Next
आषाढाच्या पहिल्या दिवशीं...
BOI
Wednesday, July 03, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:

आषाढाच्या पहिल्या दिवशी टिपलेले छायाचित्र (तीन जुलै २०१९) (अनिकेत कोनकर)

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, अर्थात महाकवी कालिदास दिन. त्या निमित्ताने, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’विषयी थोडेसे... 
..........
आषाढ महिन्याचा पहिला दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाची महती सांगणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे. 

पुरा कविनां गणनाप्रसंगे।
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः ।।
अद्यापितत्तुल्यकवेर्अभावात् ।
अनामिका सार्थवती बभूव ।।

त्याचा भावार्थ असा : 
पूर्वी एकदा महान कवींची गणना करण्याचे काम सुरू झाले. हाताच्या बोटांवर करंगळीपासून ते मोजायला सुरुवात झाली. पहिले नाव अर्थातच महाकवी कालिदासाचे होते; मात्र त्यानंतर अजूनही त्याच्या तोडीचा असा कोणी कवी सापडलेला नाही. त्यामुळे ‘अनामिका’ (करंगळीनंतरचे बोट) हे नाव सार्थ झाले.
‘मेघदूत’ हे त्याचे महान काव्य. पत्नीकविरहामुळे व्याकुळ झालेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीडला मेघाबरोबर पाठवलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत हे काव्य रचलेले आहे, हे सर्वश्रुत आहे. मंदाक्रांता वृत्ताच्या या रचनेत प्रत्येकी चार चरणांची १११ कडवी आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत ते विभागलेले आहे. या काव्याने अनेक कवी-लेखकांना भुरळ पाडली, प्रेरणा दिली. इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात या काव्याची निर्मिती झाली असे मानले जाते. त्यावर सुमारे नव्वदेक भाष्ये/टीका आहेत. अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत. 

रा. प. सबनीस, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ. श्रीखंडे, पं. ग. वि. कात्रे, ना. ग. गोरे, वसंतराव पटवर्धन, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शान्ता शेळके, द. वें. केतकर, अ. ज. विद्वांस आदी दिग्गजांनी ‘मेघदूता’चा मराठी अनुवाद केला आहे. चिंतामणराव देशमुखांनी तर याचे दोन अनुवाद केले आहेत. चिंतामणरावांसह पंडित ग. वि. कात्रे, बा. भ. बोरकर, द. वें. केतकर आणि अ. ज. विद्वांस यांनी मंदाक्रांता वृत्तातच अनुवाद केला आहे. काही रचना समश्लोकी आहेत, तर काही रचना वेगळ्या आहेत. मेघदूतात वर्णन केलेल्या मेघाच्या मार्गावरून विमानाने प्रवास करून निरीक्षणे नोंदवणारे कॅप्टन आनंद जयराम बोडस, डॉ. सुरेश विश्वनाथ भावे यांच्यासारखेही काही विद्वान आहेत. एकंदरीतच मेघदूत हे प्रेमाविषयीचे प्रेमात पाडणारे काव्य आहे. 

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे यातील तीन शब्द खूप प्रसिद्ध आहेत; मात्र ते संपूर्ण कडवे अनेकांनी वाचलेले नसते. ‘पूर्वमेघ’ या भागातील दुसऱ्याच कडव्यात हे शब्द आहेत. 

मूळ संपूर्ण कडवे असे आहे : 

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

‘आषाढस्य प्रथम दिवसे’च्या दोन चरणांचे काही मराठी अनुवाद...

आषाढाच्या प्रथम दिनिं तो मेघ शैलाग्रिं पाहे, 
दन्ताघातें तटिं गज कुणी भव्यसा खेळताहे
(अनुवाद : डॉ. चिंतामणराव देशमुख)

आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरीं मेघ वांकला,
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला!
(अनुवाद : शान्ता शेळके)

आषाढाच्या प्रथम दिनिं तया दिसे मेघ गिरिशिखरा
आलिंगुनिया रम्य, जणों गज तटा धडकतां झुकला
(अनुवाद : रा. प. सबनीस)

आषाढाच्या प्रथम दिवशी शिखरी टेकलेला
वप्रक्रीडे निपुण गजसा मेघ तो देखियेला
(अनुवाद : डॉ. शैलजा म. रानडे)

आषाढाच्या पूर्व समयी, वाकुनी क्रीडा करण्या
गजरूपाने, जणू मेघ, ढुसण्या देण्या, नभी आला
(अनुवाद : गोविंद ओझरकर)

आषाढाचा तो प्रथम दिन, पडे तयाच्या दृष्टीस
प्रचंड मोठा कृष्णमेघ, दिसतसे तो हत्तीसमान
सुळे मोठे उगारून
(अनुवाद : डॉ. ज्योती रहाळकर)

देखा प्रथम दिन आषाढ माह के, लिपटा एक बादल ऊँचे शिखर से
बादल न मानो मदमाता हाथी मूँह औंधा करके दाँतों से तिरछे
मिट्टी कुरेदे नगमेखला से ढूँसे पे ढूँसे मस्ती में जूझे
(अनुवाद : वैशाली नायकवडे)

एकच कल्पना किती वेगवेगळ्या प्रकारे, किती वेगवेगळ्या शब्दांद्वारे, किती विविध कल्पनांतून मांडता येऊ शकते, याची ही फक्त एक छोटीशी झलक. संपूर्ण आस्वाद घ्यायचा असेल, तर मेघदूत संपूर्णच वाचायला हवे. कालिदासाला वंदन! (मेघदूताचे मराठी अनुवाद या नावाचे पुस्तक डॉ. अरुणा रारावीकर यांनी लिहिले असून, त्यात प्रमुख अनुवादांचा परामर्श घेतला आहे.)

(‘मेघदूत’ या महाकाव्याचे काही अनुवाद ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
suhas paranjape About 109 Days ago
One more parallel translation of meghdut is published titled as Kashchit Kanta. It is published by mrudgandha prakashan. We may be available on Book Ganga
0
0

Select Language
Share Link
 
Search