Next
‘आकार’तर्फे पाच ऑगस्टला गौरव समारंभ
प्रेस रिलीज
Monday, July 30, 2018 | 05:12 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना आकार फाउंडेशनचे संस्थापक प्रा. राम वाघ आणि प्रा. बाजीराव जाधवर.पुणे : ‘आकार फाउंडेशनद्वारे पुणे विभागातील २०१७-१८ या वर्षात एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या माता-पित्यांच्या गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशात महत्त्वाचा वाटा असलेल्या माता-पित्यांना गौरविण्याचा हा पहिलाच कार्यक्रम असून, हा कार्यक्रम पाच ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे,’ अशी माहिती आकार फाउंडेशनचे संस्थापक प्रा. राम वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी आकार फाउंडेशनच्या पुणे विभागाचे केंद्र व्यवस्थापक प्रा. बाजीराव जाधवर उपस्थित होते.

प्रा. वाघ म्हणाले, ‘आकार फाउंडेशनच्या पुणे शाखेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आयोजिलेल्या महाराष्ट्र वीरांच्या या गौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गीते, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक सुवेज हक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख असणार आहेत. यावेळी चौघेही मान्यवर उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.’

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘आकार फाउंडेशन या स्वयंसेवी शैक्षणिक संस्थेद्वारे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून ३०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेद्वारे निवड करून त्यातील १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के व उर्वरित २०० विद्यार्थ्यांना ५० टक्के शिष्यवृत्ती देऊन यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांचे पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत मार्गदर्शन केले जाते. त्यातून लाभ घेऊन यंदा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या यशामध्ये सर्वांत जास्त महत्त्वाचा वाटा असलेल्या त्यांच्या आई-वडील यांचा प्रेरणादायी गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.’

‘विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी संघर्षातून यश मिळवलेल्या मार्गदर्शकांना बोलावले आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका छोट्या गावातील शेतकरी-कष्टकरी कुटुंबातून शेतीची कामे करून शिक्षण पूर्ण करत प्रशासकीय अधिकारी झालेले किरण गित्ते, धुळे जिल्ह्यातील सांगोडा येथील एका कष्टकरी भिल्ल कुटुंबातून भारतीय प्रशासकीय सेवेत यशस्वी झालेले डॉ. राजेंद्र भारूड, गडचिरोली येथे पोलिस अधीक्षक म्हणून उत्कृष्ट काम केलेले व सध्या दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी सुवेज हक आणि प्रशासनातील संत व्यक्तिमत्व व महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट वक्ते व अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेले जिल्हा परिषद कोल्हापूर येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले इंद्रजित देशमुख यांचा समावेश आहे,’ असे प्रा. वाघ यांनी सांगितले.

‘या मान्यवर वक्त्यांच्या मार्गदर्शनसह यशवंतांची मनोगते, अनुभवकथन व परिसंवाद सत्राचे आयोजन केले आहे. समारंभाच्या सुव्यवस्थेसाठी प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. या प्रवेशिका आकार फाउंडेशनच्या टिळक रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता येथील केंद्रावरून मिळतील. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी समारंभाच्या दिवशी सकाळी ७.३० वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी मिळतील,’ असेही प्रा. वाघ यांनी नमूद केले.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, पाच ऑगस्ट २०१८
वेळ : सकाळी ८.३० ते दुपारी दोन
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link