Next
चिनी मालाच्या आक्रमणाविरोधात भारतीयाचा लढा : ‘वाह जिंदगी’
मार्चमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
BOI
Wednesday, February 13, 2019 | 01:16 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : चिनी मालाचे भारतीय बाजारपेठेवर होत असलेले आक्रमण मोडून काढण्यासाठी एका भारतीय माणसाने केलेल्या प्रयत्नांची कहाणी सांगणारा ‘वाह जिंदगी’ हा चित्रपट मार्चमध्ये रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेते  संजय मिश्रा यांच्यासह विजयराज, धर्मेश व्यास, मनोज जोशी, नवीन कस्तुरीया, प्लाबिता बोरठाकूर आणि ललित शर्मा यांनी काम केले आहे. 

संजय मिश्रा
या चित्रपटाबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक  दिनेश यादव म्हणाले, ‘ राजस्थानमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका सामान्य माणसाच्या लढ्याची ही कथा आहे. व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या एका तरुणाने स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या चिनी मालामुळे भारतीय उत्पादकांचा व्यवसाय बंद पडत असल्याचे लक्षात आल्यावर चिनी मालाला टक्कर देण्यासाठी हर एक तऱ्हेने प्रयत्न केले. २००७ मध्ये चीनमधील अगदी स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचे भारतीय बाजारपेठेत आगमन होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी चीनमधून येणाऱ्या स्वस्तातील सिरॅमिक टाईल्समुळे भारतातील हा व्यवसाय धोक्यात आला. अत्यंत स्वस्तात माल उपलब्ध करून देण्याच्या चीनच्या धोरणामुळे अनेक बाजारपेठांमध्ये चिनी माल येऊ लागला. त्यामुळे आपल्या देशातील उत्पादक, व्यापारी यांचा व्यवसाय ठप्प होऊ लागला. अशावेळी या एकट्या माणसाने या संकटाला तोंड देण्यासाठी धडपड सुरू केली. लोकांना या माणसाच्या प्रयत्नांची कथा कळावी हा माझा उद्देश आहे.’

संजय मिश्रा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असे विचारले असता, यादव म्हणाले, ‘या सर्वच कलाकारांसोबत काम करणे हा अत्यंत आनंददायी अनुभव होता. संजय मिश्रा यांना सुरुवातीला या चित्रपटाबद्दल थोडी शंका होती, पण त्यांनी या विषयावर मी केलेले कच्चे काम बघितले आणि चित्रपटाच्या विषयाबाबत त्यांची खात्री पटली. त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे त्यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्याबरोबर काम करणे हा अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता.’

चित्रपटाचा विषय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप होत असल्याबद्दल विचारले असता, यादव यांनी असा कोणताही हेतू चित्रपट काढण्यामागे नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘कोणत्याही राजकीय दृष्टीकोनातून मी हा चित्रपट बनवलेला नाही. ही भारतीय माणसाची कथा आहे. ‘मेड इन इंडिया’ ही संकल्पना महात्मा गांधीनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना आणली. त्यामुळे कोणी कशावरही आक्षेप घेण्याचे कारण नाही. ’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा चित्रपट दाखवण्याची इच्छा यादव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ हे शक्य होईल का नाही माहित नाही, पण मी त्यांना आमंत्रण पाठवणार आहे. त्यांनी हा चित्रपट बघितला, तर मला आनंदच होईल.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search