पुढील दोन ते दिवस बेडवर पडून राहावे लागत होते. मग हळूहळू त्याची हालचाल सुरू व्हायची. आता मात्र तीन-चार तासांतच रुग्ण त्याचे दैनंदिन व्यवहार करू शकतो. शरीराला कमीतकमी छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. यात काही काळानंतर मांडीला दिलेला छोटासा छेद देखील दिसेनासा होतो. महत्त्वाचे म्हणजे या शस्त्रक्रियेत रुग्णाला जास्त त्रास होत नाही. शस्त्रक्रियेनंतरचे टाकेदेखील दिसत नाहीत. रुग्ण अगदी दुसऱ्या दिवसापासून कोणाच्याही आधाराशिवाय हिंडू, फिरू शकतो. या नवीन पद्धतीमुळे रुग्णाला टाके काढून टाकायचे आहेत याचीही चिंता राहत नाही. ठाण्यात अशा प्रकारची नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची सोय आता क्युरे हॉस्पिटलमध्ये नियमीत स्वरूपात सुरू झाली आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

क्युरे हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णमूर्ती सुदर्शन म्हणाले, हे सगळे आमच्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टीमचे यश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना कमी वेदनादायक व चांगला रिझल्ट देणारे उपचार येथे करून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link