Next
‘हिंजवडीचे पर्यायी रस्ते एप्रिलपर्यंत करा’
प्रेस रिलीज
Friday, December 08 | 12:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘बाणेर ते हिंजवडी फेज तीन रस्त्यावरील पुलाचे काम एका महिन्यात संपवून हा मार्ग व चांदे-नांदे रस्ता ही सर्व कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करा,’ असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. चांदे-नांदे रस्त्याचे काम एका महिन्यात सुरू करण्याचा आग्रह बापट यांनी ‘एमआयडीसी’कडे धरल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विशेष बाब म्हणून या रस्त्याच्या कामाचे टेंडर एका महिन्यात काढण्याचा निर्णय या बैठकीत घेतला.

हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या सोडवण्याबाबत पालकमंत्री बापट यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्यासोबत मंत्रालयात एक विशेष बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तसेच हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्र्यांनी हिंजवडी येथील आयटी कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नाबाबत सध्याच्या रस्त्यांना पर्यायी रस्ते, चांदे–नांदे रस्ता; तसेच फेज तीनकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत संबंधित सेझ कंपनी, जागामालक यांच्याशी चर्चा पूर्ण करण्याची सूचना केली. हिंजवडी फेज तीनकडे जाणारे रस्ते एप्रिलपर्यंत पूर्ण करा. या कामांसाठी एमआयडीसी आणि हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पाहणी करण्याचे निर्देश ही बापट यांनी या वेळी दिले.

‘बाणेर ते हिंजवडी फेज तीनकडे जाणारा रस्ता ताब्यात घेऊन एका महिन्यात त्याचे टेंडर काढण्यात येईल. हिंजवडी येथील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आग्रहामुळे विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे उद्योगमंत्री देसाई यांनी बैठकीनंतर सांगितले.

‘चांदे-नांदे रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण करून हा रस्ता चौपदरी करावा,’ अशा सूचना बापट यांनी जिल्हाधिकारी आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना केल्या. बापट यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी या आठवड्यात जिल्हा परिषदेशी चर्चा करणार आहेत. चांदे-नांदे रस्ता सुरू झाल्यानंतर माण येथील पूल पाडून तो चौपदरी केला जाईल.

बैठकीदरम्यान बापट यांनी सुभाष देसाई यांना हिंजवडी येथील आयटी पार्कमधील घनकचरा व्यवस्थापन हा विषय ही गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार ‘या पुढील काळात ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या एमआयडीसी तेथील कर गोळा करतील आणि त्या भागातील रस्ते दिवा-बत्ती आणि घनकचरा व्यवस्थापन करतील,’ असे देसाई यांनी जाहीर केले. त्यानुसार यापुढे हिंजवडी ‘एमआयडीसी’तील कचरा व्यवस्थापनाचे काम ‘एमआयडीसी’ करणार आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’ने हिंजवडी येथे जागा राखून ठेवली असून, येत्या महिन्यात या कामाची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

चाकण येथील इन्फ्रा चार प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्र्यांच्या आग्रहानुसार देसाई यांनी ‘शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत उच्चाधिकार समितीची बैठक याच महिन्यात नागपूर अधिवेशनादरम्यान १४ किंवा १५ डिसेंबरला घेण्यात येईल,’ असे जाहीर केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link