Next
पिंपरीमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी पहिले डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरू
महापालिका व अल्फालाव्हल कंपनीचा संयुक्त उपक्रम
BOI
Thursday, September 05, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

डिजिटल प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व अल्फालाव्हल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन

पिंपरी : येथील शास्त्रीनगरमधील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अत्याधुनिक डिजिटल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग आणि अल्फालाव्हल कंपनीच्या संयुक्त सहभागातून हा प्रकल्प साकारला असून, ‘वाय४डी फाउंडेशन’ या संस्थेतर्फे हे केंद्र चालविण्यात येणार आहे. नुकतेच याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व अल्फालाव्हल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि डिजिटल क्षमता निर्माण व्हावी या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले आहे. संगणक व डिजिटल माध्यमाविषयी उत्सुकता असणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी या केंद्रामध्ये अद्ययावत संगणक व सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. या केंद्रामध्ये २४ संगणक, ब्रॉडबँड यंत्रणा, अखंड वीजपुरवठा यंत्रणा, संवादी फलक, उच्च ध्वनी यंत्रणा, सीसीटीव्हीकॅमेरा अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षातच सुमारे दिडशे शिक्षक व आठशे विद्यार्थ्यांना डिजिटल प्रशिक्षण देण्याची योजना आहे. या केंद्रासाठी डिजिटल क्षेत्रातील एका अनुभवी व कुशल महिला प्रशिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली असून, दोन वर्षे ती हे केंद्र चालविणार आहे. 

या वेळी बोलताना पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच आपल्या सामाजिक बांधिलकीतून अल्फालाव्हल कंपनीने उभारलेले हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. स्मार्ट शहर विकसित होत असताना नागरिकांना डिजिटल कौशल्ये येणे गरजेचे आहे. म्हणूनच नव्या पिढीमध्ये, लहान मुले व तरुणांमध्ये ही कौशल्ये विकसित करण्यासाठी अल्फालाव्हल कंपनीने महापालिकेला या उपक्रमाद्वारे जे सहकार्य दिले आहे त्याचे आम्ही स्वागत करतो व कंपनीचे त्यासाठी अभिनंदन करतो. आपले शहर स्मार्ट करण्यासाठी अल्फालाव्हल प्रमाणे इतरही कंपन्यांनी पुढे यावे असे आम्ही आवाहन करतो. अशा उपक्रमांमधील भागीदारीचे पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमीच स्वागत करेल आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. 

या वेळी बोलताना अल्फालाव्हलच्या भारत, पश्चिम आशिया, आफ्रिका समुहाचे अध्यक्ष व अल्फालाव्हल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल साक्षरता व कौशल्ये विकसित व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अभिनव आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. अल्फालाव्हलच्या सामाजिक जबाबदारी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम चालविण्यात येत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. यामुळे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षणही मिळू शकेल, असा कंपनीला व महापालिकेला विश्वास वाटतो. वेगळा विचार करणे, तंत्रज्ञान व उपकरणे हाताळणे यासंदर्भात या नव्या विद्यार्थ्यांकडे खूप क्षमता आहेत. त्यांच्या या क्षमतांना या केंद्रामुळे एक वेगळे व्यासपीठ व पाठबळ मिळेल.’ 

(ही बातमी इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search