Next
दिग्विजयी शिवरुद्राचा अनुपम सोहळा
BOI
Monday, February 19, 2018 | 03:47 PM
15 0 0
Share this article:‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’
या एका आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य, वेगळे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य मुंबईतील साईशा फाउंडेशन गेली सात वर्षे करते आहे. हा कार्यक्रम गीतकार अनिल नलावडे यांनी रचलेल्या ४२ गाण्यांवर आधारित असून, पद्मश्री राव यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. आजच्या शिवजयंतीनिमित्ताने या कार्यक्रमाबद्दल विशेष लेख...
...........
इथेच शांत ‘सूर’ अंगाईचे, आजही गाते माय ‘जिजा’
हलकेच देऊनी झोका बघते, ‘स्वप्न’ उद्याचे पुन्हा पुन्हा
या रे या तुम्ही बाळांनो, सांगेन तुम्हा त्या शूर कथा,
घडवेन असा तुमच्यामधुनि, या राष्ट्राचा ‘शिवबा’ळ नवा

या ओळी आहेत मुंबईतील अनिल नलावडे यांच्या... प्रत्येकासाठीच प्रेरणादायी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांवर नलावडे यांनी तब्बल ४२ गाणी रचली आहेत. त्यांच्या या गाण्यांच्या आधारे साकारण्यात आला, शिवरायांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देणारा एक खास सांगीतिक कार्यक्रम. त्याचे नाव शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव. गेली सात वर्षे हा कार्यक्रम लोकांच्या रोमारोमात स्फूर्ती भरविण्याचे काम करतो आहे.  आजच्या शिवजयंतीनिमित्त या कार्यक्रमाबद्दल अन् तो करणाऱ्या कलाकारांबद्दल जाणून घेऊ या.

छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत अनेक प्रकारच्या साहित्याची रचना करण्यात आली. त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचावे, म्हणून अनेक माध्यमांचा वापर करण्यात आला. मग ते नाटक असो किंवा मालिका, भारूड असो किंवा पोवाडा, वेगवेगळ्या माध्यमांद्वारे अनेक कलाकारांनी शिवाजीराजांचे व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असाच एक चांगला प्रयत्न मुंबईतील साईशा फाउंडेशनद्वारे गेली सात वर्षे अविरतपणे चालू आहे. सुदृढ राष्ट्राची निर्मिती, प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम जागे ठेवणे अन् आजच्या पिढीला प्रेरणा देऊन घडवण्याचे काम करणे या उद्देशाने ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा कार्यक्रम सादर केला जातो. महाराजांचे बहुतांश चरित्र लोकांना माहिती आहे; मात्र या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे पैलू प्रेक्षकांसमोर आणले जातात, की ज्यामुळे महाराजांना नव्याने भेटल्याचा आनंद होतो.

या कार्यक्रमाच्या निर्मितीची कथा अगदी रोचक आहे. गीतकार अनिल नलावडे नेहमीच आपल्या मित्रांसोबत गड-किल्ल्यांचा अभ्यास करत असतात. सह्याद्रीत भटकताना त्यांना स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरील कवितांची रचना केली; पण ते लोकांकडून कशा प्रकारे स्वीकारले जाईल, याचा विचार करत करत त्यांनी ते साहित्य अनेक वर्षे लोकांसमोर आणलेच नाही; पण एकदा त्यांची डायरी पद्मश्री राव यांच्या हाती लागली आणि मग या कार्यक्रमाचा जन्म झाला. अनेक गड-किल्ले सर करताना, महाराजांबद्दलचे साहित्य वाचताना त्यांच्या लक्षात आले, की राजांचे भावनात्मक पैलू लोकांसमोर आलेच नाहीत. फक्त ५० वर्षांच्या आयुष्यात शिवाजीराजांनी किती गोष्टींचा सामना केला असेल? त्यांनी स्वत:च्याच नव्हे, तर आपल्या रयतेच्या भावनांनाही तेवढेच महत्त्व दिले. स्वराज्य निर्मितीसाठी भविष्यात कोणत्या अडीअडचणी येतील आणि त्यावर मात कशी करायची, याचा विचारही त्यांनी आधीच करून ठेवला होता. आणि म्हणूनच ‘मी, माझे घर, माझी माणसे, माझी संपत्ती, माझे सुख एवढ्याच वर्तुळात सतत फिरणारा या देशाचा नागरिक ‘माझे राष्ट्र’ या जाणिवेने केव्हा पेटून उठणार,’ असा प्रश्न अनिल नलावडे यांना सतत बोचत राहिला. त्याच जाणिवेतून उभे राहिले ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हे धगधगते यज्ञकुंड. 
  
कार्यक्रमाबद्दल...
या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्याला वाटलेल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या तरी कशा, या प्रश्नाचे उत्तर ‘मनोरंजनाच्या माध्यमातून’ असे मिळाले. एवढी माध्यमे असताना आपल्या माध्यमाचे वेगळेपण काय, तर प्रेक्षकांच्या मनाला भिडतील अशा गाण्यांच्या कार्यक्रमातून महाराजांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकायचा, असे ठरले. या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे, असे गीतकार, संगीतकार अनिल नलावडे यांनी महाराजांवर तब्बल ४२ गाणी रचली.  एखाद्या चांगल्या कामासाठी आपोआप गोष्टी जुळून येतात, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे, या कार्यक्रमासाठी जवळपास ४० शिवप्रेमी एकत्र आले. शिवरायांवरच्या आजवरच्या प्रचलित गाण्यांचा समावेश न करता अनिल नलावडे यांनी रचलेल्या पूर्णत: नवीन गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला. याचबरोबर निवडक प्रसंगांमध्ये पारंपारिक नृत्य दाखवले जाते. युद्धाशी संबंधित शस्त्रांच्या प्रात्यक्षिकांचाही यामध्ये समावेश केला गेला आहे . ‘हर हर महादेवाला स्मरुनी, उघड्या देहाचे सेनानी, दिव्यत्वाची घेत प्रचीती, झेपून जाती समरी सागरी,’ असे गाण्याचे बोल कानावर पडतात आणि समोर रंगमंचावर युद्धाचे प्रात्यक्षिक दाखवणारे मावळे उभे राहतात, तेव्हा अंगावर शहारे नाही आले तरच नवल. ‘शिवरायांचे आम्ही शिलेदार,’ ‘वीर बहुत देहावर हासत’ अशा अनेक स्फूर्तिदायक गीतांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला आहे. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत पद्मश्री राव आणि अनिल नलावडेओळख कलाकारांची...
अनिल नलावडे यांनी इतिहास या विषयात एमए केले असून, मुंबई आकाशवाणीवर त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. ते सध्या एका खासगी विमान कंपनीमध्ये कार्यरत आहेत. संगीताचे कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नसतानाही त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या या कार्याला साथ मिळाली कार्यक्रमाच्या दिगदर्शिका आणि निवेदिका पद्मश्री राव यांची. पद्मश्री या एक व्हॉइस आर्टिस्ट असून, त्या आवाजाचे प्रशिक्षणही देतात. वयाच्या अवघ्या तीन वर्षांच्या असल्यापासून त्या स्टेजवर काम करत आहेत. याचबरोबर त्यांचा स्वत:चा व्यवसायही आहे. एकूणच सांगायचे तर, स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून आणि स्वतः व्यावसायिक कलाकार नसताना ‘शिवरुद्रा’चे हे शिवधनुष्य या कलाकारांनी समर्थपणे पेलले आहे.  जनजागृती
या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे कामही चांगल्या प्रकारे केले जाते. रस्त्यावर कचरा फेकू नका, स्वच्छता राखा असे सामाजिक संदेशही या कार्यक्रमातून दिले जातात. कारण चांगल्या राष्ट्रनिर्मितीसाठी चांगला नागरिक घडणे गरजेचे आहे. शिवरायांचे अर्थकारण, समाजकारण, राजनीती असे विविध पैलू प्रेक्षकांसमोर येतात. हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचावा, म्हणून साईशा फाउंडेशनने सुरवातीला विनामूल्य प्रयोग केले. समोर किती प्रेक्षक असतील, याचा कधीच विचार केला नाही. अगदी १०पासून पाच हजार प्रेक्षकांपर्यंत या कार्यक्रमाचे सादरीकरण केले गेले. आतापर्यंत या कार्यक्रमाचे जवळपास ३२ प्रयोग झाले आहेत. कार्यक्रमाच्या दर्जामुळे नियमित येणारा प्रेक्षकवर्गही निर्माण झाला.

या कार्यक्रमाच्या २५व्या प्रयोगाचे निवेदन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. विविध ऑडिटोरियम, शाळा, मैदाने, ‘आयआयएम’सारख्या संस्थांमध्ये, तसेच ‘युनेस्को’तर्फे वारसा वास्तू म्हणून जाहीर झालेल्या मुंबईतील रॉयल ऑपेरा हाउसमध्येही या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. अहमदाबादच्या ‘आयआयएम’मध्ये २५०० विद्यार्थ्यांसमोर ‘शिवाजी महाराज - एक प्रशासक’ हा विषय घेऊन कार्यक्रमाचे सादरीकरण केले गेले. २०१४च्या मुंबई महापौर पुरस्काराने या कार्यक्रमाला गौरवण्यात आले आहे. छायाचित्रे आणि व्हिडिओ सौजन्य : साईशा फाउंडेशनसामाजिक भान
या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना सामाजिक भानही ठेवले जाते. साने गुरुजी विद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांचे शिक्षण निधीअभावी थांबले होते. तेव्हा शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना तिकीट घेऊन कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले गेले. या कार्यक्रमातून जो निधी मिळाला, त्यातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात आला. सीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठीही निधी उभारण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले होते. देशप्रेम आणि सामाजिक भान या गोष्टी प्रेक्षकांना सांगताना, साईशा फाउंडेशनने त्या स्वत: आधी अंमलात आणल्या. अशा प्रकारे शिवरायांप्रती निष्ठा ठेवून साईशा फाउंडेशन २०११पासून अविरतपणे कार्य करत आहे. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. अनिल नलावडे यांच्याच पुढील शब्दांमधून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट होतो - 

घरोघरी ते रूप दिसावे, माय जिजाचे अन् शिवबाचे
संस्कारातून चारित्र्याचे, मूर्तिमंत पावित्र्य फुलावे
नको रंजले कुणी गांजले, सर्वमुखी सुखहास्य दिसावे,
वनी भुवनी आनंदाचे, स्वर्गीचे ‘श्री’ राज्य घडावे

संपर्क : 
अनिल नलावडे : ९८१२५ ५६४४८
पद्मश्री राव : ९८२१५ ५४१३० 
ई-मेल : saishafoundation@gmail.com

- गायत्री तेली-पेडणेकर
ई-मेल : gayatri.sateri@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका पद्मश्री राव यांचे या मनोगत आणि कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search