Next
जिद्द गगनभरारीची...
BOI
Wednesday, April 11, 2018 | 04:21 PM
15 0 0
Share this story


मुंबई/चंद्रपूर : जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर गगनालाही गवसणी घालता येते, याची प्रचीती यावी असाच एक क्षण अवघा महाराष्ट्र सध्या अनुभवत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प सोडला आहे. आज (११ एप्रिल) ही दहा मुले ‘मिशन शौर्य’ असे नाव असणाऱ्या या स्वप्नवत मोहिमेसाठी मुंबईहून काठमांडूला प्रयाण करत आहेत.  

चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील ही आदिवासी मुले असून, येथील आदिवासी विभागाच्या पुढाकाराने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चाललेल्या सात टप्प्यांतील प्रशिक्षणानंतर ही मुले या गिर्यारोहण मोहिमेसाठी सिद्ध झाली आहेत. आश्रमशाळेतील आकाश चिन्नू मडावी, शुभम रवींद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडुरंग काटमोडे, मनीषा धर्मा धुर्वे, प्रमेश सीताराम आडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम या मुलांचा मोहिमेत सहभाग आहे. 

या मुलांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना या मोहिमेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी चंद्रपूर येथे नुकत्याच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी गेल्या वर्षभरात केलेल्या खडतर परिश्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. काही मिनिटांच्या या चित्रफितीनेही या मुलांमधील साहसाची कल्पना आली. एव्हरेस्ट चढून जाणे हे नक्कीच सोपे काम नाही त्यासाठी जिद्द, चिकाटी लागते आणि ती या मुलांमध्ये आहे, याचीही प्रचीती या चित्रफितीवरून आली. याप्रसंगी राज्याचे काही मंत्री आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलांना भेटवस्तूही देण्यात आल्या. 

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘आदिवासी विकास विभागा’मार्फत येथील मुलांसाठी अनेकविध नवनवीन उपक्रम राबवले जातात. या भागात असलेल्या आश्रमशाळांच्या माध्यमातून हे कार्य केले जाते. मुलांच्या शारीरिक, शैक्षणिक विकासावर भर देतानाच त्यांचा मानसिक आणि सर्वांगीण विकास होण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. एव्हरेस्टची ही मोहीम म्हणजे मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांपैकी एक आहे. 

साहसी खेळांमुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो, या दृष्टिकोनातून विचार करून, आदिवासी विकास विभागाने १७ ते २१ वयोगटातील विद्यार्थांना या मोहिमेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रयत्न सुरू केले.  

एव्हरेस्ट मोहीम प्रकल्पाची सुरुवात अशी झाली....
चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि चंद्रपूरचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या सहयोगाने जुलै २०१७मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. चंद्रपूर येथील आदिवासी आश्रमशाळांमधून शारीरिक आणि मानसिकरीत्या कणखर असलेल्या इच्छुक ६० मुलांना सुरुवातीला घेण्यात आले. त्यातून ४५ मुलांची निवड करून त्यांना प्राथमिक प्रशिक्षणासाठी वर्ध्याला पाठवण्यात आले. त्यानंतर हैदराबाद येथील भोनगिर येथे काही धाडसी खेळांसाठी या मुलांना पाठवण्यात आले. तेथून साधारण १८ मुलांची निवड करण्यात आली आणि नोव्हेंबर २०१७ मध्ये गिर्यारोहण अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी या १८ मुलांना दार्जीलिंगला पाठवण्यात आले. पुढे १८ पैकी १३ विद्यार्थ्यांची निवड जानेवारी, २०१८मध्ये लेह-लडाख येथील १२ दिवसीय हिवाळी गिर्यारोहण अभ्यासक्रमासाठी करण्यात आली.

१७ हजार फुटांवर चढाई करणे, तेथील परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेणे, एकमेकांच्या सहकार्याने छोट्या-मोठ्या अडचणी दूर करणे अशा गोष्टींबाबतचे महत्त्वाचे प्रशिक्षण लेह-लडाख येथे या मुलांना देण्यात आले. दरम्यान या सगळ्या मोहिमेच्या तयारीचा त्यांच्या शैक्षणिक बाबींवर परिणाम होऊ नये याचीही पुरेपूर काळजी आश्रमशाळांनी घेतली आहे. मुलांच्या पालकांनीही यामध्ये पूर्ण सहकार्य केले आहे. 

ही मोहीम सुरू करत असताना अंतिम टप्प्यात आवश्यक त्या गोष्टींची, सुविधांची आणि व्यवस्थेची पूर्तता करण्यात आली आहे. या मुलांसोबत १५ जणांचा स्टाफही असणार आहे. यामध्ये डॉक्टरांचाही सहभाग आहे. या सर्व मुलांचा गिर्यारोहक विमा काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादानंतर हे गिर्यारोहक काठमांडूसाठी प्रयाण करतील. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link