Next
सावरकर जयंतीला त्यांच्या नातीचा रत्नागिरीत विशेष कार्यक्रम
शाहीर विनता जोशी सादर करणार ‘नमन वीरतेला’
BOI
Monday, May 27, 2019 | 02:38 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची नात शाहीर विनता जोशी यांचा ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमाचे नियोजन पतित पावन मंदिर, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरीतील सावरकरप्रेमी, तसेच पुण्यातील ओडिसी व्हॉयेज इंडिया (एलएलपी) यांनी केले आहे. ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम शाहीर विनता जोशी व त्यांचे सहकलाकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन डॉ. नयना कासखेडीकर यांचे आहे. यामध्ये सावरकर यांच्या जाज्ज्वल्य कार्याची व साहित्याची महती त्या कथन करणार आहेत.

विनता जोशी यांचा पतित पावन मंदिरात सादर होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या वेळी पतित पावन मंदिर आणि अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे विनता जोशी यांचा यथोचित सन्मानही करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी दिली. पदाधिकारी राजू जोशी व संस्थेच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

विनता जोशी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात. त्या महिला शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून सावरकरांच्या कार्याचा प्रचार व प्रसार या उद्देशाने त्यांनी पोवाडे व सावरकर गीतांच्या कार्यक्रमांना प्रारंभ केला. फेब्रुवारी २०१९पर्यंतच्या ३६ वर्षांत देशात व परदेशात मिळून त्यांनी १००५ कार्यक्रमांचे यशस्वी सादरीकरण केले आहे. 

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचा एक हजारावा कार्यक्रम अंदमान येथे सादर झाला. किल्ले रायगडावरील ‘शाहिरी रात्र’ या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेल्या त्या एकमेव महिला शाहीर होत्या.

पुण्यातील सावरकरप्रेमींना रत्नागिरीत आणण्याचे नियोजन ओडिसी व्हॉयेज इंडिया (एलएलपी) संस्थेच्या मानसी नगरकर-जाधव करत आहेत. सावरकर यांच्या रत्नागिरीतील कार्याची ओळख पुण्यातील सावरकरप्रेमींना करून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. विनता जोशी यांच्यासोबत सावरकरप्रेमींना रत्नागिरीत आणून सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या रत्नागिरीतील वास्तूंना त्यांची भेट घडवून आणण्याचे कार्य त्या करत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या रत्नागिरीतील वास्तू म्हणजे पतित पावन मंदिर, विशेष कारागृहातील खोली, शिरगाव येथील दामले यांनी सावरकर यांचे वास्तव्य असलेली जतन केलेली खोली आदी ठिकाणी विनता जोशी व पुण्यातील सावरकरप्रेमी भेट देणार आहेत. सकाळी नऊ वाजता त्या विशेष कारागृहाला भेट देणार असून, त्या ठिकाणीही त्या छोटेसे सादरीकरण करणार आहेत.

रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पतित पावन मंदिर, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळातर्फे अॅड. बाबा परुळेकर, विनता जोशी, मानसी नगरकर-जाधव यांनी केले आहे.

(‘अनादि मी अनंत मी’ या सावरकरांवरील नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण २८ मे २०१९पासून १२ भागांत प्रसिद्ध होणार असून, ते सर्वांना मोफत ऐकता येणार आहे. त्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

सावरकरांचे विविध पैलू उलगडणारे लेखन वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.  

रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search