Next
हा सगळा खेळ चर्चेचा!
BOI
Monday, September 23, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

दर वर्षी हिंदी दिवस येतो, दर वर्षी सरकारातील मंत्री किंवा अधिकारी एखादे वक्तव्य करतात आणि त्यावरून वादाचा धुरळा उडतो. तेच तेच चेहरे तेच तेच जुने युक्तिवाद करतात आणि त्याच त्याच जुन्या अभिनिवेशाला लोक फशी पडतात. साधारणतः आठवडाभर किंवा महिनाभर हा खेळ चालतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या!
...........
आता हे नेहमीचेच झाले आहे. दर वर्षी हिंदी दिवस येतो, दर वर्षी सरकारातील मंत्री किंवा अधिकारी एखादे वक्तव्य करतात आणि त्यावरून वादाचा धुरळा उडतो. तेच तेच चेहरे तेच तेच जुने युक्तिवाद करतात आणि त्याच त्याच जुन्या अभिनिवेशाला लोक फशी पडतात. ‘हाथी चले अपनी चाल’ या उक्तीप्रमाणे एक भाषा वाढत जात आहे आणि तिच्या नावाने धोशा लावत काही जण आपल्या बेटकुळ्या दाखवत आहेत. हे दृश्य दर वर्षीचे झाले आहे. साधारणतः आठवडाभर किंवा महिनाभर हा खेळ चालतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी असावी हे स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न होते. त्यामुळे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा झाली पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आणि जणू मधमाशांच्या पोळ्यावर कोणी धोंडाच मारला. ‘आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, याकडे काही लोक एखादे ओझे म्हणून पाहतात. परंतु, एका देशात अनेक भाषा बोलल्या जाणे ही एक सुंदर बाब आहे. असे असले तरीही देशाची अशी एक भाषा असणे खूप आवश्यक आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा झाली पाहिजे याचा आग्रह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी धरला होता. संपूर्ण देशाला जोडण्याची क्षमता हिंदीतच आहे,’ असे अमित शहा हिंदी दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

शहा यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येणे सुरू झाले. नेहमीप्रमाणे कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांत हिंदीच्या विरोधात आवाज उमटला. अनेक कन्नड आणि तमिळ संघटनांनी हिंदी भाषा लादण्याचा जुनाच आरोप नव्याने केला. निदर्शने आणि धरणे आंदोलन केली. तसेच हिंदी दिवस साजरा न करण्याची मागणीही या संघटनांनी केली आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी यात स्वाभाविक आघाडी घेतली व हिंदी लादण्याच्या विरोधात लगोलग आंदोलनाची घोषणाही केली. (दोन दिवसांच्या आत शहा यांनी केलेल्या खुलाशानंतर त्यांनी ते प्रस्तावित आंदोलन म्यान केले).

अभिनेते आणि आता मक्कळ नीधी मैयम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनीही या वादात उडी घेतली. तमिळ लोकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न झाल्यास जल्लिकट्टूवरील बंदीविरोधात झालेल्या आंदोलनापेक्षा अधिक प्रखर आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यावर भाजपचे नेते आणि राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटरवरून उत्तर दिले. एरव्ही वादांपासून दूर असणारे सुपरस्टार रजनीकांत हेही त्यात उतरले. ‘राष्ट्रीय एकीकरणासाठी एखादी संपर्क भाषा असणे हे चांगलेच आहे. परंतु एखादी भाषा नागरिकांवर लादणे चुकीचे आहे. हिंदीची जबरदस्ती कोणत्याच प्रकारे होऊ नये. तमिळनाडूच नव्हे, तर दक्षिण भारतातील कोणतेही राज्य हिंदीची सक्ती मान्य करणार नाही,’ असे ते म्हणाले. गेल्याच महिन्यात रजनीकांत यांनी मोदी आणि अमित शहा यांना कृष्ण आणि अर्जुनाची उपमा दिली असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व येणे स्वाभाविक होते.

अन्य पक्षांनीही या वादात आपला खारीचा वाटा उचलला. ‘आपल्या देशात अनेक भाषा आणि संस्कृती आहेत. त्यांचा सन्मान योग्य रीतीने झाला पाहिजे. आपण नव्या भाषा शिकलो, तरीही आपल्याला आपली मातृभाषा कधीही विसरता कामा नये,’ असे ट्विट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या राज्यात कन्नड हीच प्रमुख भाषा राहील, असे सांगितले. 

इकडे भाजपच्या समर्थकांनी पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री असताना २०१०मध्ये केलेले एक भाषण समोर आणले. त्यांच्या आणि शहा यांच्या भाषणात तसा पाहू जाता काही फरक नाही, हे दाखवणे हा त्यामागचा हेतू. हिंदीला राज्यघटनेतच राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे आणि ज्या दिवशी हा मान्यतेचा प्रस्ताव मंजूर झाला, त्याची आठवण म्हणूनच हिंदी दिवस साजरा केला जातो. त्यामुळे केंद्रात सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही पक्षासाठी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करणे हे कर्तव्यकर्म आहे. मग त्या पदावर चिदंबरम असोत किंवा शहा असोत. असेच भाषण चिदंबरम यांनी केले होते. अर्थात मंत्र्यांची भाषणे सनदी अधिकारीच लिहीत असल्याने आणि या अधिकाऱ्यांच्या भाषेचाही एक साचा असल्याने ते स्वाभाविक होते. विशेष म्हणजे हिंदीला विरोध हेच आपले जीवितकार्य मानणारी द्रमुक ही त्या वेळी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचा भाग होता. त्यांच्याही पूर्वी महात्मा गांधींपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत आणि महाकवी सुब्रह्मण्यम भारतींपासून काकासाहेब कालेलकरांपर्यंत सर्वांनी हेच तर सांगितले होते. मग त्या वेळी मौन पाळणाऱ्या द्रमुकला या वेळी कंठ का फुटला, याचे कारण निव्वळ राजकारण.

तमिळनाडूची वास्तविक परिस्थिती काहीही असली, तरी आजही तेथील राजकारणाच्या बाजारात तमिळ भाषा, अभिमान आणि संस्कृती हा जिन्नस मोठ्या प्रमाणात विकला जातो. द्रमुक आणि तत्सम विचारसरणीच्या अन्य पक्षांसाठी जेव्हा अन्य सर्व गोष्टी अवघड असतात, तेव्हा कार्यकर्ते जमवणे आणि त्यांना कार्यप्रवृत्त करणे यासाठी एकच वस्तू कामाला येते - हिंदीच्या सक्तीची आरोळी! दुर्दैवाने कर्नाटक, केरळसारखी अन्य राज्ये आणि आपल्याकडेही याचे लोण अलीकडे पसरले आहे आणि त्याहूनही वाईट म्हणजे स्वभाषेवरील प्रेम म्हणजे हिंदीला विरोध असे समीकरण रूढ झाले आहे.

आज परिस्थिती काय आहे? तुम्ही तमिळनाडूतील कुठल्याही उपाहारगृहात गेलात, तर तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार किंवा ईशान्येतील किमान दोन-चार कर्मचारी सापडतील. तीच परिस्थिती केरळबाबतही आहे आणि कर्नाटकाबाबतही आहे. तसेच राज्यात सीबीएसई अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या शाळांमध्ये हिंदी ही भाषेच्या रूपात शिकवली जाते आणि गंमत म्हणजे यातील बहुतांश शाळा हिंदी शिकण्यास विरोध करणाऱ्या राजकारण्यांच्या कुटुंबीयांच्या आहेत. तमिळ भाषेतील असंख्य वाहिन्यांपैकी मोजक्या वाहिन्या सोडल्या, तर बहुतांश वाहिन्यांवर हिंदी भाषांतील डब मालिका दाखवल्या जातात. मदुरै, कन्याकुमारी किंवा चेन्नई अशा ठिकाणी, जेथे बाहेरून प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात, तेव्हा हॉटेलवाले आणि रिक्षावाले त्यांना हिंदीत साद घालतात. संवादाचे हे सूर आपल्यापर्यंत येत नाहीत, येतात त्या विरोधाच्या आरोळ्या!

त्यामुळे हिंदीचे नाव काढताच शिसारी आल्याचा आव कोणी कितीही आणला, तरी ती राष्ट्रीय भाषा किंवा दुवा भाषा आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. म्हणूनच कमल हासन यांनी हिंसेची गोष्ट काढताच, ‘आपल्याला एकत्र जोडण्यासाठी आणि नव्या संधी मिळण्यासाठी हिंदीची गरज आहे,’ असे उत्तर गायत्री रघुराम या अभिनेत्रीने लगोलग दिले.

फक्त त्याची चर्चा होत नाही!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search