Next
‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ येत्या १२ ते १६ डिसेंबरदरम्यान
यंदा महोत्सव महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलाच्या जागेवर
BOI
Saturday, November 24, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दर वर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ या वर्षी बुधवार, १२ डिसेंबर ते रविवार १६ डिसेंबर २०१८ या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. महोत्सवाचे हे ६६ वे वर्ष असून, या वर्षीच्या महोत्सवात कला प्रस्तुती करणाऱ्या कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

फिनोलेक्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, पृथ्वी एडिफिसचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक अभय केले, आशा पब्लिसिटीचे चंद्रकांत कुडाळ, बुलडाणा अर्बनचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक शिरीष देशपांडे या वेळी उपस्थित होते.


यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’ला फिनोलेक्स, श्री धूतपापेश्वर लि., पु. ना. गाडगीळ अँड सन्स, युनियन बँक, नांदेड सिटी, बुलडाणा अर्बन, गोखले कन्स्ट्रक्शन्स, पृथ्वी एडीफीस, सुहाना मसाले, आशा पब्लिसिटी आणि इंडियन मॅजिक आय यांचे सहकार्य लाभले आहे.  ‘यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये तब्बल ३१ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. ज्यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचादेखील सहभाग आहे’,अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.


ते पुढे म्हणाले, ‘बुधवारी, १२ डिसेंबर रोजी या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी तीन ते रात्री १० अशी महोत्सवाची वेळ असेल. गुरुवारी, १३ डिसेंबर व शुक्रवारी, १४ डिसेंबर रोजी महोत्सवाला दुपारी चार वाजता सुरुवात होईल, तर रात्री १० वाजेपर्यंत महोत्सव सुरु राहील. शनिवारी, १५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता महोत्सवाला सुरुवात होईल व आधीच परवानगी मिळाल्याने महोत्सव रात्री १२ पर्यंत चालेल. रविवारी, १६ डिसेंबर रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत महोत्सव पार पडेल.’


महोत्सवाच्या जागा बदलाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, ‘या वर्षी महोत्सव नवीन जागेत होणार आहे त्यामुळे आम्हालाही औत्सुक्य आहे. शास्त्रीय संगीताचे पावित्र्य जपत केलेल्या नवनवीन प्रयोगांना रसिक श्रोत्यांनी आतापर्यंत भरघोस प्रतिसाद आणि दाद दिली आहे. त्यामुळे या वर्षीच्या महोत्सवाचा बदल स्वीकारत पुणेकर आणि देशविदेशातून येणारे रसिक श्रोते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाठीशी उभे राहतील असा आमचा विश्वास आहे.’  

महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे :

बुधवार, १२ डिसेंबर रोजी औरंगाबादचे कल्याण अपार यांच्या सनई वादनाने दुपारी तीन वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पं. अरुण कशाळकर यांचे शिष्य असलेल्या ग्वाल्हेर- आग्रा घराण्याच्या रवींद्र परचुरे यांचे गायन होईल. परचुरे हे मूळचे उज्जैनचे असून सिंगापूर येथील टेंपल ऑफ फाईन आर्ट्स या संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षक आहेत. त्यानंतर दिवंगत सतारवादक अन्नपूर्णादेवी यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने त्यांचे शिष्य बसंत काब्रा यांचे सरोदवादन होईल. त्यानंतर रशीद खाँ यांचे शिष्य प्रसाद खापर्डे आपली गायनसेवा सादर करतील. प्रसाद खापर्डे हे रामपूर-सहसवान घराण्याचे गायक आहेत.त्यानंतरपतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

गुरुवारी, १३ डिसेंबर रोजी बनारस घराण्याच्या डॉ. रिता देव यांच्या गायनाने सुरुवात होईल. देव या दिवंगत गायिका गिरिजादेवी यांच्या शिष्या असून गिरिजादेवी यांना या निमित्ताने आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्याचे युवा गायक सौरभ साळुंखे यांचे गायन होईल. पतियाळा घराण्याचे पं. प्रकाशसिंह साळुंखे यांचे सौरभ हे पुत्र आणि शिष्य आहेत. त्यानंतर प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा यांचे संतूर वादन होईल. सुप्रसिद्ध गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने या दिवसाची सांगता होईल.

शुक्रवारी, १४ डिसेंबर रोजी ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. अपर्णा पणशीकर या भास्करबुवा जोशी आणि मीरा पणशीकर यांच्या शिष्या आहेत. त्यानंतर पंजाबच्या रागी बलवंत सिंग यांचे गायन होणार आहे. रागी बलवंत सिंग हे पंजाबमधील शास्त्रीय संगीताची एक जुनी परंपरा आपल्या सादरीकरणामधून उपस्थित रसिक श्रोत्यांसमोर आणतील. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचे दिवंगत व्हायोलिनवादक डी. के. दातार यांचे शिष्य असलेले मिलिंद रायकर व त्यांचे पुत्र यज्ञेश रायकर हे व्हायोलिन वादन करतील. त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

शनिवारी, १५ डिसेंबर या चौथ्या दिवशी बेंगळुरूचे दत्तात्रय वेलणकर यांच्या गायनाने चौथ्या दिवशीचा महोत्सव सुरु होईल. वेलणकर हे ग्वाल्हेर किराणा घराण्याचे पं. विनायक तोरवी यांचे शिष्य आहेत. यानंतर वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या व गायिका सावनी शेंडे या आपली गायन सेवा सादर करणार आहेत. यानंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरीवादक विवेक सोनार यांचे बासरीवादन होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी हे यानंतर गायन सादर करतील. त्यानंतर आग्रा जयपूर घराण्याच्या गायिका देवकी पंडित यांचे गायन होईल. इंदौरचे ज्येष्ठ गायक पं. गोस्वामी गोकुलोत्सव महाराज हे चौथ्या दिवशी गायन सादर करतील. इमदादखानी घराण्याचे उस्ताद शाहीद परवेज यांच्या सतार वादनाने या दिवसाचा समारोप होईल.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी किराणा घराण्याचे गायकबंधू अर्शद अली व अमजद अली यांचे सहगायन होईल. हे दोघे आपले उस्ताद मामा मशकुर अली खाँ आणि उस्ताद मुबारक अली खाँ यांचे शिष्य आहेत. यानंतर ज्येष्ठ गायक गजानन बुवा जोशी यांच्या नाती अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे सहगायन होईल. यानंतर प्रसिद्ध वीणावदक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिन वादक इंद्रदीप घोष हे सहवादन करणार आहेत. त्यानंतर पं. जसराज यांचे ज्येष्ठ शिष्य आणि गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन होईल. यानंतर सेनिया घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक देबु चौधरी यांचे शिष्य व पुत्र प्रतिक चौधरी हे सतारवादन करतील. यानंतर ज्येष्ठ कथक गुरु पं. बिरजू महाराज आणि त्यांची शिष्या शाश्वती सेन यांची कथक प्रस्तुती होईल आणि परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता होईल.

या वर्षी महोत्सवात रवींद्र परचुरे, बसंत काब्रा, डॉ. रिता देव, रागी बलवंत सिंग, मिलिंद रायकर- यज्ञेश रायकर, दत्तात्रय वेलणकर, विवेक सोनार, प्रतिक चौधरी, सौरभ साळुंखे, अपर्णा पणशीकर, निर्मला राजशेखर, इंद्रदीप घोष हे कलाकार पहिल्यांदाच आपली कला सादर करणार आहेत.


महोत्सवाची तिकीट विक्री 
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी सीझन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार असून, खुर्चीसाठी संपूर्ण सत्रासाठी चार हजार व तीन हजार रुपये तिकीट असेल. यंदाच्या वर्षी भारतीय बैठकीसाठी संपूर्ण सत्राच्या तिकीटाची किंमत ५०० रुपये असून, भारतीय बैठकीसाठी दर दिवसाची तिकिटे २०० रुपयांमध्ये उपलब्ध असतील. हे तिकीट केव्हाही घेता येणार असून, संपूर्ण सीझनमधील कोणत्याही एका दिवशी रसिक श्रोत्यांना ते वापरता येता येणार आहे. खुर्चीसाठीही दर दिवसाची तिकिटे उपलब्ध आहेत. ही तिकिटे रुपये ८०० मध्ये उपलब्ध असतील. 

महोत्सवाची तिकीट विक्री मंगळवारी, चार डिसेंबरपासून सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार असून, शनिपार येथील बेहेरे आंबेवाले, कमला नेहरू पार्क समोरील शिरीष ट्रेडर्स (बोधनी), यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील नावडीकर म्युझिकल्स आणि सहकारनगर अरण्येश्वर येथील अभिरुची फूड्स आदी ठिकाणी ती उपलब्ध असतील. याशिवाय चार डिसेंबरपासून www.esawai.com या संकेत स्थळावर देखील महोत्सवाची ऑनलाईन तिकिटे सकाळी ९ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search