Next
थिबा संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला ‘आसमंत’चे प्रायोजकत्व
BOI
Monday, January 14, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे आयोजित केला जाणारा थिबा संगीत महोत्सव या वर्षी तपपूर्तीचा उंबरठा ओलांडत आहे. या १२ वर्षांतील गेली आठ वर्षे महोत्सवाला पहिल्या दिवशी ‘कै. शरदराव पटवर्धन कुटुंबीय’ आणि ‘आसमंत बेनेव्हलन्स’चे प्रायोजकत्व लाभत आहे. त्यामुळे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांना संगीतकला विनामूल्य अनुभवता आली आहे. यंदाही विदुषी देवकी पंडित यांचे गायन ऐकण्याची पर्वणी रसिकांना ‘आसमंत बेनेव्हलन्स’च्या माध्यमातून लाभणार आहे.

शरदराव पटवर्धन हे संगीत उपासक होते. देवगड येथे मफतलाल हायस्कूलमध्ये ४० वर्षांहून अधिक सेवा बजावणाऱ्या शंकरराव टेंकशे यांच्याकडून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. विशेष बाब म्हणजे टेंकशे यांनी सेवानिवृत्तीनंतर गायनात संगीत अलंकार व डॉक्टरेट मिळविली होती. अशा संगीतसाधक टेंकशे यांच्याकडून पटवर्धन यांना शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण झाली.

आपल्या गुरुप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पटवर्धन यांनी २००५ पासून रत्नागिरीत शास्त्रीय सांगितिक कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्यास सुरुवात केली होती. आता शरदराव यांच्या पश्चात संगीत उपासक असलेले त्यांचे चिरंजीव नंदकुमार पटवर्धन हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवित आहेत. नंदकुमार यांनाही वडिलांकडून शास्त्रीय संगीताबद्दल रुची निर्माण झाली.  वडिलांचा वारसा व आपली रुची जपण्यासाठी म्हणून ते आर्ट सर्कल आयोजित थिबा संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वडील शरद यांचे गुरू शंकरराव टेंकशे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली आठ वर्षे प्रायोजकत्व देत आहेत.

२०१० साली सुरू झालेला हा उपक्रम नवव्या वर्षीही अव्याहतपणे सुरू आहे. ‘कै. शंकरराव पटवर्धन कुटुंबीय’ आणि ‘आसमंत बेनेव्हलन्स’ यांच्या माध्यमातून २०१० साली विदुषी कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन, यानंतर २०११ सालच्या खंडानंतर २०१२ साली पं. रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन, २०१३ साली पं. राजन-साजन मिश्रा यांचे गायन, २०१४ साली पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन, २०१५ साली पं. राहुल शर्मा यांचे संतुरवादन, २०१६ साली उस्ताद राशीद खान यांचे गायन, २०१७ साली पं. रोणू मुजुमदार व डॉ. कद्री गोपालनाथ यांची बासरी व सॅकसाफोन जुगलबंदी, तर गतवर्षी २०१८ साली पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता आली.
 
या वर्षी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २५ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता विदुषी देवकी पंडित यांचे गायन ‘कै. शरदराव पटवर्धन कुटुंबीय’ आणि ‘आसमंत बेनेव्हलन्स’ यांच्या माध्यमातून रसिकांना विनामूल्य अनुभवता येणार आहे. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांची हार्मोनियमसाथ, तर रोहित मुजुमदार यांची तबलासाथ लाभणार आहे. संगीत रसिकांनी या पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search