Next
‘विद्यार्थ्यांनी मनातील दीप प्रज्ज्वलित करावा’
रत्नागिरीच्या परशुरामपंत अभ्यंकर विद्यालयात अनोखे दीपपूजन
BOI
Saturday, August 11, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this story

दीप अमावास्येनिमित्त मांडलेले दिव्यांचे प्रदर्शन

रत्नागिरी :
‘दीप अमावास्येनिमित्त दिव्यांचे लक्षवेधी प्रदर्शन आयोजित करून परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमाची शाळा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेरणेचा संस्कार करते आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनातला दीप प्रज्ज्वलित करून शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे,’ अशी भावना रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर.

दीप अमावास्येनिमित्त शनिवारी, ११ ऑगस्ट २०१८ रोजी रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, ‘अनुबंध’ शॉर्टफिल्मचे निर्माते-दिग्दर्शक अॅड. संकेत घाग, अभिनेते शेखर जोशी, सदस्य विशाखा भिडे, जयंत प्रभुदेसाई, उद्योजिका श्रीमती स्मिता परांजपे, मुख्याध्यापक विनोद नारकर आदी उपस्थित होते.

दीपप्रज्ज्वलन करताना मुख्याध्यापक विनोद नारकर.सर्व दीप मान्यवरांच्या हस्ते प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वी सीमेवर हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे, तसेच अन्य शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. अनुबंध फिल्मला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल निर्माते अॅड. घाग, फिल्ममधील कलाकार शेखर जोशी व या शाळेतील विद्यार्थी वरद पाटणकर आणि स्मित पानगले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक त्यांना भेट म्हणून देण्यात आले. 

अॅड. संकेत घाग यांचा सत्कार करताना अॅड. बाबा परुळेकर. शेजारी अॅड. विनय आंबुलकर, जयंत प्रभुदेसाई, शेखर जोशी, अॅड. सुमिता भावे, दाक्षायणी बोपर्डीकर, स्मिता परांजपे.

‘मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्या वेळी गणित, मराठी या विषयांमध्ये मला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. ती आठवण सांगताना खूप समाधान होत आहे. तेच समाधान आज शाळेने केलेल्या सत्कारावेळी वाटत आहे,’ अशी भावना अॅड. घाग यांनी व्यक्त केली.

दीप प्रज्ज्वलित झाल्यानंतरचे मनमोहक दृश्य.

दिव्यांचे प्रदर्शन
प्रकाशाचे स्रोत असणाऱ्या दिव्यांचे महत्त्व आणि त्यांचे प्रकार विद्यार्थ्यांना कळावेत, या हेतूने दीप अमावास्येचे औचित्य साधून या विद्यालयात दिव्यांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदाच्या या प्रदर्शनालाही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गारगोटीचे दगड एकमेकांवर घासल्यावर ठिणगी पडते आणि त्यातून अग्नी निर्माण होतो, असा शोध माणसाला लागला होता. त्यामुळे गारगोटीचे दगड हे एक प्रकारचे प्रकाशस्रोतच. म्हणूनच त्या दगडांचाही या प्रदर्शनात समावेश होता. त्याशिवाय पारंपरिक दगडी दिव्यांपासून ते अगदी आजच्या आधुनिक काळातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध दिव्यांची या प्रदर्शनात आकर्षकरीत्या मांडणी करण्यात आली होती. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी साकारण्यात आलेली अंतराळयान व स्पेस शटलची प्रतिकृती.प्रेरणादायी व ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमात अंतराळयानाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. तसेच माहितीचे फलक प्रदर्शित करण्यात आले होते. 

दीप प्रदर्शनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून शाळेत चालू असून, यातून विद्यार्थ्यांवर संस्कार होतात व त्यांना प्रेरणा मिळते. दिवसभरात सुमारे एक हजार पालक, नागरिकांनी हे प्रदर्शन पाहिले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक संघाच्या प्रतिनिधींचा आयोजनात सहभाग होता.

(या उपक्रमाची छोटीशी झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
विशाखा भिडे About 196 Days ago
Sundar aayojan dip mahatv
0
0

Select Language
Share Link