Next
पंढरपुरात भक्तीचा महासागर
मोहन काळे
Monday, July 23 | 02:18 PM
15 0 0
Share this storyपंढरपूर :
आषाढी वारीसाठी सोमवारी (२३ जुलै २०१८) पंढरपुरात भक्तीचा महासागर लोटला असून, हरिनामाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली आहे. शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा अनिल गंगाधर जाधव (३७) आणि  वर्षा अनिल जाधव (३५) या दाम्पत्याला मिळाला. हे वारकरी दाम्पत्य हिंगोली जिल्ह्यातील भगवंती कडोळी (ता. शेणगाव) येथील हे आहे. हे दाम्पत्य गेल्या चार वर्षांपासून पायी वारी करते. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या या दाम्पत्याला मुलगा आणि दोन मुली असून, ते दर वर्षी मुलाला वा मुलीला घेऊन वारी करतात. यंदाचे मानाचे वारकरी दर वर्षीपेक्षा अधिक भाग्यवान आहेत. दर वर्षी मानाच्या वारकऱ्यांना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळत असला, तरी प्रत्यक्ष पूजेचे सर्व विधी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते होत असतात; मात्र यंदा मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरला न जाण्याचे जाहीर केले; मात्र शासकीय पूजा वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे यंदा या वारकरी दाम्पत्याला हा मान मिळाला. शासकीय पूजा सुरू होण्याच्या आधीच दर्शन मंडपाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले जाते. मंडपातून मंदिरात येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये जे माळकरी आहेत, ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे, जे सहकुटुंब पायी वारी करतात, अशा वारकऱ्यांनाच हा मान मिळतो.या महापूजेला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खासदार अनिल देसाई यांची उपस्थिती होती. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे रविवारीच (२२ जुलै) पंढरपुरात दाखल झाले होते. सोमवारीही जवळपासच्या दिंड्या पंढरपुरात येतच होत्या. एकूणच पंढरपुरात भाविकांची दाटी झाली होती. चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी दोन्ही तीरांवर गर्दी केली होती. चंद्रभागेत स्नान करून भाविकांनी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांची पावले विठ्ठल मंदिराकडे वळली. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चंद्रभागेचे सर्व घाट फुलून गेले होते. महाद्वार व पश्चिम द्वारातही मोठी गर्दी झाली होती. ९६ एकर क्षेत्रात भाविकांनी तंबू उभे केले असून, तिथेच भाविक भजन व कीर्तनात दंग झाले आहेत. विविध मठांमध्येही हरिनामाचा गजर घुमू लागला आहे.

(यंदाच्या वारीची क्षणचित्रे दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 178 Days ago
chan👌
0
0
ओंकार कामतकर, सोलापूर About 178 Days ago
सर्वात आगोदर बातमी वाचायला मिळाली . व्हिडीओ सुंदर आहे . घरबसल्या पंढरपुरातील आषाढी वारीचा सोहळा पहायला मिळाला .
0
0

Select Language
Share Link