Next
कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून ‘मालविकाग्निमित्र’; अमेरिकेत गोळा होतोय बालकांसाठी निधी!
बेंगळुरूमधील धातू पपेट थिएटरतर्फे सादरीकरण
मनू शाह, ह्युस्टन
Friday, August 02, 2019 | 03:04 PM
15 0 0
Share this article:बेंगळुरूमधील धातू पपेट थिएटरने महाकवी कालिदासाचे मालविकाग्निमित्र हे नाटक कळसूत्री बाहुल्यांच्या आधारे बसविले आहे. त्याचे प्रयोग सध्या अमेरिकेत गर्दी खेचत असून, त्याद्वारे विश्व हिंदू परिषदेच्या ‘सपोर्ट ए चाइल्ड’ या उपक्रमासाठी निधी गोळा केला जात आहे. त्या निमित्ताने....
................
पाच हजार वर्षांपूर्वीची कथाकथनाची कला आजच्या आधुनिक जगात पाहायला मिळणे हा अद्भुत अनुभवच म्हणायला हवा. कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातील जादू आजही कायम आहे. याचाच अनुभव सध्या अमेरिकेत येत आहे. कविकुलगुरू कालिदासाचे ‘मालविकाग्निमित्र’ हे नाटक बेंगळुरूमधील धातू पपेट थिएटरने कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून बसविले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही प्राचीन कला पाहायला मिळत आहेच; शिवाय या दुर्मीळ कलेचे पुनरुज्जीवन होत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या अमेरिकेतील केंद्राद्वारे चालवण्यात येणाऱ्या ‘सपोर्ट ए चाइल्ड’ (एसएसी) या उपक्रमासाठी निधी गोळा करण्याकरिता ‘धातू’तर्फे अमेरिकेतील २१ शहरांमध्ये या रचनेचे सादरीकरण होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्याती मिळालेल्या बेंगळुरूमधील कलाकार अनुपमा होसकेरे आणि त्यांच्या सहकलाकारांनी आतापर्यंत अमेरिकेतील आठ शहरांमध्ये हे प्रयोग केले असून, प्रत्येक प्रयोगाने गर्दी खेचली आहे. होसकेरे या एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहेत. महाकवी कालिदासाने लिहिलेली राजा अग्निमित्र आणि मालविकाची प्रेमकथा त्यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जिवंत केली आहे. सुंदर सजवलेल्या कळसूत्री बाहुल्या, तारांची कौशल्यपूर्ण हाताळणी, सोबतीला भरतनाट्यम नृत्यांगनेचे उत्तम सादरीकरण आणि इंग्रजी भाषेतील प्रभावी कथन यांचा अनोखा मिलाफ या ७० मिनिटांच्या प्रयोगात पाहायला मिळतो. युवा पिढीलाही याची भुरळ पडत आहे. त्यांनी नक्कीच बघावा असा हा देखणा प्रयोग आहे. (नाटकाचा ट्रेलर शेवटी दिला आहे.)

इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या होसकेरे यांनी स्वत: या कळसूत्री बाहुल्या बनवल्या असून, आतापर्यंत त्यांनी अशा ५७५ बाहुल्या तयार केल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा राज्य संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. या अमेरिका दौऱ्यादरम्यानच त्यांना ही आनंदाची बातमी मिळाली. विश्व हिंदू परिषदेच्या ‘सपोर्ट ए चाइल्ड’ या उपक्रमासाठी निधी उभारणीकरिता या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले असून, निरक्षरता निर्मूलनासाठी १९८५मध्ये सुरू झालेल्या ‘सेवा’ उपक्रमाचा हा भाग आहे. केवळ शिक्षणच मुलांचे आणि देशाचे भविष्य बदलू शकते, पिढ्यान्पिढ्यांचे दारिद्र्य मोडीत काढू शकते आणि संधीची दारे उघडू शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी या माध्यमातून निधी गोळा केला जातो. 

अमेरिकेच्या या दौऱ्यापूर्वी होसकेरे यांनी ‘एसएसी’च्या एका वसतिगृहाला भेट दिली होती. तिथे मुलांना देण्यात येणारे शिक्षण, व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण हे पाहून त्या अतिशय प्रभावित झाल्या. तिथे असलेली स्वच्छता पाहून तर त्या थक्क झाल्या. ‘एसएसी’साठी निधी उभारणे ही सेवेची संधी आहे, याची जाणीव त्यांना झाली. 

‘सेवा’च्या उपाध्यक्षा रेणू गुप्ता यांची या उपक्रमामागे मुख्य प्रेरणा आहे. ‘सेवा’द्वारे १५ राज्यांमधील ३०हून अधिक वसतिगृहांमधील २५०० मुलांना आधार देण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागातील, अनाथ, तसेच घरातून पळून आलेली आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुले या वसतिगृहात राहत आहेत. रेणू गुप्ता आणि त्यांचे पती अरुण गुप्ता यांनी या कार्यात झोकून दिले असून, त्यांच्या प्रत्येक भारतभेटीच्या वेळी ते एका वसतिगृहाला भेट देतात. 

नाशिकमधील हरसूल येथील हॉस्टेलमधील मुली

या मुलांना बारावीपर्यंत शिक्षण देण्यात येते. अर्थात येथे फक्त शिक्षण नाही, तर योग, संगीत, कला, क्रीडा आणि मूल्ये यांचेही शिक्षण देण्यात येते. मुलांना महाविद्यालयात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांनी अभियंता, डॉक्टर आणि व्यावसायिक बनावे यासाठी प्रयत्न केले जातात. राष्ट्रकुल ऑलिम्पिकपदक विजेती कल्पना राऊत ही ‘एसएसी’ची विद्यार्थीनी आहे. स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी सेजल नायरदेखील ‘एसएसी’च्या प्रकल्पात वाढलेली आहे. येथे आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभी राहिलेली मुले परत आपल्या गावाला गेली, की तेथील समाजाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतात, ही बाब खूप आनंददायी आहे. 

एक सुरक्षित आश्रयस्थान आणि शिक्षण देण्यासह ‘एसएसी’द्वारे शिलाईकाम, संगणक, यांत्रिकी, वाहन दुरुस्ती आणि व्यावसायिक ड्रायव्हिंग आदी कौशल्यांचेदेखील प्रशिक्षण दिले जाते.

‘एसएसी’साठी वार्षिक निधी उभारण्याच्या उपक्रमाद्वारे २५०० मुलांसाठी निधी उभारला जातो. यंदा मात्र हे लक्ष्य २९०० मुलांसाठी मदतनिधी उभारण्याचे होते. वर्षाला फक्त २५० डॉलर्सची देणगी एका मुलाला नवीन जीवन देऊ शकते. अशी देणगी देणाऱ्या व्यक्तीला त्या मुलाचा फोटो, माहिती, शैक्षणिक अहवाल देण्यात येतो. देणगीकर्त्यांनी मुलाच्या संपर्कात राहावे, त्याच्या वसतिगृहाला भेट द्यावी यासाठी प्रोत्साहन दिले जाते. 

‘धातू’ने १३ जुलैपासून आठ शहरांमध्ये सादरीकरण केले असून, आगामी प्रयोग सिनसिनाटी, डेट्रॉइट, क्लीव्हलँड, लुईसविले, पिट्सबर्ग, कोलंबस, अलेन्टटाउन, हार्टफोर्ड, स्टेटन आयलँड, सॉमरसेट, बोस्टन आणि अटलांटा येथे होणार आहेत.

‘सपोर्ट ए चाइल्ड’ उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी वेबसाइट : https://www.supportachildusa.org/

(To read this in English, please click here.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search