Next
‘उडान’मुळे मुलींना सापडणार जीवनाची नवी वाट
एसकेएफ शिष्यवृत्ती योजनेचे दुसऱ्या वर्षात पदार्पण
प्रेस रिलीज
Thursday, November 15, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this article:मुंबई : शाळकरी मुलींच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘उडान एसकेएफ शिष्यवृत्ती’ या एसकेएफ इंडिया कंपनीच्या शिष्यवृत्ती योजनेचा तपशील नुकताच जाहीर करण्यात आला. या योजनेचे हे दुसरे वर्ष असून, योजना जाहीर करण्यासाठीच्या एका विशेष कार्यक्रमाला शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थिनी त्यांचे पालक व नातेवाईकांसह उपस्थित होत्या.

‘उडान एसकेएफ शिष्यवृत्ती’ ही योजना कंपनीच्या सामाजिक उपक्रमांचा भाग आहे. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास ४० होतकरु विद्यार्थिनींना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. या विद्यार्थिनींना दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या निवडीनुसार व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च शिष्यवृत्तीतून मिळणार आहे. ‘उडान’ महाराष्ट्रातील मराठवाडा या दुष्काळी आणि औद्योगिक दृष्ट्या पिछाडीवर असलेल्या भागात सुरू करण्यात आली.

‘उडान’चा प्रारंभ २०१७मध्ये झाला आणि यंदा दुसऱ्या वर्षीही अल्प उत्पन्न गटातल्या ग्रामीण आणि शहरी कुटुंबांमधील अभ्यासात हुशार असलेल्या, परंतु आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आवश्यक उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलींना सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या ४० विद्यार्थिनींचा अकरावीपासून त्यांच्या पसंतीचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उडान शिष्यवृत्तीतून होईल.

२०१७मध्ये दहावी परीक्षेत ८५ टक्के किंवा अधिक गुण आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी, या अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र होत्या. शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर कौशल्ये या निकषांवर आधारित पूर्णपणे निष्पक्ष प्रक्रियेतून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनींची निवड झाली. एसकेएफ शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थिनींना आर्थिक साह्याव्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन अशा मार्गाने सक्षम करण्याचा अंतर्भाव आहे.

एसकेएफ इंडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष राकेश माखिजा म्हणाले, ‘मुलींना शिक्षण देऊन जीवनात उंची गाठण्याची संधी देणे आपल्या समाजासाठी फार महत्त्वाचे आहे. भारतात हे अधिकच महत्त्वाचे आहे, कारण आपल्याकडे मुलींना उच्च शिक्षण देण्याला प्राधान्य दिले जात नाही. या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमातून एसकेएफ इंडिया बुद्धिमान आणि होतकरू विद्यार्थिनींना आर्थिक अडचणींवर मात करून आपले स्वप्न निर्भयपणे साकार करण्याची क्षमता देते.’  

एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर म्हणाले, ‘सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी आम्ही भारतात करत असलेल्या प्रयत्नात समाजाच्या उपयोगी पडणे आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे या दोन मुख्य उद्दिष्टांचा समावेश आहे. समाजातल्या लोकांच्या आणि आमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी योग्य बदल सातत्याने अंमलात आणण्याची प्रक्रिया आम्ही चालूच ठेऊ.’

एसकेएफ शिष्यवृत्ती योजनेत ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी कार्य करणारी ही सेवाभावी संस्था आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search