Next
‘माणसाच्या अमर्याद गरजा पूर्ण करणे निसर्गालाही अशक्य’
डॉ. उदयकुमार पाध्ये यांचे प्रतिपादन
प्रशांत सिनकर
Monday, April 22, 2019 | 06:13 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : ‘सगळ्यांना गरजेपुरते देण्याची ताकद निसर्गात आहे; पण माणसाच्या अमर्याद वाढलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणे सृष्टीकर्त्यालाही शक्य नाही. आपल्या ऐहिक गरजा भागविण्यासाठी माणूस निसर्गाला ओरबाडू लागला आहे. हे असेच चालत राहिले, तर एक दिवस माणसाला देण्यासारखे निसर्गाकडे काहीच उरणार नाही आणि मग मानवी अस्तित्वच संपेल’, अशी भीती डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी व्यक्त केली.

‘जागतिक वसुंधरा दिना’निमित्त २२ एप्रिल रोजी ठाण्यात ‘कॉस्मिक इकॉलॉजिकल ट्रस्ट’ आणि ‘मैत्री फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्री निसर्गाशी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. ‘आपण आपल्या अनावश्यक गरजा कमी करायला हव्यात. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करायला हवा. जुन्यातून नवे घडवायला हवे. जे जे निसर्गचक्राला बाधक आहे, त्या त्या गोष्टीला ठाम नकार द्यायला हवा’, असे सांगून ‘रिड्युस, रीयूज, रिसायकल आणि रिफ्युज’ असा मूलमंत्रच फाउंडेशनच्या अध्यक्षा व लेखिका सृष्टी गुजराथी यांनी या वेळी दिला. 

‘पूर्वी कापडांचे धागे सुती असायचे आणि नाती रेशमी. मोठ्या दादा-ताईंचे कपडे चुलत-मावस अशी सगळी लहान भावंडे हौसेने वापरायची. आता कपडे वापरण्याची नाही, दाखविण्याची फॅशन आली आहे. बेसुमार वाढलेल्या कापड उद्योगांसाठी निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. सिंथेटिक धाग्यांनी शरीराचेच नाही, तर निसर्गाचेही तापमान बिघडवले. या धाग्यांचे लवकर विघटन होत नसल्याने, आता पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांतही त्यांचे कण आढळून येऊ लागले आहेत. आपल्या शरीराला आपण अजून असे काय काय पचवायला सांगणार आहोत’, असा सवाल गुजराथी यांनी उपस्थित केला. ‘आधी ‘वाचाल तर वाचाल’ म्हणायचे, आता ‘वाचवाल तरच वाचाल’ असे म्हणायची वेळ आली आहे. निसर्ग त्याच्या गतीने चालत राहील; पण या भूमीवर मानवी अस्तित्व टिकवायचे असेल तर निसर्गचक्रातील आपला हस्तक्षेप कमी करायलाच हवा,’ असे प्रतिपादन गुजराथी यांनी केले.   

‘पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. यासाठी रोपे तयार करताना बव्हंशी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. त्याऐवजी उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारी रिकामी शहाळी वापरायला हवीत. अगदी आंबा-फणसासारखी मोठी वाढणारी झाडेसुद्धा किमान वर्षभर या नैसर्गिक कुंडीत सुखनैव राहू शकतात. शिवाय त्यांची पाण्याची गरजसुद्धा कमी होते. हीच शहाळी नंतर जशीच्या तशी मातीत रुजवता येतात. त्यामुळे प्लॅस्टिक कुंड्या आणि पिशव्यांना असलेला हा नैसर्गिक पर्याय आपण वापरायलाच हवा,’ असे आवाहन राधाकृष्ण गायतोंडे यांनी केले. ‘आपल्या कर्माने आपण ग्लोबल वॉर्मिंग ओढवून घेतले आहे; पण त्याचा त्रास मात्र निष्पाप पशू-पक्ष्यांनाही भोगावा लागतो. त्यामुळे भूतदया म्हणून नव्हे, तर प्रायश्चित्त म्हणून आपण पशू-पक्ष्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी उपलब्ध करून द्यायला हवे’, असे आवाहन सायली फणसे यांनी केले. 

या वेळी कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने पक्ष्यांच्या घरट्यांचे वाटपही करण्यात आले. प्रवीण गावडे व विकास अभ्यंकर यांनी निवेदन केले, तर गौरव देव यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पाध्ये, ‘विश्वनिकेतन’चे डॉ. अशोक जैन, पशूचिकित्सक डॉ. मनोहर अकोले व हरिश्चंद्र देवरुखकर यांच्या हस्ते वज्रवल्ली, पित्तपापडा, अश्वगंधा, हरडा अशा औषधी वनस्पतींची रोपे देऊन उपस्थितांचे आभार मानण्यात आले. पुष्कर गायतोंडे व पूजा पटेल यांच्या हस्ते पक्ष्यांच्या घरट्यांचे वाटप करण्यात आले. 

या वेळी प्रचिती गावडे, प्रसाद अग्निहोत्री, राजेंद्र पाटील, गजेंद्र अडकर, बाबुभाई पटेल, वैष्णवी नवले, मृणाल इनामदार, सुनील आंबर्डेकर, सुजाता पटेल, सुधीर इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 118 Days ago
Quite true . But difficult to appreciate in day-to-day life .
0
0
संजिव प्रभू About 118 Days ago
सुंदर विचार पण परिवर्तनासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील
0
0

Select Language
Share Link
 
Search