Next
मोनिश गायकवाड यांच्यासह भिवंडीतील पत्रकारांचा शिवसंकल्प प्रतिष्ठानतर्फे गौरव
मिलिंद जाधव
Thursday, August 22, 2019 | 04:19 PM
15 0 0
Share this article:भिवंडी :
भिवंडीतील पत्रकार मोनिश गायकवाड यांच्यासह अनेक पत्रकारांना शिवसंकल्प प्रतिष्ठानतर्फे नुकतेच गौरवण्यात आले. ‘पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सदैव जबाबदारीचे भान राखून पत्रकारिता केल्यास समाजाला दिशा देण्यात नक्की यश मिळते,’ असे उद्गार भिवंडी महानगरपालिकेचे महापौर जावेद दळवी यांनी या पत्रकार सन्मान सोहळ्यावेळी काढले.

शिवसंकल्प प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांच्या हस्ते ‘जय महाराष्ट्र’चे भिवंडी प्रतिनिधी मोनिश गायकवाड यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

या वेळी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा, कामगार नेते विजय खाणे, मनसे पदाधिकारी अफसर खान मोतीवाले, वसीम पपू भाई यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. महापौर जावेद दळवी म्हणाले, ‘शहरातील समस्या परखडपणे मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत. काही पत्रकारांकडून अर्धवट माहितीआधारे बातमी छापली जाते व त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. त्यामुळेच बातमीची विश्वासार्हता महत्त्वाची असून, ती जपणाऱ्या पत्रकारांमुळेच समाजात पत्रकारांबद्दल आदराने बोलले जाते.’

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा म्हणाल्या, ‘पोलीस यंत्रणेसोबतच पत्रकारसुद्धा दक्ष राहिल्यानेच समाजातील गुन्हेगारीवर आसूड ओढता येतात. माझ्या तीस वर्षांतील सेवाकाळात प्रथमच अशा पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात येण्याचे भाग्य लाभल्याने मी सुट्टी असतानाही त्यास टाळू शकले नाही.’

प्रास्ताविकात शिवसंकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज गुळवी यांनी संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तालुक्यातील आदिवासी पाडे-वस्त्यांवर जीवनावश्यक साहित्याचे वितरण, डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान, महिला दिनी कर्तबगार महिलांचा सन्मान करीत असतानाच सदैव समाजाच्या चांगल्यासाठी काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्याची संकल्पना पुढे आली, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या कामाचे कौतुक करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक मनोज गुळवी, संचालिका कोमल पाटील, पूजा ताले, तालुकाध्यक्षा ललिता म्हात्रे, शहर पश्चिम अध्यक्ष सिद्धार्थ खाने, साईनाथ सुरकुटलेवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शहरातील ज्येष्ठ पत्रकार संजय भोईर (प्रहार) यांच्यासह शरद भसाळे, किशोर पाटील, संध्याताई पवार, सूरजपाल यादव, अनिल वर्मा यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंकल्प प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search