Next
सत्संग...
BOI
Thursday, May 03, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गुरमीत राम रहीम, आसारामबापू अशा कथित आध्यात्मिक गुरूंना शिक्षा झाल्याच्या घटना अलीकडच्या काही काळात पाहायला मिळाल्या. त्यावर भाष्य करणारे अनेक लेख, चित्रे, व्यंगचित्रेही माध्यमांतून प्रसिद्ध झाली; मात्र भूपेन खक्कर नावाच्या कलाकाराने पंचविसेक वर्षांपूर्वी म्हणजे अशा प्रकारांची जेमतेम सुरुवात असतानाच त्यातील फोलपणा ओळखून त्यावर भाष्य करणारी चित्रे बिनधास्तपणे काढली होती. एखाद्या कलाकाराला समाजातील विसंगती पाहण्याची दूरदृष्टी किती आणि कशी असू शकते, याचे हे एक चांगले उदाहरण. ‘स्मरणचित्रे’ या सदरात या वेळी पाहू या भूपेन खक्कर यांच्या १९९५मधील ‘सत्संग’ या चित्रप्रदर्शनाबद्दल...
..........
मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीच्या वर असलेल्या केमोल्ड गॅलरीत १९९५च्या सुमारास ‘सत्संग’ नावाने जलरंग आणि रेखाचित्रांचे प्रदर्शन भरले होते. ही चित्रे मजेशीर स्वरूपाची म्हणावीत अशी होती. त्या प्रतिमांमध्ये एक प्रकारची विनोदाची झालर होती. कला महाविद्यालयात तेव्हा शिकविल्या जाणाऱ्या जलरंगाच्या कामातील ‘चांगल्या’ म्हणाव्यात अशा गुणवत्तेचे निकष लागणे येथे शक्यच नव्हते. किंबहुना हे निकष धाब्यावर बसवण्यात आले होते. परंतु चित्रप्रतिमाच इतक्या प्रभावी होत्या, की असल्या तांत्रिक बाबी नगण्य ठरल्या, अशी अवस्था.

भूपेन खक्कर या चित्रकाराच्या ‘सत्संग’ या चित्रमालिकेतील हे प्रदर्शन होते. १९९५च्या सुमारास हा विषय आणि आशय नावीन्यपूर्ण होता. साधारणतः एक मुख्य व्यक्ती आणि तिच्या आजूबाजूला तिचे भक्तगण असा काहीसा हा विषय मांडण्यात आला होता. गुजरात-राजस्थान भागात तेव्हा असे ‘सत्संग’ बहुधा नव्यानेच सुरू झाले असावेत. त्यावर भूपेन ‘महाराजांचं’ हे खास भाष्यच म्हणावे लागेल. ‘टीव्ही’वर नुकतेच असे ‘सत्संग’वाले चॅनल्स यायला लागले होते बहुधा आणि एकूणच या सगळ्या व्यवहारांवर ते त्याचे खास भाष्य होते. हे ‘सत्संग’ खरेच कोणकोणत्या पदरांनी गुरफटलेले असतात, त्याची बोलकी चित्रे भूपेनने रेखाटली होती. भूपेनने केलेली ही चित्रे आणि ‘सत्संगा’ची प्रकरणे पुढे गुन्ह्याच्या रूपात समाजासमोर येणे म्हणजे भूपेनला हे गोलमाल आहे हे आधीच जाणवले होते आणि त्याने तसे चित्ररूपात व्यक्त केले होते. बाबा कोण याने फरक पडत नाही. बहुधा सगळे एका माळेचे मणीच. उदाहरणार्थ पुढील काळातील घटना म्हणजे आसारामबापूंची तुरुंगात रवानगी होणे आणि डेरा सच्चा सौदासारख्या अनेक आश्रमांतील प्रकरणांवर किंवा दैनंदिन व्यवहारांवर भाष्य करणारी ही प्रातिनिधिक चित्रे होती. ही प्रकरणे लोकांसमोर येण्यापूर्वीच भूपेनने असे व्यवहार आपल्या चित्रांत टिपले होते. ‘सत्संग’ हे मार्मिक नाव प्रदर्शनाला दिले होते. नानाविध आश्रमातील घटनांची ‘प्रकरणे’ होण्यापूर्वीच भूपेनच्या कलात्मक नजरेतून त्या गोष्टी सुटल्या नव्हत्या. सत्संगाच्या नावाखाली चालणारे चाळे, सभ्य अत्याचार भूपेनने जणू वेगळ्या स्वरूपात मांडले होते.... खास भूपेनच्या शैलीत. 

भूपेन खक्करभूपेनचा मुक्काम तेव्हा बडोद्याला होता. ‘बडोदा स्कूल’ ही संकल्पना एका प्रदर्शनाच्या निमित्ताने वापरली गेली. पुढे ती गीता कपूर या सुप्रसिद्ध कलासमीक्षिकेने वापरली. यामध्ये प्रामुख्याने गुलाम मुहम्मद शेख, जेराम पटेल आणि भूपेन खक्कर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. कथनात्मकता हा त्या स्कूलचा प्रमुख गुणधर्म. एका अर्थाने भूपेन हा या सगळ्याचा अध्वर्यू म्हटले तर वावगे ठरू नये. ‘सत्संग’ प्रदर्शन पाहायला त्या दिवशी तरी मी आणि दोन-चार माणसे इतकेच होतो. गॅलरीत लहानशा टेबलामागे गॅलरीचे मालक केकू गांधी आपल्या कामात गढलेले होते. चित्रे अगदी तपशिलाने रंगवलेली. आकर्षक किंवा भडक रंग फार कौशल्याने वापरलेले. भूपेनला स्वतंत्र रंगसंगती सुचते असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. ‘सत्संग’मधीलच एका चित्राचे उदाहरण पाहू. त्याच नावाचे हे चित्र होते. नदीकाठावरील या चित्रात गडद काळी पार्श्वभूमी. अगदी अंधारून आलेले. रात्रीची वेळ. झाडाखाली कोणी एक अनाम ‘महापुरुष’ बसलेले. समोर पन्नास-शंभर माणसे बसलेली. ‘सत्संगा’साठी जमलेल्या बाया-बापडे... सगळे जमलेले भक्तगण... काहींचे हात नमाजपठणाला उंचावतात तसे उंचावलेले, तर काही टाळ्या पिटण्यात दंग झालेले. काही धोतरात व त्यावर उघडे, तर काही जण कपडे नीट घातलेले. काही बोडक्या डोक्याचे, तर काही टोपी-फेटे घातलेले. काही दिव्यांच्या माळांचे दिवे असतात तसे आतून प्रकाशमान का काय तसे झालेले. मजेशीर दृश्य. एका कोपऱ्यात एक लहानसा गट करून ‘सत्संगीं’चा भावी किंवा ज्युनिअर गुरू मार्गदर्शन करणारा. दोन व्यक्ती एकमेकांसमोर अगदी खेटून बसल्यासारख्या अनाम ‘सत्संगा’त. चित्रे रंगवण्याची भूपेनची तऱ्हा न्यारी होती. रंगविताना मानवी शरीरातून प्रकाश बाहेर येतोय, अशी असणारी रंग-प्रकाश योजना. झाडावर दिव्यांच्या माळा सोडाव्यात तशी प्रकाशयोजना. तांबडा, नारिंगी, पिवळा, निळा अशा प्रकाशांनी एकेक मानवाकृती उजळून निघालेली. ही दृश्ये भारतात सर्वत्र दिसतात. परंतु हे आपल्या चाणाक्ष नजरेतून टिपणारा, त्यावर भाष्यचित्रे करणारा भूपेनच. वर आकाशात रात्री ढग जमलेले... हे ढग त्याने भारतीय लघुचित्राप्रमाणे वाटावेत असे रेखाटलेले. रंगात आणि रंगलेपनात खूपच मोकळेपणा... ना कलाकृती करताना घाबरणे... ना मांडताना संकोच, हा भूपेनचा गुणधर्म. या सर्वच चित्रांमधील ‘सत्संगी’ बहुतेक एका बाजूने पाहिल्यासारखे रंगवलेले... आणि सगळा खेळ काय तो नाटकी प्रकाशाचा.

अशाच स्वरूपाच्या एका चित्रात रंग नाहीत. फक्त काळा-पांढरा प्रकाशाचा खेळ. मागे नदी वाहतेय झाडाखाली ‘सत्संग’ सुरू आहे, असा काहीसा देखावा. भूपेनने भारतीय नागरी लोकसंस्कृतीतील, जीवनातील अनेक घटना, सामान्य घडामोडी, उपक्रम-कार्यक्रम, माणसे, त्यांच्या नाना हालचाली, स्वभाव, भाव आणि त्यांची स्वतःच केलेली खास रूपके यांना आपल्या चित्रांत मोठे स्थान दिले आहे. 

साध्या वस्तूंना त्याने रूपकांद्वारे वेगळेच आयाम दिलेत. भूपेनने तो ‘गे’ म्हणजे समलिंगी असल्याचे जाहीर केल्यावर त्याची चित्रे गीता कपूरने त्या दृष्टिकोनातून पाहिली. चित्रातील ‘मासा’ हा घटक रूपक म्हणून पुरुषांचे प्रतिक तर ‘होडी’ म्हणजे स्त्रीत्वाचे प्रतीक असावे, असा कयास गीता कपूर यांनी बांधला. असे अनेक संबंध व रूपक योजना भूपेनच्या चित्रांत दिसते. इंग्रजीत ज्याला आपण मेटॅफर म्हणतो, तशी अनेक मेटॅफर म्हणजे रूपके भूपेनने चित्रात वापरली. काहींचा अन्वयार्थ सार्वत्रिक आहे, तर काही अत्यंत खासगी आहेत.

अगदी साध्या आणि परिचित कथांनादेखील भूपेनने चित्ररूप दिले आहे. उदाहरणार्थ, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ ही कथा. मुलगा, बाप व गाढवाची कथा इत्यादी. अशा परिचित वस्तू-गोष्टी, ज्याला इंग्रजीत ‘पॉप’ म्हणतात, त्या भूपेनने चित्रात वापरल्या. ब्रिटिश चित्रकारीमध्ये १९६०च्या सुमारास ‘पॉप आर्ट’ हा कलाप्रकार होता. तो बडोदा येथे पोहोचत होतो. भूपेन त्याच्या संपर्कात आला. भूपेनला तेव्हा नवी अशी संकल्पनांची जणू साखळीच मिळाली असे म्हणावे लागेल. भूपेनने ‘पॉप आर्ट’ला किंवा ‘पॉप्युलर कल्चर’ला आपलेसे करताना एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवले.

‘सत्संग’ प्रदर्शनात साधारणत: फुल इम्पेरियल साइजपासून ते ए-फोर साइजपर्यंतच्या कागदावर केलेली चित्रे होती. सहजता आणि जमेल तसे तणावरहित, साध्या पद्धतीने चित्रे काढणे हा भूपेनचा जणू प्रकृतिभाव होता. ‘सत्संग’ नावाच्या १९८८च्या एका चित्रात हार हातात घेतलेला साधा माणूस खूप गोरा रंगवलेला. त्याच्या मागे तांबडा चश्मा घातलेली, गडद त्वचेची व्यक्ती, असे काहीसे दृश्य डाव्या बाजूला. उजवीकडे घराच्या भिंतीवर लावलेल्या फोटोला हार घालून नमस्कार करणारा माणूस, पुढे पादुकांचे पूजन करणारे आणि काही पोथी-पुस्तके वाचणारे आणि सगळे ‘सत्संगा’त असे सगळे दृश्यवर्णन. 

भूपेन चित्र रंगवताना तुमच्यासाठी काही प्रश्न उपस्थित करतो. प्रदर्शने जर सावकाशपणे, गांभीर्याने पाहायला लागलो, तर शब्दकोड्यांप्रमाणे ही चित्रकोडी आपल्याला विचार करायला लावतात. रंगांचा तजेलदार वापर केला असला, तरी त्यांना काबूत ठेवण्याचे एक कसब भूपेनकडे होते, असेही चित्र पाहताना जाणवते. त्याच्या चित्रांतून काही मजेशीर पाहिल्याचा अनुभव येतो.

प्रदर्शन पाहून खाली आलो, तेव्हा ‘जहांगीर’च्या बाहेरच्या कट्ट्यावर पांढऱ्या केसांचा, जाड चष्मा लावलेला काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला मनुष्य बसलेला होता. जहांगीर गॅलरीच्या रखवालदाराला मी त्याच्याबद्दल विचारले, तेव्हा त्याने तो भूपेन खक्कर असल्याचे सांगितले. मी त्याला भेटलो नाही. बराच वेळ तो तसाच बसून होता, एकटाच, शांतपणे, इकडे-तिकडे पाहत. त्याच्या चेहऱ्यात आणि त्याच्याच चित्रांमधील व्यक्तीमध्ये मला उगीचच साधर्म्य जाणवत राहिले. १९९६ला प्रसिद्ध झालेल्या ‘बडोद्यातील समकालीन कला’ या पुस्तकाच्या शीर्षकात ‘About the commonness of the common man : Bhupen Khakhar’ असे लिहिलेले आहे. भूपेनची चित्रे पाहिली, की सर्वसामान्य माणसातील साधर्म्याच्या हजारो छटांचा चित्रपटच आपल्यासमोर उभा राहतो...  

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(https://bhupenkhakharcollection.com या वेबसाइटवर भूपेन खक्कर यांच्याबद्दलची अधिक माहिती आणि त्यांची चित्रे उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search