Next
‘माणसं, निसर्ग आणि भूमिका देतात सकारात्मक ऊर्जा’
प्राची गावस्कर
Monday, September 17, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या सकारात्मकतेचा वेध घेणाऱ्या ‘बी पॉझिटिव्ह’ या सदरात आज मुलाखत प्रतिभावान अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची...
..............
तुम्हाला सकारात्मक ऊर्जा कशातून मिळते?
- माझ्या आजूबाजूची माणसं हा माझ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. माझा माणसांमधल्या परस्पर नात्यांवर प्रचंड विश्वास आहे. माझ्या आसपास जी माणसं होती, ती अत्यंत विचारी, संघर्ष करणारी, प्रामाणिक होती. त्यांचे विचार, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, समाजाशी असलेले संबंध यांचा माझ्यावर प्रभाव पडला. माझे आजोबा कोकणातून येऊन मराठवाड्यात, औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. माझी आई धारवाडची. ती लग्नानंतर मराठवाड्यात रुळली. माझे आजोबा लोकप्रिय शिक्षक होते. आमचे घराणे विचारवंत म्हणून ख्यातनाम होते. भ्रष्टाचार, अन्याय यांविरुद्ध लढण्याचे त्यांचे परखड विचार, संघर्ष करण्याची वृत्ती या सगळ्याचे संस्कार माझ्यावर झाले. या सगळ्या माणसांकडून मला आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. अशा माणसांमुळेच मला कायम सकारात्मक ऊर्जा मिळते. 

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? 
- मी अभिनय क्षेत्रात आले ती अपघातानेच. मला खरं तर शिक्षक व्हायचं होतं. त्यामुळे मी दहावीनंतर शिक्षणासाठी पुण्यात एस. पी. कॉलेजमध्ये आले. हॉस्टेलवर राहत होते. वाचन, साहित्य यांची आवड होती, बोलायची हातोटी होती. फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी चाचणी सुरू होती, त्यामुळे तिकडे गेले. निवडही झाली. नाटक झालं आणि मुख्य भूमिकेसाठी मला माई भिडे पुरस्कार मिळाला. एस. पी. कॉलेजला तब्बल नऊ वर्षांनी पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे खूप कौतुक झालं. ही ख्याती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या कानावरही गेली होती. त्यांनी एका व्यावसायिक नाटकासाठी विचारलं. त्या भूमिकेचं समीक्षकांकडूनही कौतुक झालं. एकूणच अभिनय जमतोय आणि आपल्याला हे काम करायला आवडतंय हे लक्षात आलं आणि मी याच क्षेत्रात काम सुरू ठेवलं. मराठवाड्यात एखादंच नाटक बघायला मिळायचं. तिथे उकाड्यात, कमी सोयी-सुविधांमध्येही कलाकार आपलं काम चोख करायचे. त्याच नाटकाचा प्रयोग मी मुंबईत वातानुकुलित किंवा मोठ्या थिएटरला बघितला, त्या वेळी तिथेही तितक्याच चोखपणे हे कलाकार काम करताना पाहिले. यात मी नाव घेईन भक्तीताईचं (भक्ती बर्वे). जीव ओतून काम करणं म्हणजे काय ते तिच्याकडून शिकावं. लालन सारंग यांची एक मुलाखत मी ऐकली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या, ‘अभिनय ही माझी आवड आहे. तसंच तो माझा पोटापाण्याचाही व्यवसाय आहे. त्यामुळे मी कसलीही तडजोड करत नाही. शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करते. व्यवसाय करताना छंद म्हणून स्वैरपणे काम करू नये.’ या सगळ्याचा माझ्यावर प्रभाव पडला. या कलाकारांबद्दल प्रचंड आदर होता. त्यामुळे अभिनय क्षेत्रात राहण्यासाठी आपोआपच तयारी होत गेली आणि मी याच क्षेत्रात पुढे जात राहिले. 

तुमच्या आयुष्यात कधी निराशेचे प्रसंग आले आहेत का? आले असतील, तर त्यांचा सामना कसा केलात?
- मी अभिनय क्षेत्रात आपोआपच आले. नंतर लग्न झालं, ते याच क्षेत्रातला सहकलाकार सुमित राघवनशी. माझी कौटुंबिक स्थिती चांगली होती. सुमित मध्यमवर्गीय, वेगळ्या वातावरणातून आलेला होता. आमचं लग्न झालं तेव्हा सुमित काम करत होता आणि मी फार काम करत नव्हते. आम्ही आमच्या घरच्यांकडून कोणतीही आर्थिक मदत घ्यायची नाही, असं ठरवलं होतं. त्यामुळे मी गर्भवती राहिले, तेव्हा आमच्याकडे साठलेल्या थोड्याफार पुंजीचाच आधार आमच्याकडे होता. तेव्हा मी एक गुजराती नाटक करत होते. मराठी नाटकाच्या तुलनेत गुजराती रंगभूमीवर चांगले पैसे मिळतात. त्यामुळे मला चांगले पैसे मिळत होते. मी महिन्याला २६-२७ दिवस काम करत होते; पण गरोदरपणामुळे मी पाच महिनेच काम करू शकणार होते. त्यामुळे बाळंतपणापर्यंत आमच्याजवळची शिल्लक पुंजी संपत आली होती. त्यातच माझ्या मुलाला ‘लॅक्टोज इन्टॉलरन्स’ असल्याने, त्याला माझं दूध पचायचं नाही. त्यामुळे त्याला लॅक्टोजेन पावडरचं दूध द्यावं लागायचं. ते डबेच्या डबे फस्त व्हायचे, त्या वेळी हा खर्च कसा करायचा हा प्रश्न मला सतावायचा. कारण फार पैसे उरले नव्हते आणि सुमित एक मराठी नाटक करत होता. त्यामुळे त्याची कमाई फार मोठी नव्हती. मी तडजोडी करू शकत नाही; पण समन्वय कसा साधायचा हे मला जमतं. अशा वेळी मी मुलाला गाईचं दूध पाणी मिसळून द्यायचे. मी आईकडे होते. त्यामुळे आई मला म्हणायची, ‘आम्ही आहोत ना मदतीला? मग असं कशाला करतेस?’ मी म्हणायचे, ‘गरीब, पाड्यावरची मुलं असं दूध पितात ना? मग याला का नाही पचणार?’ मला विश्वास होता की, ही तात्पुरती स्थिती आहे. सुमित हा चांगला कलाकार आहे. तो नक्की पुढे जाणार याची खात्री होती. तसंच झालं. नीरज, माझा मुलगा तीन महिन्यांचा झाला आणि सुमितला पहिली मालिका मिळाली. सतरा वर्षांनंतर पहिली जाहिरात मिळाली आणि मग आम्ही मागे वळून पाहिलंच नाही. अर्थात त्या वेळच्या परिस्थितीत खचून न जाता, निराश न होता मी काय मार्ग काढता येतील याचा विचार केला. त्यामुळे त्या परिस्थितीतून आम्ही व्यवस्थित बाहेर पडलो. मी सुरुवातीला म्हटलं तसं, आजूबाजूला असणारी, भेटणारी माणसं खूप काही शिकवून जातात. पुस्तकातूनही माणसं भेटतात. माझी आई मानसोपचारतज्ज्ञ आहे. मला आठवतं, एकदा आमच्या जवळच्या नात्यातला अगदी कमी वयाचा मुलगा गेला. त्याच्या आईला खूप मोठा धक्का बसला. ती रडली, नंतर ती बाथरूममध्ये गेली आणि आंघोळ करताना ती गाणं म्हणत असल्याचा आवाज येत होता. मला आश्चर्य वाटलं, की थोड्या वेळापूर्वी ही रडत होती, आता गात आहे. तिला विचारलं, तर ती म्हणाली, ‘ही दु:ख पचवायची पद्धत आहे. दु;ख, धक्का पचवण्यासाठी गाणं तिच्या मदतीला येतं.’ तसं मला निराश वाटलं, की कविता आठवतात. निसर्गातले रंग आठवतात. रस्त्याच्या कडेला उन्हात उमलणारं चिमुकलं फूल आठवतं. मला असं वाटतं, राग, निराशा, आनंद या सगळ्या भावना आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहेत. अशा सगळ्या भाव-भावनांच्या डोळ्यांत डोळे घालून बघता आलं पाहिजे. तुम्हाला राग आला, तर त्यात विषाद वाटण्याचं कारण नाही. सारखी चिडचिड होणं चांगलं नाही; पण राग आला तर काही वावगं नाही. आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा राग येत नसेल, तर तुमच्यात दोष आहे, असं मला वाटतं. हरल्यासारखं वाटत असेल, तर त्याचा संकोच वाटून घेऊ नये. या सगळ्या भावना आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. मला राग आला, निराश वाटलं, तर मी तसं वाटू देते. लहान असताना माझी मुलंही रड रड करत असली, तर मी त्यांना रडू द्यायचे. त्यांनी चिडचिड केली, तर करू देत असे. या सगळ्या भावभावना त्याज्य नाहीत. त्यांचं ओझं वाटू देऊ नये, असं माझं मत असल्यानं मी या सगळ्या भावभावनांचा सकारात्मक पद्धतीनं निचरा होऊ देते. 

मी फार महत्त्वाकांक्षी नाही. मला वाटतं, यासाठी आपल्यावर झालेले संस्कार महत्त्वाचे ठरतात. आमच्या घरी ‘तू काय करणार आहेस? काय कमावणार आहेस?’ या प्रश्नांचं दडपण कधीच नव्हते. चांगला नागरिक, चांगला माणूस असणं महत्त्वाचं आहे, हेच मनावर बिंबलं होतं. त्यामुळे एखादी गोष्ट करता आली नाही, तरी ती करण्यासाठी आपल्याकडे अजून वेळ आहे, अशी समजूत घालण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. अर्थात, आता वयाच्या या टप्प्यावर हे शहाणपण अधिक आलं आहे, असं वाटतं; पण मी जेव्हा अरुणा शानभागच्या जीवनावरील ‘कथा अरुणाची’ हे अत्यंत संवेदनशील नाटक करत होते, तेव्हा नाटकाच्या एका प्रयोगात मी कॉटवरून पडले आणि मणक्याला गंभीर इजा झाली. डॉक्टरांनी सांगितलं, ‘आराम न करता काम केलं, तर दोन-तीन महिने अंथरुणाला खिळून राहावं लागेल;’ पण त्या नाटकामुळे तरुण वर्गात खूप जागरूकता निर्माण होत होती आणि विनय आपटे माझ्याशिवाय प्रयोग करायला तयार नव्हते. त्यामुळे मी काही प्रयोग व्होवेरोनची इंजेक्शनं घेऊन केले. मला पारितोषिक मिळालं. नाटकाला बक्षीस मिळालं; पण त्यानंतर मला दोन महिने अंथरुणाला खिळून राहावं लागणार होतं. त्या विचारानं मला हताश वाटायचं; रडायला यायचं; पण मी सामाजिक जाणिवेनं ते काम केलं होतं, त्याचं समाधान खूप होतं. त्या भूमिकेनं मला खूप काही शिकवलं. आपल्यापुरता विचार न करता, थोडा व्यापक दृष्टिकोन ठेवला तर निराशा, हताशा दूर ठेवणं शक्य होतं. 

सकारात्मक दृष्टिकोन घडवण्यात तुमच्या कार्यक्षेत्राचं योगदान किती?
- ‘कथा अरुणाची,’ ‘सखाराम बाइंडर’ या नाटकांतल्या भूमिकांनी मला खूप प्रेरणा दिली. अरुणाची भूमिका करताना त्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर लोळागोळा पडलेली असतानादेखील एक पुरुष तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो, हा प्रसंग करताना खूप हताश वाटायचं. त्यातच पुढचा प्रसंग असा होता, की अरुणाची देखभाल करण्यासाठी सगळ्या नर्सेस पुढे आल्या. आशियातील पहिला संप या अशा कारणासाठी झाला होता. इतकं काळंकभिन्न चित्र असताना ही एक घटना फार मोठी प्रेरणा देणारी होती. नाटक करताना अशा कथा, प्रसंग, यातून खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. ‘सखाराम बाइंडर’मधली चंपा करताना, त्यातली वेगळ्या प्रकारची हिंसा दाखवताना आम्ही तेंडुलकरांना म्हणालो, की चंपाचं मन किती मोठं आहे. ते म्हणाले होते, की तिची समजूत मोठी आहे. अनुभवातून आलेली अशी समजूत या भूमिकेनं दर्शवली. अशा भूमिकांमधून मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. 

तुमची आवडती भूमिका कोणती?
- खरं तर, मी फार महत्त्वाकांक्षी नाही. त्याच वेळी मी पूर्ण समाधानीही नसते. मी हातचे राखून कधीच काही करत नाही. ‘कथा अरुणाची’मधली अरुणा, ‘लेकुरे उदंड जाहली’मधली मधुराणी मला खूप आवडते. ‘लेकुरे’मध्ये मला गाणं म्हणणं आवश्यक होतं. मला संगीत आवडतं; पण या नाटकाच्या निमित्तानं गाणं थोडं-फार शिकले. सुमित गाणं चांगलं गातो. तो या नाटकात सहकलाकार होता. तो प्रयोगात गाणं म्हणायचा; पण मी माझं गाणं रेकोर्डेड लावत असे आणि ओठांच्या हालचाली करत असे. हे नाटक पाहायला एकदा ज्येष्ठ संगीतकार/ हार्मोनियमवादक अप्पा वढावकर आले होते. ते म्हणाले, ‘चिन्मयी, नाटकात तू रेकॉर्डेड गाण्यावर अभिनय करतेस हे योग्य नाही. ही प्रेक्षकांची फसवणूक आहे. तू स्टुडिओत गायलं आहेस, तर स्टेजवर गायला काय हरकत आहे?’ त्यांनी असं म्हटल्यानंतर मी ते आव्हान स्वीकारलं आणि स्टेजवर स्वतः गाणं गायला सुरुवात केली. त्यामुळे ‘लेकुरे..’तील माझी ही भूमिका मला जवळची आहे. अलीकडेच मी ‘मुरांबा’ हा चित्रपट केला. त्यातली भूमिकाही आवडते. मी जुन्याच गोष्टींमध्ये फार अडकून बसणारी नाही. त्यामुळे मला माझं नवीन कामही आवडतं. 

तुमच्या आणखी काही कला, कौशल्यांबद्दल सांगा...
- मला शिक्षक व्हायला आवडलं असतं. तशी संधी मी अजूनही घेत असते. दियाच्या शाळेत मी काही काळ अभिनयकौशल्य शिकवत होते. तसं अधूनमधून वेगवेगळे धडे मी शिकवत असते. 

तुमची प्रेरणास्थानं कोणती आहेत?
- प्रेरणा मला अनेक गोष्टींमधून मिळते. भक्ती बर्वे, लालन सारंग ही तर माझी प्रेरणास्थानं आहेतच; पण मला अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रेरणा मिळते. सतत ती बदलत असतात. मला एका स्पॉटबॉयने सांगितलं होतं, की तुमचा क्लोज-अप असतो, तेव्हा डोळ्यांत थोडं पाणी असलं ना, तर तुम्ही खूप छान दिसता. त्याची कामातली ती आत्मीयता मला प्रेरणादायी वाटते. अशी माझी अनेक प्रेरणास्थानं आहेत. 

कला क्षेत्र आणि आयुष्य यांच्या नात्याबद्दल काय सांगाल?
- माझ्या कामातून मला समाधान मिळतं. माझं कुटुंब समाधानी असतं, तेव्हा तुम्ही समाजाला काही तरी देता. माझ्या मुलांना आम्ही नेमकं काय काम करतो याची नेहमी ओळख करून दिली. नुसतं ग्लॅमर नाही, तर त्यामागचे कष्टही त्यांच्या नजरेला आणून दिले. मुलांना स्टेजवर खिळा मारण्यापासून काम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती दिली. त्यांना जाणीवपूर्वक साध्या मराठी शाळेत घातलं. आमच्या कार्यक्षेत्रामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीचा, आम्हाला मिळत असलेल्या महत्त्वाचा फायदा इतरांनाही व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सुमितचा ‘संदूक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा आम्ही मुलांच्या शाळेत गेलो होतो. त्यांनी सुमितची मुलाखत घेतली आणि प्रत्येक मुलाने सुमितला पोस्टकार्डवर पत्र लिहिले होते. मी मुलांना मराठी शाळेत घालण्याबद्दल बोलले होते, तो व्हिडिओ मध्यंतरी खूप व्हायरल झाला होता. अनेक पालकांनी मला फोन करून, भेटून चर्चा केली. अनेकांनी इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून काढून मुलांना मराठी शाळेत घातलं. अनेकांनी मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. आमच्या कार्यक्षेत्रामुळेच हे शक्य झालं. त्यामुळे आमच्या आयुष्यात कार्यक्षेत्राचं योगदान अमूल्य आहेच. ते आमच्या आयुष्याचं अविभाज्य अंग आहे. 

आगामी नियोजन काय आहे?
- नियोजन असं नाही. कारण मी आता अभिनय क्षेत्रात खूप वेळ घेणारं काम करत नाही. अनेकदा सांगितलेल्या कल्पनेपेक्षा संहिता खूप वेगळी येते. मला माझ्या निवडीप्रमाणे काम करायचं, तर ते आर्थिकदृष्ट्या फार लाभदायी नाही. त्यामुळे मी अगदी सातत्यानं काम करत नाही. माझा वेळ मी सामाजिक कामांसाठी देते. शाळेत शिकवणं, मराठी पालक संघाचं काम यांसाठी मी वेळ देते. 

(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर दर सोमवारी प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध असतील. चिन्मयी सुमित यांच्या मुलाखतीचा व्हिडिओही सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anagha pabalkar About
Inspiring interview
0
0
Madhuri Kulkarni About
You Awesome Chinmaiee
0
0

Select Language
Share Link
 
Search