शेअर बाजारातील गुंतवणूक ही एक जोखमीची बाब असते. प्रत्येकाने आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करायला हवी. ती केल्यानंतर कंपनीचे निदान दोन-तीन त्रैमासिक आकडे प्रसिद्ध होईपर्यंत थांबायची तयारी हवी. शिवाय त्या आकड्यांचा अभ्यासही करता यायला हवा. सल्लागार फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. त्यामुळे ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ ही म्हण सदैव लक्षात हवी...........
गेल्या आठवड्यात शेअर बाजारावर कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सावट होते. भाजपला १०७ जागा मिळाल्याने तो मोठा पक्ष ठरला. तरी बहुमतासाठी त्या पक्षाला सहा उमेदवार कमी पडत होते. विश्वासदर्शक ठराव भारतीय जनता पक्षाने जिंकला असता, तर सोमवारी (२१ मे २०१८) शेअर बाजार ३०० अंकांनी तरी वर गेला असता.
ग्राफाइट इंडिया आणि हेग हे शेअर्स कंपन्यांच्या मार्च २०१८ तिमाहीच्या कामगिरीमुळे वर जात आहेत. ‘ग्राफाइट इंडिया’ हा शेअर ८३४ रुपयांपर्यंत वर चढला होता; पण शुक्रवारी तो ७९२ रुपयांवर बंद झाला. सोमवारी (२१ मे)तो ७७५ रुपयांपर्यंत मिळाला, तर जरूर घ्यावा. डिसेंबर २०१८पर्यंत तो ९५० ते १००० रुपयांपर्यंत जाईल. त्याचे मार्च २०२०चे शेअरगणिक उपार्जन १०० रुपये अपेक्षित आहे. हेगचा शेअरही ३४०० रुपयांखाली मिळाला, तर जरूर घ्यावा. वर्षभरात तो किमान ४६०० रुपये होईल. हेग व ग्राफाइट इंडिया हे शेअर अजून दोन वर्षे फायदेशीर ठरतील.
रेन इंडस्ट्रीजचा शेअर सध्या २४१ ते २४८ रुपयांपर्यंत मिळत आहे. पेट्रोलियम, कोक, कोल टार, सिमेंट, प्रायमरी अॅल्युमिनियम अशी या कंपनीची अनेक उत्पादने आहेत. तिचे जगभरात एकूण आठ कारखाने आहेत. गेल्या १२ महिन्यांतील या शेअरचा किमान व कमाल भाव अनुक्रमे ९२ रुपये व ४९५ रुपये होता. सध्या हा शेअर विकत घेतला, तर वर्षभरात ३४० रुपयांचा भाव दिसेल आणि ४० टक्के नफा होईल.

शेअर बाजारात मागील वर्षाची कामगिरी बघून पुढील वर्षाचे अंदाज बांधता येतात. तरीही येत्या काळात उत्पादनाला मिळणारे जागतिक व स्थानिक भाव, आयात-निर्यातीबाबतचे धोरण, जागतिक शेअर बाजारातील मंदी यावरही भाव खाली-वर होत असतात. गुंतवणूक ही एक जोखमीची बाब असते. प्रत्येकाने आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करायला हवी. ती केल्यानंतर कंपनीचे निदान दोन-तीन त्रैमासिक आकडे प्रसिद्ध होईपर्यंत थांबायची तयारी हवी. शिवाय त्या आकड्यांचा अभ्यासही करता यायला हवा. सल्लागार फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. त्यामुळे ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ ही म्हण सदैव लक्षात हवी.
यंदा पावसाळा समाधानकारक असणार आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात राहावी. त्यातून जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक व्याजधोरण जाहीर होईल. तिथे दर व्याजाच्या दरात वाढ झाली, तर तेजीला आळा बसेल. अन्यथा ती दिवाळीपर्यंत चालू राहावी.
- डॉ. वसंत पटवर्धन (लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)
(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)