Next
ठाण्यात रंगणार ८५ तासांचे विश्वविक्रमी कविसंमेलन
BOI
Monday, March 18, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : यंदाचे वर्ष गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांचे जन्मशताब्दी, भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे स्मृती शताब्दी, न्यानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचे १०१ जयंती वर्ष, मराठी मनाचा मानबिंदू पु. ल. देशपांडे (पुलं) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून ‘पोएट्री मॅरेथॉन : एक काव्य महोत्सव’ या महा कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन १८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर २१ एप्रिलला रात्रीपर्यंत सलग ८५ तास कविसंमेलन होणार आहे.

अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे हे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये होईल. या संमेलनात राज्यातील एक हजार कवी सहभागी होणार असून, या विक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘भारत बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष डॉ. शंकर ऊर्फ राज परब, उपक्रम प्रमुख डॉ. ज्योती परब, डॉ योगेश जोशी, समन्वयक हेमंत नेहेते, नीता नेहेते, स्वागत समिती प्रमुख राजेंद्र गोसावी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित केला आहे. मराठी भाषा दिन केवळ एक दिवसापुरता साजरा केला जातो; पण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी नव्या पिढीला मराठी कवितेशी जोडले पाहिजे व जुन्या पिढीचे साहित्य प्रकाशात आणले पाहिजे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुदत्त वाकदेकर, प्रशांत डिंगणकर, शशिकांत तिरोडकर, डॉ. मधुसूदन घाणेकर, डॉ. नारायण तांबे, प्रा. दीपा ठाणेकर, मेघना साने, आरती कुलकर्णी, डॉ. अ. ना. रसनकुटे, राजेश साबळे, चंद्रशेखर भारती, आनंद पेंढारकर, विजय जोशी, सागरराजे निंबाळकर, आशा तेलंगे, नेहा धारुलकर, सविता इंगळे, हर्षल राणे, जयंत भावे, संतोष सावंत, विजय देसले, विश्वास कुलकर्णी, लक्ष्मण घागस, स्वाती जगताप, डॉ. सुधीर मोंडकर, सुनील बडगुजर, डॉ. नरसिंग इंगळे, डॉ. प्रकाश माळी, बाळासाहेब तोरसकर, संतोष महाडेश्वर, वैभव धनावडे, अनुश्री फडणीस, अक्षय शिंपी, लीलाधर तळेले, स्नेहल अहिरे, निशिकांत महांकाळ, विनोद पितळे आदी निमंत्रित कवींसोबत एक हजार कवी कविता सादर करणार आहेत. साक्षी परब आणि संकेत खर्डीकर युवा कवी संमेलनाची जबाबदारी पहाणार आहेत.

या विषयी माहिती देताना उपक्रम प्रमुख जोशी म्हणाले, ‘८५ तास कविसंमेलन, एक हजार कवी, ४० सत्रे आणि प्रत्येक सत्राचे वेगवेगळे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे असे या उपक्रमाचे स्वरूप असून, या पूर्वीचा विक्रम ७० तासांचा होता. अखिल भारतीय कला क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमास आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, अक्षर मंच प्रकाशन, ‘कोमसाप’ कल्याण, साई इव्हेंट या सहयोगी संस्था या उपक्रमास सहकार्य करणार आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search