Next
कतारमधील माजी विद्यार्थ्याची रत्नागिरीतील शाळेला देणगी
‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील बातमी ठरली प्रेरणेचे माध्यम
BOI
Tuesday, October 16, 2018 | 04:04 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
सध्या कतारमध्ये असलेले अनिरुद्ध रामकृष्ण भुर्के यांनी रत्नागिरीतील आपल्या शाळेला देणगी दिली आणि त्यांच्या आईचे नाव शाळेतील कक्षाला देण्यात आले. सध्या अमेरिकेत असलेल्या एका माजी विद्यार्थिनीने त्याच संस्थेच्या इंग्रजी शाळेला देणगी दिली होती. त्या कार्यक्रमाची बातमी भुर्के यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचली आणि त्यानंतर त्यांनीही शाळेला देणगी दिली. 

जुलै महिन्यात दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला अमेरिकास्थित माजी विद्यार्थी भक्ती पित्रे यांनी भरघोस देणगी दिली. याचे वृत्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झाले होते. (ते वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) हे वृत्त सध्या कतारमध्ये असलेले शाळेचे माजी विद्यार्थी अनिरुद्ध रामकृष्ण भुर्के यांच्या वाचनात आले. त्यानंतर त्यांनी आपली आई कै. सौ. मंदाकिनी रामकृष्ण भुर्के यांच्या स्मरणार्थ कक्ष नामकरणासाठी या संस्थेच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिराला देणगी दिली. भुर्के यांच्या शिक्षिका आणि सध्या पुण्यात राहणाऱ्या ७७ वर्षांच्या शशिकला अभ्यंकर यांच्या हस्ते कक्ष नामकरण करण्यात आले. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला श्री. भुर्के यांच्या वतीने पत्नी गौरी भुर्के, मुलगा तुर्येश, बहीण भारती खेडेकर आणि भुर्के कुटुंबीय उपस्थित होते. अतिशय मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे म्हणाल्या, ‘कतार येथे राहणारे माजी विद्यार्थी अनिरुद्ध भुर्के यांनी गेल्या वर्षी प्रथम देणगी दिली होती. त्यानंतर भक्ती पित्रे यांनी दिलेल्या देणगीचा वृत्तांत ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचल्यानंतर भुर्के यांनी पुन्हा देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत; त्यांनी कक्षनामकरण त्यांच्या शिक्षिका शशिकला अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यास सांगितले. दुसरी-तिसरीत असताना त्यांनी शाळेला ३०० रुपये मदत म्हणून दिल्याचा संस्कार अजूनही लक्षात असल्याने देणगी दिली याचे विशेष कौतुक वाटते.’ भुर्के यांनी एकूण दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे.‘शिक्षक श्री. रायकर यांनी प्राथमिक शाळेच्या प्रत्येक वर्गासाठी देणगी घेऊन त्या वर्गांचे नामकरण केले. आता बालक मंदिराच्या प्रत्येक वर्गाला देणगी मिळत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हे नाते अनेक पिढ्या जपणारी ही शाळा आहे,’ असे संस्था सचिव दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सांगितले.शशिकला अभ्यंकर म्हणाल्या, ‘अनिरुद्ध हा शांत व स्वभावाने गरीब विद्यार्थी. त्याला भजनाची भरपूर आवड असल्याने मलासुद्धा मधल्या सुट्टीत अभंग म्हणायला सांगायचा. मस्ती नाही, गडबड नाही. शाळेला तबला, पेटी घ्यायची होती, तेव्हा आम्ही मदतीचे आवाहन केले. त्या वेळी अनिरुद्धने आईकडून ३०० रुपये आणून दिले. शाळेतून जाताना अनिरुद्धने मला गाणी, अभंगाची डायरी दिली, ती मी अजून जपून ठेवली आहे. आईच्या स्मरणार्थ त्याने शाळेसाठी देणगी दिली, हे कौतुकास्पद आहे.’भुर्के यांच्या भगिनी, शिक्षिका भारती खेडेकर यांनी आई-वडिलांच्या स्मृती जागवल्या. ‘अभ्यंकर बाईंमुळे मी माणूस म्हणून घडलो, असे अनिरुद्ध सांगतो,’ असे त्यांनी सांगितले. या शाळेला आपण विसरू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.या वेळी अभ्यंकर विद्यामंदिरच्या सेवानिवृत्त शिक्षिका वैदेही रायकर, विजया टिकेकर, सुधा घाणेकर, अनुराधा जोशी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना रिसबूड व सर्व शिक्षिका, सेविका, अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर, प्रकाश कदम, श्री. डांगे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सूत्रसंचालन केले. शाळा व्यवस्थापक राजीव गोगटे यांनी आभारप्रदर्शन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search