Next
कर्जत, पनवेल, माथेरान परिसर...
BOI
Wednesday, July 17, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

लुईझा पॉइंट, माथेरान‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कर्जत, खोपोली परिसरातील सह्याद्रीच्या खांद्यावर असणारी निसर्गरम्य ठिकाणे व माथेरानसारखे प्रदूषणमुक्त गिरिस्थान...
.....
दोन हजार वर्षांपूर्वी या डोंगराळ भागात बौद्ध साधकांनी चिंतनासाठी शांत परिसर निवडला. त्यांच्या पाऊलखुणा अद्यापही येथे दिसून येतात. कडेकपारीत जंगलात दडलेले किल्ले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण करीत होते. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ही ठिकाणे क्रांतिकारकांना आश्रय देत होती. आज निसर्गप्रेमींची, जास्त करून पदभ्रमण करणाऱ्यांची पावले येथे आपोआप वळतातच. या भागावर शिलाहार, त्यानंतर यादव, निजाम, मुघल, मराठे आणि शेवटी इंग्रजांची राजवट होती. पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग व हमरस्ता याचा भागातून जातो. रेल्वेने जाताना डोळ्यांचे पारणे फिटविणारा खंडाळा घाट, अर्थातच अवघड बोरघाट याच भागातून जातो. याचे वर्णन करणारी माधव जूलियन यांची कविता आठवते. ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी.’

माथेरान : माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. इ. स. १८५०मध्ये या जागेचा शोध त्या वेळच्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यू पोएन्टेज मॅलेट यांनी घेतला. मुंबईचे तत्कालीन राज्यपाल लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून याचा पाया घातला. मॅलेट याला ट्रेकिंगची आवड होती. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला व त्याकडे तो आकर्षित झाला आणि गावाच्या पाटलाला घेऊन तो डोंगर चढून गेला. वनट्री हिल पॉइंटवरून तो वर आला. त्याला हे ठिकाण खूप आवडले. तो परत येथे आला, त्याने येथे छोटे घरही बांधले. त्याच्याबरोबर आणखी इंग्रज अधिकारी आले व त्यांनीही घरे बांधली आणि माथेरान अस्तित्वात आले. 

माथ्यावरील जंगल म्हणून माथेरान हे नाव रूढ झाले. पूर्वी पावसाळ्यात सहसा इकडे कोणी येत नसे. आता पावसाळ्यातही पर्यटक येत असतात. मधुचंद्रासाठी नवपरिणित जोडपीही पायी निसर्गसान्निध्यात फिरण्यासाठी माथेरानला पसंती देतात. माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही येथे आहेत. पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे येथे दिसतात. या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही. 

साधारण २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. माथेरानमध्ये चालत किंवा घोड्यावरूनच फिरावे लागते. कोणत्याही यांत्रिक वाहनाला येथे परवानगी नाही. संपूर्ण पर्यावरणपूरक असे वातावरण येथे जपण्यात आले आहे. फक्त रेल्वे गावात येते. गाड्या गावाच्या बाहेरच दोन किलोमीटर दूर उभ्या कराव्या लागतात. नेरळ-माथेरान रेल्वे :
ही आबालवृद्धांची आवडती रेल्वे आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किलोमीटर अंतर सुमारे दोन तास २० मिनिटांमध्ये पार करताना एक विलक्षण आनंद मिळतो. सह्याद्रीच्या डोंगरातील वळणे, बोगदे ही छोटी गाडी पार करत असताना वेगळाच अनुभव येतो. इ. स. १९०१मध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी १६ लाख रुपये खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. आता ती भारतीय रेल्वेखात्याच्या अखत्यारीत आहे. 

माथेरानमधील पर्यटनस्थळे : 

शार्लोट लेक

शार्लोट लेक :
माथेरानला पाणीपुरवठा करणारा हा तलाव ब्रिटिश राजवटीतच बांधला गेला. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसाचे पाणी अडवून हा तलाव तयार करण्यात आला आहे. हा तलाव गर्द हिरव्या झाडीत असल्याने याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तलावाच्या जवळच माथेरान-इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट आहेत. पावसाळ्यात तलाव भरून वाहू लागल्यावर धबधबा वाहू लागतो. त्याचा आवाज आसमंतात घुमत असतो. पर्यटक हे पावसाळी सौंदर्य टिपण्यासाठी येथे येतात. 

पॅनोरमा पॉइंट : हा पॉइंट सूर्योदय पाहण्यासाठी असला, तरी सूर्यास्तही येथून चांगला दिसतो. येथून पूर्,  पश्चिम बाजूचे विहंगम दृश्य दिसते. पूर्वेला खालच्या बाजूस नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा परिसर दिसतो. पश्चिमेला हाजीमलंगपासून सुरू झालेली डोंगररांग, चंदेरी, पेब अशी एकामागोमाग पॅनोरमाला येऊन मिळते. पूर्वेकडे नेरळ, तसेच सिद्धगडापासून भीमाशंकर ते खंडाळ्यापर्यंतचा भाग दिसू शकतो. पहाटे सहाच्या आधी पॅनोरमावर पोहोचल्यास सूर्योदय बघायला मिळतो. पॅनोरमा मार्केटपासून सर्वांत लांब म्हणजे साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे.

दस्तुरी अथवा माउंटबेरी पॉइंट : माथेरानच्या बाहेर जिथे गाड्या उभ्या करतात, तेथेच प्रवेशद्वारापाशी हा पॉइंट आहे. या पॉइंटच्या पुढे माथेरान पाहण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून जावे लागते. 

वन ट्री हिल पॉइंट : चौक पॉइंट जवळच वन ट्री हिल पॉइंट आहे. येथूनच कलेक्टर मॅलेट पहिल्यांदा माथेरानला आला. इथूनही खाली चौक गाव दिसते. येथील समोर दिसणारा सुळका मुख्य डोंगरापासून अलग झालेला आहे. याच सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते. म्हणून त्याला वन ट्री हिल पॉइंट म्हणतात. हा सुळका म्हणजेच वन ट्री हिल पॉइंट. 

एको पॉइंट : लुईझा पॉइंट ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको पॉइंट आहे. याच्या समोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतीमुळे आवाज केल्यास प्रतिध्वनी (echo) ऐकू येतो. त्यामुळे हा एको पॉइंट. अनेक जण प्रतिध्वनींची मजा लुटण्यासाठी फटाकेसुद्धा घेऊन येतात. 

सनसेट पॉइंट किंवा पॉर्क्युपॉइन पॉइंट : येथून समोर गर्द झाडीत असलेला प्रबळगड दिसतो. समोरचे जंगल खूपच विलोभनीय आहे. प्रबळगडाच्या मुख्य पठाराला लागून एक छोटासा सुळका आहे. या सुळक्याच्या आणि पठाराच्या खिंडीतच बहुतेक वेळा सूर्यास्त होतो. 

लुईझा पॉइंट : इथूनही समोर प्रबळगडाचा देखावा दिसतो. मार्केटपासून सोडेतीन किलोमीटर अंतरावर हा पॉइंट आहे. लुईझाखेरीज चिनॉय, रुस्तुमजी, मलंग, हनिमून या छोट्या-मोठ्या पॉइंट्सवरून सारखेच दृश्य दिसते. लुईझा ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको, एडवर्ड, किंग जॉर्ज हे पॉइंट लागतात. 

इतर पॉइंट : चौक पॉइंट, गार्बट पॉइंट, रामबाग पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, माधवजी पॉइंट, मंकी पॉइंट, हार्ट पॉइंट, मालडुंगा पॉइंट, चिनॉय पॉइंट, रुस्तुमजी पॉइंट, मलंग पॉइंट, एडवर्ड पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, लिटल चौक पॉइंट. गाइड घेतला तरच माथेरान दर्शन व्यवस्थित होते. माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. दस्तुरी पॉइंटला लागूनच एमटीडीसीची रेस्ट हाउसेस आहेत. यांचे बुकिंग मुंबईच्या कार्यालयातून होते. इतर हॉटेल्सदेखील बरीच आहेत. चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत. 

पेब (विकटगड) : नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पेब हे नाव पडले असावे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असेदेखील नाव आहे. ट्रेकर्ससाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. किल्ल्यावर घरे आहेत. त्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धान्य कोठारांसाठी केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. पेबच्या वाटेवरच एक धबधबा आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते. समर्थ रामदासस्वामींचे शिष्य येथे राहत असत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन दरवाजे अवशेष स्वरूपात आहेत. तसेच इमारतींचे अवशेष व पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे एक बुरुज आहे. एक दत्तमंदिर व हनुमानाची मूर्ती येथे पाहायला मिळते. 

भिवगड/भीमगड : महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत, की इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही. त्यापैकीच भिवगड/भीमगड; मात्र ट्रेकिंगच्या सरावातून याची ओळख गिरिभ्रमणाची आवड असलेल्यांना झाली. पुणे-मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा एकदम सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भीमगड. ढाक आणि भिवगड एकाच वेळी करता येते. गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ फक्त चार एकर आहे. कर्जतजवळील वदप व गौरकामत गावामागे छोट्याशा टेकडीवर हा किल्ला आहे. ‘ढाक’ला जाण्याचा मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत पोहोचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘ढाक’ला जाते, तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते. पावसाळ्यात येथे एक धबधबा पाहता येतो. किल्ल्यावर फक्त पाण्याची छोटी टाकी आहेत. भिवगडावर जाताना खोदून काढलेल्या पायऱ्याही दिसून येतात. 

चंदेरी किल्ला : बदलापूर-कर्जत मार्गावर माथेरान डोंगररांगेतच २३०० फूट उंचीवर हा किल्ला आहे. हे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण समजले जाते. घनदाट जंगलातून वर गेल्यावर कातळाचा भला मोठा सुळका दिसतो. किल्ल्यावर एक गुहा आणि तटबंदीचे अवशेष आढळतात. सुळक्यावरून पूर्वेला माथेरान, पेब डोंगररांग दिसते. पश्चिमेला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला दृष्टीस पडतो. येथून परिसराचे विलोभनीय विहंगम दर्शन होते. किल्ल्याचा परिसर पावसाळ्यात अधिकच रमणीय दिसतो. येथे जवळ असणारा धबधबाही मनमोहक आहे. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात. 

ढाकचा बहिरी किल्ला : हे ठिकाण कर्जत तालुक्यात असले, तरी पुण्याहून लोणावळामार्गे व मुंबईहून कर्जतजवळील वदपमार्गे येता येते. लोणावळ्याच्या जवळ असलेल्या राजमाची किल्ल्याजवळच हे ठिकाण आहे. घनदाट जंगलात ढाकचा बहिरी दडून बसला आहे. याची फारशी ओळखही कोणाला नाही; पण धाडसी ट्रेकर्सना हा किल्ला आव्हान देत असतो. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असलेल्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. बहिरीची गुहा (तीन गुहांचा समूह) आणि ढाकचा किल्ला. गुहेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत, तर एका गुहेत शेंदूर फासलेला दगड आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पांथस्थांसाठी टाकीजवळ भांडी ठेवली आहेत. भोजन झाल्यावर ती भांडी साफ करून तेथेच ठेवायची असतात. अशी व्यवस्था करणारे गावकरी दुसरीकडे कोठेही नसावेत. १५०० फूट उंचीची कातळाची खडी भिंत आहे. 

इरशाळगड

किल्ले पन्हाळघर :
रायगडाकडे जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा. किल्ल्याला फारसा इतिहास नाही. ४५० फूट उंचीच्या लहान डोंगरावर हा किल्ला आहे. रायगडच्या संरक्षक शृंखलेतील हा एक किल्ला आहे. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. गडावर तटबंदी शिल्लक नाही. तसेच काही इमारतींचे अवशेष दिसून येतात. 

इरशाळगड

इरशाळगड :
याला किल्ला म्हणण्यापेक्षा शिखर म्हटले तर वावगे ठरणार नाही. ३७०० फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील समजला जातो. इतिहासातही किल्ल्याचा फारसा उल्लेख नाही. मे १६६६मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. गडावरील माचीपासून गडावर जाताना वाटेतच पाण्याचे एक टाके लागते. अशी अनेक टाकी बघण्यास मिळतात. समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. हा ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. ट्रेकर्सच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण समजला जातो. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटना घडली. कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दर वर्षी २६ जानेवारीला मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात. 

कोंडाणे

कोंडाणे बौद्धलेणी :
इ. स. पूर्व २०० म्हणजे २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी म्हणजे भारताच्या गौरवशाली कला व विचार परंपरेच्या साक्षीदार आहेत. कातळात काढलेली लेणी व त्यामधील कोरीव काम थक्क करणारे आहे. सन १८३०मध्ये विष्णू शास्त्री यांनी ही लेणी प्रथम पाहिली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी मिस्टर लॉ यांनी येथे भेट दिली. बौद्ध साधकांना चिंतनासाठी अशी निर्जन स्थळी निर्माण केलेली अनेक लेणी महाराष्ट्रात आहेत. साधारण सातवाहन राजवटीत यांची निर्मिती झाली. पुरातन बोरघाटमार्गे जाणाऱ्या मार्गावरच ही लेणी आहेत. जंगलाने वेढलेली ही लेणी निसर्गाचे लेणे अंगावर घेतल्यासारखी दिसतात. 

यासाठी कोंदिवडे गावापासून साधारण दीड तासाचा ट्रेक करावा लागतो. साधारण अर्ध्या वाटेवर एक सुंदर धबधबा तुमचे स्वागत करतो. त्यानंतर आपण लेण्याजवळ आल्यावरच गुंफा दिसतात. निसर्ग आणि मानवी कला यांचा अप्रतिम संगम आपल्या नजरेसमोर येतो. 

कोंडाणे बुद्धलेण्यांमध्ये एकूण आठ विहार आणि चैत्यगृहे आहेत. यामधील विहार हे सर्वांत जुने आहेत. ही लेणी इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत. कोंडाणे लेणी ही भाजे व पितळखोरा या लेण्यांच्या समकालीन लेणी आहेत. सातवाहन राजाच्या काळात या लेण्यांची निर्मिती झाली असावी, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. येथे असलेल्या शिलालेखात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘कण्हस अंतेवासींना बलकेन कतं’ असा ब्राह्मी लिपीत हा उल्लेख आहे. याचा अर्थ कन्हशिष्य बलक याने हे लेणे निर्माण केले. 

चैत्यगृह

चैत्यगृह :
या लेण्यातील जे चैत्यगृह आहे, त्याच्या दर्शनी भागावरील वातायान हे पिंपळपानाच्या आकारात असून, छत हे गजपृष्ठाकार आहे. या चैत्यगृहाची लांबी २२ मीटर असून, ते आठ मीटर रुंद व ८.५ मीटर उंच आहे. स्तूपाचा परीघ हा २.९ मीटर आहे. सध्या स्तूप क्षतिग्रस्त अवस्थेत आहे. जवळपास दोन हजार वर्षे जुनी सागवान लाकडाची कमान आजही आपणास पाहायला मिळते. चैत्याला स्तंभाचे वलय होते. यातील स्तंभ अष्टकोनी असून, स्तंभावर चिन्हे अंकित आहेत. आज ते भग्नावस्थेत पडलेले आहेत. चैत्याच्या दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे नक्षीकाम आहे. तसेच छज्जे आपणास पाहायला मिळतात. सुंदर असे युगलपटदेखील येथे आहेत. या युगलपटातील पुरुष हे योद्धे असावेत. कारण त्यांच्या हातात शस्त्रे पाहायला मिळतात. त्याच्या खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प प्रत्येक छज्जावर कोरलेले दिसते.

चैत्यगृहाच्या अगदी डाव्या बाजूला भग्नावस्थेतील यक्षमूर्ती दिसते. त्या मूर्तीच्या डोक्यावरील फेट्यावरील नक्षीकाम पाहून त्या वेळच्या कलावैभवाची प्रचिती येते. 

विहार व्हरांडाविहार : चैत्यगृहाच्या बाजूला एक विहार आहे. हा विहार आयताकृती असून, याचा दर्शनी भाग कोसळला आहे. आतमध्ये प्रत्येक बाजूस सहा असे एकूण अठरा भिक्षू निवास आहेत. भिक्षू निवासाच्या दरवाजावर चैत्य गवाक्ष कोरलेले आहेत. त्याशिवाय दरवाजे असल्याच्या खुणादेखील आहेत. संभामंडप ११ मीटर लांब आहे, तर ९.५ मीटर रुंद आहे. छतावर असलेल्या अवशेषांवरून या ठिकाणी १५ स्तंभांची मांडणी असावी असे निदर्शनास येते. 

छताला रंगकाम असल्याचे अवशेष पाहायला मिळतात. सभागृहाच्या बाहेरच्या भागात भिंतीला चैत्यकमानीप्रमाणे पिंपळाच्या पानाच्या कमानीत अर्ध-उठावदार स्तूप कोरलेला आहे. वेदिका पट्टीचे नक्षीकाम आहे. तसेच याच विहाराच्या समोरील भागावर एक शिलालेख कोरलेला आहे, जो सहज लक्षात येत नाही. अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचा सुयोग्य पद्धतीने वापर केलेला असून, त्या वेळच्या जलव्यवस्थापन कौशल्याची चुणूकही येथे दिसते. ‘जेथे लेणी तेथे पाणी’ याची प्रचिती येथे येते. बौद्ध लेण्यातील पाण्याचे टाके वर्षभर भरलेले असते. यामधील पाणी हे अतिशय थंडगार आणि शुद्ध असून पिण्यासाठी योग्य मानले जाते. येथे मधमाश्यांची पोळी असल्याने सुगंधी द्रव्ये मारून जाणे टाळावे. शिवाय कोणत्याही सुगंधी वस्तू सोबत घेऊ नयेत. तसेच पोळ्यांना धक्का लागेल असे काहीही करू नये. 

मुंबईमार्गे व पुणेमार्गे कर्जत या रेल्वे स्थानकात उतरून कर्जत येथील मुख्य रस्त्यावर, ब्रिजवर कोंढाणे लेण्याकडे जाण्यासाठी खासगी वाहने असतात. (अधिक माहितीसाठी http://abcprindia.blogspot.com/)

कोथलीगड

कोथलीगड :
हा पेठकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून दगडातून कोरून काढलेला एक जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकाराचे बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कर्जतच्या पूर्वेसच हा किल्ला आहे. या छोटेखानी किल्ल्यावर शिवकाळामध्ये शस्त्रागार होते. तसेच याचा उपयोग टेहळणीसाठीही होत असावा. येथील निसर्गसौंदर्य ट्रेकर्सना मोहात टाकते. येथे कातळाचे शिखर व गुहापण आहे. 

कोथळीगड

आंबिवली बौद्धगुंफा :
कोथळीगडाच्या पायथ्यातच आंबिवली बौद्धगुंफा आहेत. येथे पाण्याच्या टाक्या, १२ विहार आहेत. ब्राह्मी लिपीतील एक शिलालेखही आहे. ही लेणी कोथळीगडाबरोबरच बघता येतात. आवर्जून बघावीत अशी ही लेणी आहेत. 

आंबिवली

कोथळीगडप्रबळगड : पनवेलच्या पूर्वेस खालापूर तालुक्यात हा किल्ला आहे. माथेरानच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून २३२५ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मुघलांकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यावर खजिना मिळाला असे म्हणतात. सन १८१८मध्ये येथील तटबंदी व बुरुज ढासळले आहेत. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी काही काळ येथे आश्रय घेतला होता. किल्ल्यावर काही इमारतींचे जोते आढळून येते.
 
कसे जाल कर्जत परिसरात?
कर्जत, पनवेल ही शहरे रेल्वे व रस्त्याने जोडलेली आहेत. जवळचा विमानतळ मुंबई. राहण्यासाठी माथेरान, पनवेल, डोंबिवली येथे व्यवस्था होऊ शकते. माथेरान सोडले तर बहुतेक ठिकाणी ट्रेकर्सना तेथील गावात किंवा किल्ल्यावरील देवळात गुहेमध्ये मुक्काम करता येतो. अतिपावसाचा जुलै महिना सोडून कधीही जावे. अर्थात यातील काही ठिकाणे दुर्गम आहेत. आपले वय आणि तब्येत या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करावे. 

(या भागात, तसेच रायगडच्या बहुतेक भागाच्या लेखांसाठी लेणी अभ्यासक आयु. मुकेश जाधव यांचे सहकार्य झाले.)

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

पन्हाळेदुर्ग

सिद्धगड

कोथळीगडाजवळची गुंफा
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search