Next
दोन्ही प्रमुख निर्देशांक वधारले; खरेदीची संधी
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह खरेदीयोग्य
BOI
Sunday, July 28, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


गेल्या आठवड्यात कंपन्यांचे जून तिमाहीचे आकडे चांगले आल्यामुळे शेअर बाजार आश्वस्त होता; तसेच पुढील दोन आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याच्या अंदाजानेही बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि गेल्या सहा सत्रांमध्ये सुरू असलेली घसरण अखेर या सप्ताहाखेर, शुक्रवारी थांबली. त्यामुळे निवडक शेअर्स खरेदीसाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याबाबत अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
-----
शुक्रवारी बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५१ अंशांनी वधारून, ३७ हजार ८८२ अंकावर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३२ अंकांची वाढ नोंदवत ११ हजार २८४ अंकांवर बंद झाला. वर्षभरात सेन्सेक्स ४० हजार ३१२ पर्यंत चढला होता, तर त्याची किमान पातळी ३३ हजार २९१ पर्यंत खाली आली होती. सध्या तो या दोन्हींच्यामध्ये आहे.

गेल्या गुरुवारी राहुल बजाज समूहाच्या बजाज फिनसर्व्ह, तिचीच पोट कंपनी बजाज फायनान्स आणि बजाज अलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी यांचे आकडे जाहीर झाले. बजाज फायनान्स तीन हजार रुपयांना असताना तो घेण्याचे सुचवले होते. आता तो तीन हजार २६० रुपयांपर्यंत चढला आहे. गेल्या आठवड्यात ज्यानी तो घेतला असेल, त्यांना १०० शेअर्समागे २६ हजार रुपयांचा  नफा झाला असेल. अजूनही तो घेतला, तर सहा महिन्यात तीन हजार ७०० रुपयांचा भाव पहायला मिळेल. 

बजाज फिनसर्व्हचे जून २०१९ तिमाहीचे उत्पन्न १२ हजार २७२ कोटी रुपये होते. नक्त नफा ८४५ कोटी रुपये होता. मार्च २०१९ अखेर संपलेल्या वर्षासाठी एकूण उत्पन्न ४२ हजार ६०६ कोटी रुपये होते व नक्त नफा तीन हजार २१९ कोटी रुपये होता. 

बजाज फायनान्सची जून २०१९ मधील एकूण विक्री पाच हजार ७०८ कोटी रुपयांची होती. जून २०१८ तिमाहीची विक्री तीन हजार ९३८ कोटी रुपयांची होती. नक्त नफा ८५६ कोटी रुपये होता. वर्षभरात नफ्यात ४३ टक्के वाढ दिसते. कंपनीची व्यवस्थापनाखालील जिंदगी एक लाख २८ हजार ८९८ कोटी रुपये होती. गेल्या वर्षी ही जिंदगी ९१ हजार २८७ कोटी रुपये होती. हा सदाबहार शेअर असून, सध्याच्या भावातही घ्यायला हरकत नाही. 

बँक ऑफ बडोदाने या तिमाहीसाठी ७१० कोटी रुपयांचा नफा दाखवला आहे. गेल्या वर्षी या बँकेत दोन बँकांचे विलिनीकरण झाले होते. गेल्या आठवड्यात मारुती सुझुकी, बजाज ऑटो व जे. एस. डब्ल्यू स्टील यांचेही आकडे जाहीर झाले. आगरवाल समूहातील वेदांत कंपनीनेही समाधानकारक आकडे प्रसिद्ध केले आहेत.

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search