Next
जॉर्ज गॅमॉव्ह, सर पॅट्रिक मूर
BOI
Sunday, March 04, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

मिस्टर टॉम्पकीन्स हे एका बँक कारकुनाचं काल्पनिक पात्र निर्माण करून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या धमाल विज्ञानकथा लिहिणारे प्रख्यात शास्त्रज्ञ जॉर्ज गॅमॉव्ह आणि सलग ५६ वर्षं बीबीसीवरून ‘दी स्काय अॅट नाईट’ ही टेलिव्हिजन सिरीयल चालवणारे सर पॅट्रिक मूर यांचा चार मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
....
जॉर्ज गॅमॉव्ह

चार मार्च १९०४ला युक्रेनमध्ये जन्मलेला जॉर्ज गॅमॉव्ह हा अनेक पुस्तकं लिहून सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवणारा लेखक म्हणून लोकप्रिय असणारा संशोधक. 

गॅमॉव्हने पुढे १९३४ साली अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं होतं. तो अणुशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता आणि बिग बँग थिअरीचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्याने डीएनए संशोधनातही फार मोठं योगदान दिलं होतं. 

१९३७ साली त्याने ‘मिस्टर टॉम्पकीन्स’ हे एका बँकेतल्या कारकुनाचं पात्र निर्माण करून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या धमाल विज्ञानकथा लिहिल्या. हे टॉम्पकीन्स महाशय एका प्रोफेसरशी दोस्ती करून ज्ञान घेता घेता, त्याच्याच मॉड नावाच्या मुलीशी लग्नही करतात! आइन्स्टाइनकडून ग्रॅव्हिटी शिकतात, रदरफोर्डकडून अणूचं ज्ञान घेतात, मारी क्युरीकडून किरणोत्सर्ग शिकतात...एकदा तर स्वप्नात असताना ते इलेक्ट्रॉन बनून भ्रमण करतात, पण शेवटी पॉझिट्रॉनशी टक्कर होऊन ते नष्ट होताहोता त्यांना स्वप्नातून जाग येते..अशा एकेक धमाल कथा! 

पुढे १९४७ साली गॅमॉव्हने ‘वन, टू, थ्री...इन्फिनिटी’ हे पुस्तक लिहिलं आणि ते जगभरच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सामान्य वाचकांमध्ये तुफान लोकप्रिय झालं. गणितातल्या, विज्ञानाच्या, खगोलशास्त्राच्या असंख्य संकल्पना अत्यंत सोप्या करून त्याने या पुस्तकातून लोकांसमोर मांडल्या होत्या. मोबियस प्लेनची (प्रतल) अद्भुत संकल्पना त्याने अत्यंत सोप्प्या पद्धतीने जगासमोर आणली होती. 

मिस्टर टॉम्पकीन्स इन वंडरलँड, मिस्टर टॉम्पकीन्स लर्न्स दी फॅक्ट ऑफ लाइफ, मिस्टर टॉम्पकीन्स इनसाइड हिमसेल्फ, दी बायोग्राफी ऑफ दी अर्थ, दी बर्थ अँड डेथ ऑफ दी सन, दी मून, बायोग्राफी ऑफ फिजिक्स, माय वर्ल्ड लाइन अशी त्याची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

युनेस्कोतर्फे ‘कलिंग’ पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला होता. १९ ऑगस्ट १९६८ रोजी त्याचा मृत्यू झाला.
...............

सर पॅट्रिक मूर 

चार मार्च १९२३ रोजी मिडलसेक्समध्ये जन्मलेले पॅट्रिक मूर हे हौशी खगोलतज्ज्ञ आणि संशोधक होते.

खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी, लोकांना खगोलशास्त्राची गोडी लावण्यासाठी त्यांनी अफाट लेखन केलं आणि बीबीसीवर ‘दी स्काय अॅट नाइट’ ही टेलिव्हिजन सीरियल २४ एप्रिल १९५७ पासून  सात जानेवारी २०१३ पर्यंत, अशी तब्बल ५६ वर्षं चालवली, जो एक विक्रमच आहे.

त्यांना ब्रिटिश सरकारतर्फे ‘कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर’ हा मानाचा किताब, तसंच रॉयल सोसायटीची मानद फेलोशिप मिळाली होती. 

ए गाइड टू दी मून, मिशन टू मार्स, दी व्हॉइस ऑफ मार्स, ए गाइड टू दी प्लॅनेट्स, स्टार्स अँड स्पेस, मून फ्लाइट अॅटलास, ऑब्झर्वर्स बुक ऑफ अॅस्ट्रनॉमी, कॅन यू स्पीक व्हेन्युशियन?, नेक्स्ट फिफ्टी इयर्स इन स्पेस, आर्मचेअर अॅस्ट्रनॉमी, ट्रॅव्हलिंग इन स्पेस अँड टाईम, एक्स्प्लोरिंग दी नाईट स्काय विथ बायनॉक्युलर्स, आइज ऑन दी युनिव्हर्स, पॅट्रिक मूर ऑन मार्स अशी त्यांची चाळीसहून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

नऊ डिसेंबर २०१२ रोजी त्यांचा वेस्ट ससेक्समध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search