Next
मुंबई पर्यटन : गिरगाव, मलबार हिल
BOI
Saturday, October 05, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गिरगाव - खोताची वाडी

‘करू या देशाटन’
सदराच्या आजच्या भागात मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल भागातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या. 
.........
गिरगाव हे नाव ‘गिरी’ व ‘ग्राम’ या दोन संस्कृत शब्दांपासून आले आहे. गिरगाव म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेले गाव. मलबार हिलच्या माथ्यावरून गिरगावचे विहंगम दर्शन होते. मलबार हिलच्या पायथ्याशीच हा भाग आहे. एके काळी हा भाग मराठीबहुल होता. आता मात्र ती परिस्थिती पालटत चालली आहे. येथील अनेक नागरिकांनी डोंबिवली-बोरिवलीचा रस्ता पकडला. आता या भागाचे मराठीपण हरवत चालल्यासारखे वाटते. गिरगावात अनेक छोट्या छोट्या वाड्या आहेत. आंबेवाडी, फणसवाडी, झावबाची वाडी, कांदेवाडी, मुगभाट, गायवाडी, वैद्यवाडी (अन्नपूर्णावाडी) भटवाडी, जितकर वाडी, भुताची वाडी, उरणकर वाडी, पिंपळवाडी अशी मराठी नावे आता नावालाच उरलीत की काय, असे वाटू लागते. 

झावबाचे राममंदिरमाझ्या लहानपणी गायवाडीतील मोहन बिल्डिंगमध्ये काका राहायचे, तेव्हा तेथे जायचो; पण आता तेथील सर्व बदलले आहे. चाळींची जागा टॉवर घेत आहेत. त्यातही नाना शंकरशेट रोडवर झावबाचे राममंदिर आपले अस्तित्व टिकवून आहे. या भागात मराठी, गुजराती, जैन, पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आहेत. येथे अनेक हिंदू मंदिरे, जुनी चर्च, पारशी मंदिरे, जैन मंदिरे आहेत. 

ठाकूरद्वार : नाना शंकरशेट रोडच्या दोन्ही बाजूला ठाकूरद्वार परिसर आहे. या भागात सोन्या-चांदीची अनेक दुकाने आहेत. झावबाचे राममंदिर आहे. ठाकूरद्वार येथे १८४९ साली नाना शंकरशेट यांनी मुलींची पहिली मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. 

खोताची वाडी : खोताची वाडी पोर्तुगीज शैलीच्या लाकडी वास्तुकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने कॅथोलिक आणि हिंदू आहेत. ही घरे आता उत्तुंग टॉवरसाठी पाडली जात आहेत. परदेशी पर्यटक खोताच्या वाडीच्या या अरुंद गल्ल्यांमध्ये अजूनही गर्दी करतात. स्थानिक आणि इतिहासप्रेमी येथे हेरिटेज वॉक आयोजित करतात. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात या वाडीत पाठारे प्रभू यांची वस्ती होती. त्यांनी पूर्व भारतीय कुटुंबांना जमीन विकली. येथे ६५ घरे होती. त्यापैकी आता फक्त २८ घरे शिल्लक आहेत. लाकूडकाम असलेल्या या घरात प्रशस्त व्हरांड्यातून वरच्या शयनगृहात प्रवेश करण्यासाठी लाकडाचे जिने बनवलेले असतात. मागील भागात अंगण असते. 

फडकेवाडी गणपती

फडकेवाडी गणपती :
विठ्ठलभाई पटेल रोडवर हे मंदिर आहे. अलिबाग (रायगड) जिल्ह्यातील आवास गावचे गोविंद गंगाधर फडके यांनी सन १८६७मध्ये येथील जागा घेतली. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने हे मंदिर सन १८९०च्या सुमारास बांधले. मृत्यूपूर्वी गणेश मंदिराची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. बाळाजी पांडुरंग भालेराव हे फडके घराण्याचे स्नेही होते. त्यांच्या सल्ल्याने गणेश मंदिराच्या उत्पन्नासाठी त्यांनी विश्वस्त समिती नेमली. १९१८मध्ये धरमसी मोरारजी खटाव यांनी मंदिरात वीज आणली. पुण्याचे कॉट्रक्टर लक्ष्मणराव फाटक व उद्योगपती तात्यासाहेब आपटे यांचे सहकार्य मंदिराच्या उत्कर्षाला कारणीभूत झाले. गणपती मंदिर उत्तराभिमुख आहे. बाहेरून मंदिर काहीसे चौकोनी दिसते. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच देवळाचा मुख्य भव्य सभामंडप लागतो. या सभामंडपात २०० माणसे बसू शकतात. गणेशभक्तांचे हे आवडते मंदिर आहे. 

मुंबई मराठी साहित्य संघ : गिरगाव मधील साहित्य संघ मंदिर हे मराठी माणसाची अस्मिता जपणारे ठिकाण आहे. डॉ. अ. ना. भालेराव यांचा साहित्य संघ स्थापनेत मोठा पुढाकार होता. १९३४ साली मुंबई येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली होती. मुंबई शहर आणि उपनगर भागांत मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने २१ जुलै १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना स्थापना करण्यात आली. १९३८मध्ये भरलेल्या संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘मायाविवाह’ या नाटकाचा संघातर्फे प्रयोग करण्यात आला. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यक्ष होते. १९४०मध्ये चित्रकार दीनानाथ दलाल यांनी मुंबई मराठी साहित्य संघासाठी तयार केलेले बोधचिन्ह स्वीकारण्यात आले. १९४१ साली मुंबईस संघाच्या विद्यमाने भरलेले महाराष्ट्र नाट्यसंमेलनाचे ३२वे अधिवेशन पार पडले. याच अधिवेशनात साहित्य संघाने नाट्यगृह बांधण्याचा संकल्प सोडला व संघाचे कार्यक्षेत्र विस्तारले. १९४७ मध्ये साहित्य संघाने ‘साहित्य’ हे द्वैमासिक सुरू केले. १९४९मध्ये साहित्य संघाच्या नाट्य शाखेची स्थापना झाली. या नाट्य शाखेतर्फे नाट्यशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गांना केशवराव दाते, नानासाहेब फाटक, पार्श्वनाथ आळतेकर यांचे मार्गदर्शन लाभले. २२ ऑक्टोबर १९५० रोजी साहित्य संघ उभारणीसाठी केळेवाडीतील (सध्याच्या भालेराव मार्गावरील) जागा खरेदी करण्यात आली. २७ ऑक्टोबर १९५२ रोजी न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनी पौरोहित्य केले होते. १९५३मध्ये साहित्य संघाची लहान वास्तू आणि रंगमंच अस्तित्वात आला. त्यानंतर खुल्या नाट्यगृहात नाट्योत्सवाचा शुभारंभ झाला. सात जानेवारी १९६० रोजी नवीन संघमंदिराचा कोनशिला समारंभ भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते झाला. सहा एप्रिल १९६४ रोजी साहित्य संघ मंदिराच्या नव्या वास्तूचा भव्य उद्घाटन समारंभ भारताचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. 

फणसवाडीतील अग्यारीपारशी अग्यारी : संपूर्ण जगात १६७ पारशी अग्यारी आहेत. त्यापैकी मुंबईत ४५ असून, त्यापैकी गिरगावमध्ये चार, तर उर्वरित भातात १० अग्यारी आहेत. प्रिन्सेस स्ट्री जवळ आताश बेहराम बेहराक अग्यारी ही पहिली अग्यारी सेठ होर्मुसजी बोमनजी वाडिया यांनी १८३०मध्ये बांधली बांधली. तिचे प्रवेशद्वार व शिल्पे पाहूनच आतील वैभवाची आपण कल्पना करू शकतो. पारशी अग्यारीत इतर धर्मीय नागरिक आणि स्त्रियांना प्रवेश नाही. 

कावसजी बेहरामजी बनजी आताश बेहराम अग्यारी चर्नी रोड येथे आहे. ती १८४५मध्ये बांधण्यात आली. अंजुमना आताश बेहम ही अग्यारी वाडिया अग्यारीच्या दक्षिणेस डॉ. कावसजी रोडच्या पलीकडे आहे. दादीभाही नौशेरवानजी अग्यारी फणसवाडीत आहे. 

बाबुलनाथ मंदिर

बाबुलनाथ मंदिर :
गिरगाव चौपाटीजवळील मुंबई इंटरनॅशनल स्कूलसमोर हे सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर इ. स. १२००मधील राजा भीमदेव यांनी बांधले; मात्र इ. स. १७००पर्यंत हे मंदिर पडझड झालेल्या अवस्थेत दुर्लक्षित होते. येथे पूर्वी पाच मूर्ती होत्या. त्यापैकी केवळ चार (शिव, गणेश, हनुमान, पार्वती) मूर्ती चांगल्या स्थितीत सापडल्या व पाचवी मूर्ती भंगलेली होती. भंगलेली मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात आली. १७८०मध्ये मंदिर दुरुस्त करण्यात आले. १८९०मध्ये काही गुजराती व्यापाऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला. त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव यांनीही मदतीचा हात दिला. त्यामुळे काम पूर्ण झाले. हे शहरातील सर्वांत उंच मंदिर होते; मात्र १९६०मध्ये वीज पडल्यामुळे मंदिराची हानी झाली. त्यानंतर पुनश्च दुरुस्ती करून मंदिराची उंची कमी करण्यात आली. मंदिर आता खूपच आकर्षक दिसते. यामध्ये अनेक सुंदर शिल्पे बसविण्यात आली आहेत. चौपाटीजवळील टेकडीवरील मंदिर आवर्जून पाहावे असेच आहे. 

राधा-गोपीनाथ

‘इस्कॉन’चे राधा गोपीनाथ मंदिर :
गिरगाव चौपाटीच्या उत्तरेस कन्हैयालाल मुन्शी पथावर ‘इस्कॉन’चे राधा गोपीनाथ मंदिर आहे. या मंदिरास ‘भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’चे (आयजीबीसी) मानांकन मिळाले आहे. मंदिरात असलेली स्वच्छता, मोकळी हवा, भक्तांना मिळणारे स्वच्छ-निर्जंतुक पाणी, भरपूर नैसर्गिक प्रकाश यांमुळे या मंदिरला पुरस्कार मिळाला. मंदिरात विविध देवतांच्या मूर्ती आहेतच; पण राधा-कृष्णाची मूर्ती लक्षवेधक आहे. मंदिराचे बांधकाम अतिशय आकर्षक आहे. 

म्हातारीचा बूट

कमला नेहरू पार्क :
मलबार हिलवरील रिज रोडवर हे लहान मुलांसाठीचे उद्यान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या नावाने हे उद्यान ओळखले जाते. येथील बूट हाउस (म्हातारीचा बूट) हे मुलांचे खास आकर्षण. बागेत डिडोनिया वनस्पतीमध्ये अनेक प्राणी कोरलेले आहेत. तसेच आकर्षक इतर आकारही झाडांना दिले आहेत. इंद्रधनुष्याच्या आकाराचे खुले पायरी सभागृह हेही येथील वैशिष्ट्य. 

हँगिंग गार्डन

हँगिंग गार्डन :
या बागेला फिरोजशहा मेहता गार्डनदेखील म्हटले जाते. कमला नेहरू पार्कच्या समोरील बाजूला, पश्चिमेकडील मलबार हिलच्या माथ्यावर टेरेस्ड गार्डन आहेत. येथून अरबी समुद्रावरील सूर्यास्ताचे दृश्य दिसते. येथे प्राण्यांच्या आकारात कोरलेल्या डिडोनियाच्या झुडपातील असंख्य आकृती आहेत. 

जैन मंदिर, वाळकेश्वर

वाळकेश्वर येथील जैन मंदिर :
तीन बत्ती भागात मुंबईचे प्रसिद्ध ऋषभ देव जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर १९०४मध्ये बांधले गेले होते. यात सुशोभित शिल्पे आणि चित्रे आहेत. मुळात जैन मंदिरे खूपच छान असतात आणि त्यांची व्यवस्थाही छान असते. जैन धर्मातील हजारो भक्त रोजच्या उपासनेसाठी मंदिर वापरतात. जैन धर्माचा मुख्य विश्वास असा आहे की ‘मोक्ष’ (जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून स्वातंत्र्य) योग्य ज्ञान, योग्य श्रद्धा आणि योग्य आचरणाच्या तीन पट मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते. वाळकेश्वर रोडवर चंदनबाला जैन मंदिर या नावाचे आणखी एक जैन मंदिरही आहे. 

कसे जाल गिरगाव, मलबार हिल परिसरात?
हा परिसर चर्नी रोड रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. तसेच बस सेवा व टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 8 Days ago
A school for girls in 1849 ! EiGHT years BEFORE 1857 ! Not by Missionaries !! Credit to Nana Shankarashet , By the way , years before Agarakar and Karve
1
0
Avinash Ashirgade. About 11 Days ago
छान माहीतीपर लेख.
1
0

Select Language
Share Link
 
Search