Next
नोआची नौका
BOI
Sunday, August 18, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

एडवर्ड हिक्स या चित्रकाराने १८४६मध्ये काढलेले नोआच्या नौकेचे चित्र

अखंड अतिवृष्टीमुळे संपूर्ण पृथ्वी जलमय झाल्याची कथा बायबलमध्ये आली आहे. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज सांगत आहेत त्या कथेबद्दल...
..........
महाराष्ट्रात यंदा पिण्याच्या पाण्याचे हाल होणार काय, असे म्हणता म्हणता ‘ओला दुष्काळ’ पडून सर्वत्र महापुराने हाहा:कार माजवला आहे. खूप वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सन २००४मध्ये सुमात्रा-अंदमानच्या भूकंपामुळे भारताच्या आग्नेय किनारपट्टीला बसलेला त्सुनामीचा जबरदस्त फटका आणि जून २०१३मध्ये उत्तराखंडातील केदारनाथला ढगफुटीमुळे झालेला महाविनाश आपण विसरू शकत नाही. काही काळ अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी ही परिस्थिती! मग काही महिने किंवा काही कारणाने वर्षभर पाऊस पडत राहिला तर काय अवस्था होईल! तीच गोष्ट, सूर्यनारायण अखंड आग ओतत राहिला तर होणार! अखंड अतिवृष्टीमुळे संपूर्ण पृथ्वी जलमय झाल्याची कथा बायबलमध्ये आली आहे. तीच ‘संपूर्ण मानवजात आणि पशुपक्ष्यांचे रक्षण करणारी नोआची नौका!’

अरावत पर्वत, अर्मेनिया

पृथ्वीला पापांचा भार सहन होईनासा झाला, की महाप्रलय येतो. त्यात सर्व जीवसृष्टीचा नाश होऊन काही काळाने पुन्हा नवनिर्मितीला सुरुवात होते. जगभरातील पौराणिक वाङ्मयातून अशा कथा आढळतात. त्यात काळाच्या संदर्भात मात्र खूपच तफावत आढळते. आपल्या सृष्टीची निर्मिती इसवी सनापूर्वी ४००४ या वर्षी झाली, असा उल्लेख बायबलमध्ये आहे. आधुनिक विज्ञान तोच काळ ४५० कोटी वर्षे मागे नेतो. पंचांगातील कालगणनेनुसार कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चतुर्युगांची (एक महायुग) एकूण ४३ लाख २० हजार वर्षे असतात. अशी ७१ महायुगे झाली की एक मन्वंतर होते. चार युगे एक हजार वेळा येऊन गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढीच त्याची रात्र आहे. असे ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य १०० वर्षे! (काढा एकूण आपली सौर वर्षे). याप्रमाणे ब्रह्मदेवाची आतापर्यंत ५० वर्षे होऊन गेली. म्हणजे ‘बिग बँग’ची घटना इतक्या वर्षांपूर्वी झाली. आधुनिक विज्ञानानुसार तो काळ १३५० कोटी वर्षे भरतो. (त्याबाबत (‘बिग बँग’) हल्ली शंका व्यक्त केली जात आहे.) ते काहीही असो - भारतीय गणना आणि वैज्ञानिक कालमापन यांच्यात फारशी तफावत नाही, हे विशेष! आणि आपली गणना फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

पुन्हा बायबलकडे वळू या. त्यात दिलेली इ. स. पू. ४००४ वर्षे ही मानवी वर्षे न धरता (आपल्या) ब्रह्मदेवाची धरल्यास ती बरोबर ठरू शकतील. प्राचीन वाङ्मयात काही कूट, गूढ गोष्टी असतात. त्याचा अर्थ संदर्भांनी लावावा लागतो. ‘बुक ऑफ जेनेसिस’मध्ये ‘नोआच्या नौके’ची कथा नाट्यपूर्ण रीतीने सांगितलेली आहे. मानवाने दुष्ट कर्मे आणि पापांची परिसीमा गाठल्यामुळे प्रचंड महापुराने पृथ्वीचा सर्व भूभाग गिळंकृत केला आणि आधीचे ‘मन्वंतर’ संपुष्टात आले. कालांतराने, जमिनीतून पुन्हा नवे कोंब बाहेर येऊन पुढच्या महापर्वाची सुरुवात झाली. बायबलच्या मते ही नैसर्गिक घटना नसून, दैवी प्रकोप होता. ‘नोआ’ नावाच्या एका सच्छील, सत्प्रवृत्त माणसामुळे आणि देवाच्या असीम दया-कृपेमुळे पुन्हा नवनिर्मिती होऊ शकली.त्या काळात (आपले कृत-त्रेता युग) लोक खूप वर्षे जगत असत. नोआ हा अॅडमच्या दहाव्या पुरुष पिढीतला सदस्य. आधीच्या पिढीतल्या लोकांना त्यांच्या ६५ ते १९० वर्षांच्या दरम्यान मुले-बाळे झाली. त्यांना हजार नाही तरी ९०० वर्षांपर्यंतचे आयुष्य लाभले. नोआच्या आजोबांचे महापुरात ९६९व्या वर्षी निधन झाले. नोआला तीन मुले झाली - शेम, हॅम, आणि जाफेथ; पण तोपर्यंत तो ५०० वर्षांचा होऊन गेला होता. बायबलच्या कथेप्रमाणे त्या मुलांच्या जन्मानंतर १०० वर्षांनी - अॅडमच्या निर्मितीला १६५६ वर्षे झाल्यावर ‘तो’ जगबुडी करणारा महापूर आला. मोठमोठे पर्वतसुद्धा त्यात बुडून गेले. हिंसा, दुष्टपणा, निर्नायकी स्थिती आणि ‘हम करे सो कायदा’ या सगळ्या गोष्टींचा अतिरेक झाल्यानंतर ईश्वराकडे ‘महाप्रलया’शिवाय दुसरा उपायच उरला नाही. समस्त मनुष्यप्राणी, सर्व जनावरे आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा ‘परलोकी’ पाठवण्यात आले. ‘अशा प्राण्यांना मी जन्माला घातलं, याचा मला पश्चात्ताप होतो,’ असे त्या वेळी ईश्वर म्हणाला.

नोआ हा एकमेव पुरुष देवाच्या कृपेला पात्र ठरला. त्याचे आचरण पावित्र आणि चारित्र्य शुद्ध होते. भविष्यकालीन महाप्रलयातून फक्त त्याचे कुटुंब वाचणार होते. त्याच्यापासूनच पुढे पुन्हा मानवजात निर्माण होणार होती. जलप्रलय होत असताना देवाने नोआला एक विशाल, नौकेसारखे जलयान बनवायला सांगितले. त्यात खोल्या असाव्यात आणि पावसापासून रक्षणासाठी वरून जलरक्षक छत बांधावे, अशी सूचनाही दिली. त्यानुसार त्याने बांधलेली नौका तीन मजली होती - ४५० फूट लांब, ७५ फूट रुंद आणि ४५ फूट उंच!

त्या नौकेवर नोआ, त्याची पत्नी, तीन मुले आणि त्यांच्या बायका एवढेच मानवी प्रवासी होते. जलचर वगळता जमिनीवरचे सगळे प्राणी महापुरात नष्ट होणार होते. म्हणून प्रत्येक प्रजातीची किमान एक नर-मादी जोडी नौकेवरून नेण्याचे ठरले. नोआ कुटुंबाने त्यांना जिवंत ठेवण्याचा निश्चयच केला. नोआ ६०० वर्षांचा असताना १७ फेब्रुवारीला त्या भयानक पुराची सुरुवात झाली. आकाशातला सगळ्या ‘खिडक्या’ उघडल्या आणि अतिवृष्टी सुरू झाली. जमिनीखालूनसुद्धा जिवंत पाण्याचे झरे वर येऊ लागले. असे दुहेरी महाअरिष्ट ओढवले.

पाऊस ४० दिवस अहोरात्र पडत होता. उंच पर्वतांची शिखरेसुद्धा २० फूट पाण्याखाली गेली. नौकेवरचे ‘प्राणी’ सोडून पृथ्वीवरचे सर्व ‘जीव’ जल-समाधिस्थ झाले. चाळीस दिवसांनी पाऊस थांबला. पृथ्वीवर वारे वाहू लागले. सगळीकडचे पाणी हळूहळू ओसरू लागले. महापूर आला त्यानंतर १५० दिवसांनी (१७ जुलै) नौका ‘अरावत’ पर्वतापाशी जाऊन पोचली. (हा पर्वत पूर्व तुर्कस्तान आणि आर्मेनियाच्या सीमेवर आहे. त्याची लहान-मोठी दोन शिखरे आहेत. त्यातले उंच शिखर ५१६५ मीटर्स उंचीचे आहे, तिथे नौका गेली. दुसरे ३८९६ मीटर्स उंच आहे.)

त्यानंतर नोआ काही महिने नौकेतच राहिला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नोआने प्रथमच नौकेवरचे आच्छादन काढले आणि बाहेर डोकावला. त्याला सुकलेली जमीन दिसली. २७ फेब्रुवारीला (एक वर्ष आणि १० दिवसांनी) नोआ आपले कुटुंब आणि पशु-पक्ष्यांसह नौकेतून खाली उतरला. त्याने आधी एक यज्ञकुंड उभारले आणि त्यात काही प्राण्यांची आहुती दिली. देव प्रकट झाला आणि त्याने नियमित ऋतूंचा प्रारंभ केला. मानव आणि पशु-पक्ष्यांना पुन्हा महापुराच्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही, असा आशीर्वादही दिला. नोआच्या कुटुंबापासून नव्या पुनरुत्पादनाला सुरुवात झाली.

बायबलमधली ही कथा शेकडो वर्षे आबालवृद्धांमध्ये प्रिय ठरलेली आहे. ‘नोआचा महापूर’ खरोखरच आला होता का? संशोधक, पुरातत्त्वज्ञ त्याचा शोध घेत आलेले आहेत. मेसोपोटेमियात, टायग्रिस-युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात विनाशकारी महापुराच्या खुणा १९२९मध्ये मिळाल्या. त्याचा काळ इ. स. पू. ३५०० वर्षे असा येतो. अरावत पर्वतावर बऱ्याच जणांनी ‘त्या’ नौकेचा तपास घेतला. बर्फाच्छादित प्रदेशात, उंचावर उत्खनन किंवा अन्य प्रकारे शोध घेणे हे काम अत्यंत खर्चिक आणि कष्टाचे आहे. पर्वताच्या १४ हजार फुटांवर एका फ्रेंच उद्योजकाला लाकडाचे (काम केलेले) काही अवशेष १९५५मध्ये मिळाले. परंतु त्याचा काळ फार मागे जात नाही.हिंदू, ज्यू, ख्रिश्चन, इस्लामच्या धार्मिक वाङ्मयात विनाशकारी महापुराच्या कथा आलेल्या आहेत. आपल्या मनूने नोआसारखीच विशाल नौका बनवली होती. त्यात सर्व प्रकारचे प्राणी (सगळ्या प्रजाती टिकाव्यात म्हणून) चढवले. शिंग असलेल्या एका महाकाय माशाने ती नौका महापुरातून सुरक्षितपणे भारताच्या उत्तरेला असलेल्या मलय पर्वतापर्यंत नेली. त्याच्या शिखराला नौका जाडजूड दोरखंडाने बांधण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर मनू हळूहळू खाली उतरत गेला. वृक्षवल्ली नव्याने उगवू लागल्या. एका नव्या मन्वंतराची सुरुवात झाली.नद्यांना लहान-मोठे पूर येतच असतात. पुण्यातील १९६१मधला पानशेतचा प्रलय आठवा. कोरडा दुष्काळ आणि नंतर ओला दुष्काळ ‘नेमेचि’ येतच असतो. सिंधू संस्कृतीवर महापुरांचे आणि नंतर दुष्काळाचे आघात झाले. परिणामी, तेथील लोक सर्व दिशांना पसरले. नदी/जलाशयांच्या काठीच मानवाची वस्ती असते. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली, की आजूबाजूचा बराचसा भाग पाण्याखाली जातो. समुद्रकिनाऱ्यांनासुद्धा उंच लाटांचे तडाखे बसून प्रचंड विध्वंस होत असतो.

संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करणारे महापूर हजारो वर्षांनी एकदाच येतात. या नैसर्गिक महाआपत्ती रोखणे मानवाच्या हाती नाही. नंतरचे मदतकार्य आपण करू शकतो. विनोबाजी म्हणायचे, ‘अणुबॉम्बची मला भीती वाटत नाही. तलवारी/बंदुका जास्त धोकादायक - कारण, अणुबॉम्ब हा ईश्वराच्या इच्छेशिवाय कोणी टाकू शकत नाही. छोट्या शस्त्रांनी होणारी हानी टाळता आली पाहिजे.’

त्याच चालीवर - दुष्काळ, पाणीटंचाई, रोगराई, कुपोषण यांच्यासारख्या समस्या सोडवणे आपल्या (शासनाच्या) हातात आहे. नोआ किंवा मनूच्या महापुरासारखे अरिष्ट ओढवले, तर त्यातून निसर्गक्रमानेच बाहेर पडता येते.

२०१४ साली ‘नोआ’ हा इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात रसेल क्रोने ‘नोआ’ साकार केला आहे. त्याच्या आजोबांच्या भूमिकेत आहे अँथनी हॉपकिन्स. हिंदी निर्मात्यांनी अद्याप मनूकालीन महापुरावर चित्रपट बनवलेला नाही. तसा योग आलाच तर, पाच-सहाशे वर्षांचा ‘मनू’ उभा करण्यासाठी आपल्याकडे एकमेवाद्वितीय अभिनेता आहे - अमिताभ बच्चन!

सध्या ठिकठिकाणी आलेल्या महापुरांचे चित्रीकरण मात्र आत्ताच करून ठेवावे. म्हणजे पुढे सोयीचे होईल!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pradip Navale About 34 Days ago
Really wonderful information. Thanks for making aware.
0
0

Select Language
Share Link
 
Search