Next
सुगंध त्याचा छपेल का?...
BOI
Tuesday, December 12 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ख्यातनाम व्हायोलिनवादक आणि ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाला असून, १४ डिसेंबरला, ग. दि. माडगूळकरांच्या स्मृतिदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या ‘गदिमां’नी लिहिलेल्या आणि प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का?’ या रचनेचा...
............
काही दिवसांपूर्वी एका प्रभातसमयी एक सुवार्ता कानावर आली अन् गाणारं व्हायोलिन आणि काही सुमधुर गाणी दिवसभर कानामनात वाजत राहिली. ती सुवार्ता होती सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाल्याची.

अण्णा अर्थात ग. दि. माडगूळकर आणि तात्या अर्थात प्रभाकर जोग ही दोन नावं अतिशय रसिकप्रिय! रसिकांच्या हृदयाचा एक कप्पा या दोन व्यक्तींनी व्यापून टाकला आहे. गदिमा एक शब्दप्रभू आणि तात्या जोग हे साक्षात ‘स्वरप्रभाकर!’ १४ डिसेंबरला ‘गदिमां’च्या स्मृतिदिनी या सुवर्णकांचन क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य रसिकांना मिळणार आहे.

२०१२ साली पुणे आकाशवाणीचा हीरक महोत्सव साजरा होत असताना ‘आकाशवाणी माझ्या मनी’ अशी मालिका सुरू केली होती. दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या मुलाखतीतून पुणे आकाशवाणीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. आम्हा उद्घोषकांवर या मालिकेची जबाबदारी दिली होती. आम्ही ज्येष्ठ मंडळींशी संपर्क साधून कार्यक्रम सादर करत होतो. वरिष्ठ उद्घोषक मंगेश वाघमारे आणि प्रभाकर जोग यांचा घनिष्ठ स्नेह! मंगेश यांनी प्रभाकरतात्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलं होतं. तात्यांना भेटायला मिळणार म्हणून मला किती आनंद झाला होता, हे शब्दांत व्यक्त करता येत नाही. ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला,’ हे गाणंच गुणगुणत राहावंसं वाटत होतं. मी वारंवार आकाशवाणीच्या मुख्य दरवाज्यापाशी जाऊन पाहत होते... तात्यांना कधी एकदा पाहीन असं झालं होतं... कारण त्यांच्या ‘गाणारं व्हायोलिन’च्या कॅसेट्स ऐकून आयुष्यातले कितीतरी क्षण मोहरले होते. त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी श्रोत्यांसाठी वाजवताना प्लेबॅक स्टुडिओ जणू स्वरांच्या हिरव्या चाफ्यानं सुगंधित व्हायचा... 

स्वरांचा सुगंध सर्वदूर पोहोचवणारे प्रभाकरतात्या आकाशवाणीत आले. मी भारावल्यासारखी पुढे झाले. त्यांना वाकून नमस्कार केला. ऐंशीच्या घरात असलेले गोरेपान तात्या, वार्धक्यामुळे आवाज क्षीण झालेला, पण कलेचं तेजोवलय लाभलेला चेहरा... आकाशवाणी पुणे केंद्राबद्दलच्या आठवणींत तात्या रंगून गेले होते. मंगेश त्यांच्याशी संवाद साधत होता. मी ध्वनिमुद्रण करत होते. आठवणींच्या सरींमध्ये गीत रामायणाची दमदार सर बरसल्याशिवाय राहील का? ‘गदिमा, बाबूजी आणि पुणे आकाशवाणी... ते मंतरलेले दिवस आणि त्या आठवणी... मी कधीच विसरणार नाही...’ 

तात्यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाल्याची सुवार्ता ऐकल्यावर ओठांवर याच ओळी आल्या...

सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

‘गीतगंगा’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करताना वाटायचं, मालती पांडे यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही, ‘गदिमां’ना पाहायला मिळालं नाही, पण तात्यांना तर प्रत्यक्ष भेटायला मिळालं. त्यांनी केलेल्या गप्पा ऐकायला मिळाल्या. गंगाधर महांबरे यांनी आकाशवाणी पुणे केंद्रासाठी घेतलेल्या तात्यांच्या एका मुलाखतीत या गाण्याची जन्मकथा सांगितली होती. ‘लाखाची गोष्ट’ या राजाभाऊ परांजपे यांच्या चित्रपटासाठी ‘गदिमां’नी हे गीत लिहिलं होतं; पण चित्रपटातील तो प्रसंगच काढून टाकल्यामुळं हे गीतही काढून टाकलं गेलं. गाणं फार सुंदर झालं होतं. तात्यांचा एक मित्र जयसिंग सावंत यांनी ते गाणं जपून ठेवलं होतं. 

तात्यांचं नुकतंच लग्न झालेलं. त्यांच्या सौभाग्यवती नीला यांना आकाशवाणीवर गाणं सादर करायचं होतं. पहिलाच कार्यक्रम म्हणून त्यांनी तात्यांजवळ आग्रह धरला, की ‘तुम्ही स्वरबद्ध केलेली रचना मी गाणार. रेडिओवरचं पहिलं गीत तुमचंच हवं.’ मग काय ‘लपवलेला हिरवा चाफा’ तात्यांनी बाहेर काढला आणि त्याचा सुगंध रेडिओलहरींवरून सर्वदूर पसरला... नवपरिणितेचे सलज्ज भाव शब्दाशब्दांतून व्यक्त झाले...

जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालीचा छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

स्त्रीमनाचं नाजूक, अलवार गूज ‘गदिमां’सारख्या प्रज्ञावंत कवीनं जाणलंच, पण ते सप्तसुरांमध्ये गुंफण्याचं सुरेल काम प्रभाकरतात्यांनी केलं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं हे गीत ‘गदिमां’नी ऐकलं, तेव्हा ते म्हणाले ‘अरे जोगा, मी टाकून दिलेल्या गाण्याचं सोनं केलंस की रे!’ 

पुढे मालती पांडे (बर्वे) यांच्या गोड आवाजात या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली आणि भावगीतांची अवघी दुनिया आणखीनच समृद्ध झाली. प्रीतीची हळुवार भावना ‘गदिमां’नी कशी शब्दबद्ध केली आहे बघा...

क्षणात हसणे, क्षणात रुसणे
उन्हात पाऊस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे घेणे
घडल्यावाचून चुकेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

‘गदिमां’चे शब्द आणि मालतीबाईंच्या आवाजातला गोडवा प्रभाकर जोगांच्या संगीतरचनेमधून असा काही सुखावतो, की रसिकांच्या ओठांवर ‘अहाहा, क्या बात है’ अशी दाद नकळत उमटतेच. कवी संवेदनशील असतोच; पण गायक कलाकार आणि संगीतकार कवितेशी जेव्हा समरस होतात, संवेदनशील मनाच्या तारा जेव्हा सहज जुळतात, तेव्हाच अशी स्वरांनी मोहरलेली कविता रसिकांना आनंद देऊन जाते. आणखी एक गोष्ट, या सृजनक्षणांना साक्षी असतं ते कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य! तृप्ती, समाधान, प्रेमाची पूर्ती आणि जीवन आनंदानं जगण्याची ऊर्मी या साऱ्या गोष्टी कलेद्वारे व्यक्त होत राहतात. एक सुंदर प्रेमगीत, भावगीतांच्या विश्वातलं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गदिमा, मालती पांडे आणि प्रभाकर जोगांचा हा ‘हिरवा चाफा...’ किती गोड भाव टिपले आहेत मालतीबाईंच्या सुरेल गळ्यानं आणि प्रभाकर जोगांच्या अपूर्व संगीतरचनेनं... ‘गदिमां’ची कविता जेव्हा तात्यांनी वाचली असेल, तेव्हा त्यांच्या मनातलं स्वरांचं चांदणं सप्तसुरांमधून असं बहरलं असेल ...

चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरही जाणे, चंद्रही जाणे
केली चोरी छपेल का?
प्रीत लपवुनी लपेल का?

ही शब्द-सुरांची लपाछपी खेळणारे गदिमा आणि प्रभाकर जोग यांच्या कीर्तीचा सुगंध सदैव दरवळत राहणार आहे... तो छपेल कसा? कारण मालतीबाईंच्या आवाजातलं हे भावगीत आकाशवाणीवरून वारंवार प्रसारित होत राहणार... रसिकांना रोमांचित करत राहणार...

प्रभाकर जोग यांची सांगीतिक वाटचाल प्रदीर्घ आहे. त्याबद्दल पुन्हा कधी तरी. तूर्त गदिमा पुरस्काराच्या निमित्तानं हा ‘हिरवा चाफा’ पुन्हा एकदा स्मरणरंजनाचा आनंद देईल असा विश्वास वाटतो. एक सुविचार आहे ‘फुलाचा सुगंध दूरवर जाण्यासाठी वारा वाहणं आवश्यक असतं; पण कीर्तीचा सुगंध पसरण्यासाठी वाऱ्याचीही गरज नसते. तो आपोआप दाही दिशांना पसरतो.’ खरंय, प्रभाकर जोग यांच्यासारख्या गुणी संगीतकाराच्या कीर्तीचा सुगंध कधी छपेल का? तो सदैव दरवळता राहणार! प्रभाकरतात्या एका मुलाखतीत म्हणाले होते ‘अनेक पुरस्कार मिळाले; पण ‘रसिकांनी दिलेली दाद’ हाच सर्वांत मोठा पुरस्कार.’ तात्या, गदिमा पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! त्रिवार वंदन!! आणि आधुनिक वाल्मिकी, गीत रामायणकार ‘गदिमां’च्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!! 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
माधव विद्वंस About
खूपच वाचनीय
0
0
ramchandra m abhyankar About
must readable
0
0
Mukund Sohani About
Just Exllent.
0
0
मधुकर राईलकर About
लताबाईंनी गायले नसूनही अजरामर झालेल्या विरळा भावगीतांपैकी हे एक!मालती पांडे,गदिमाव प्रभाकर जोग यांच्या असामान्य प्रतिभेचा हा लोभस आविष्कार व समर्पक रसग्रहण!धन्यवाद!
0
0

Select Language
Share Link