Next
‘फिनोलेक्स’, ‘मुकुल माधव’तर्फे ‘कृषी’च्या ५९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 05:50 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यात नुकताच याबाबतचा सामंजस्य करार झाला. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संचालक डॉ. ए. एल. फरांदे, पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कंपनी सेक्रेटरी देवांग त्रिवेदी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

कृषी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या एकूण ५९ गरजू विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार असून, त्यामध्ये पदवीसाठी ३६, पदव्युत्तर पदवीसाठी २०, तर पीएचडी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दर वर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रासाठी प्रोत्साहन मिळण्यासह त्यातील तज्ज्ञता प्राप्त करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ‘फिनोलेक्स’कडून गेल्या आठ वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना सन्मानित केले जात आहे.

शिष्यवृत्तीच्या उपक्रमाबरोबरच फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन कृषी विद्यापीठाच्या ‘रूरल अॅग्रीकल्चर वर्क एक्स्पिरियन्स’ (रावे) अर्थात ग्रामीण कृषी कार्यानुभव अभियानात सहभागी होणार आहे. ‘रावे’अंतर्गत विद्यार्थी ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबद्दल मार्गदर्शन करणार आहेत; तसेच प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेणार आहेत. यामध्ये विद्यार्थी तेथील बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींची माहिती फाउंडेशनला पुरवतील. त्यानुसार शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना लागणारे साहाय्य, उपकरणे पुरवले जाणार आहेत. २२ आठवड्यांच्या या प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना सहकार्य मिळणार आहे.

रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘‘फिनोलेक्स’ आणि मुकुल माधव फाउंडेशनने २०१४पासून जल संवर्धनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. आजवर सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात जवळपास २३ प्रकल्प पूर्ण झाले असून, याचा तीन लाखांहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. याशिवाय, विदर्भ-मराठवाड्यातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या १३० मुलांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, पर्यावरण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठी काम करून गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम करण्याचा प्रयत्न मुकुल माधव फाउंडेशन अविरत करीत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search