Next
संस्कृतीतील निरुपयोगी गोष्टी सोडून टिकाऊ गोष्टींशी नाळ जोडावी
नियोजित साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, December 27, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आपल्याकडे परंपरा आणि नवता यांचा संघर्ष कायमच होत आला आहे. काळानुरूप काही गोष्टी मागे टाकाव्याच लागतात. संस्कृती जशी टिकाऊ आहे, तशीच टाकाऊही आहे. त्यामुळे जे निरुपयोगी आहे, ते टाकावे लागते आणि जे टिकाऊ आहे, त्याच्याशी नाळ जोडत पुढे जावे लागते. आपल्याकडील जाणते विचारवंत वेळोवेळी हे करत आले आहेत,’ अशा शब्दांत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. 

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि डायमंड पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसांचे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप २६ डिसेंबर २०१८ रोजी झाला. त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ या वेळी अरुणाताईंचा भांडारकर संस्थेच्या वतीने सत्कारही करण्यात आला. या वेळी संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुळकर, संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, माधव भांडारी, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष पटवर्धन आणि डायमंड पब्लिकेशन्सचे पाष्टे उपस्थित होते.  

डॉ. अरुणाताई ढेरे‘भांडारकर संस्थेने अन्य विषयही पुढे आणावेत’
‘भांडारकर संस्थाही आता डिजिटायजेशनच्या युगात प्रवेश करत असल्याचा आनंदच होत आहे. येत्या काळात कित्येक तरुण या संशोधनाच्या क्षेत्रात काम करून पुढे येताना दिसतील. हे चित्र खूप आशादायी आहे. केवळ संस्कृत, प्राकृत आणि प्राच्यविद्या याच विषयांना घेऊन न चालता इतर सर्व विषय संस्थेने संशोधन स्वरूपात पुढे आणावेत, असे वाटते,’ असे अरुणाताई म्हणाल्या.

‘आपण ज्यांचा वारसा सांगतो त्यांनी काय काम करून ठेवले आहे, हे न जाणताच आपण आज पुढे जात आहोत,’ असे भाष्यही अरुणाताईंनी केले. ‘ज्ञानेश्वर, तुकाराम हे मला ७०० वर्षांपूर्वीचे वाटत नाहीत. कारण त्यांनी लिहिलेल्या कविता आजही आपल्या आयुष्याला लागू होतात,’ असे त्या म्हणाल्या. ‘आपल्याकडे विद्रोहाचीही एक परंपरा आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. 
 
‘जबाबदारी म्हणून पद स्वीकारले’
‘साहित्य हे समाजाला काहीतरी देऊ करणारे माध्यम आहे. त्या माध्यमाची, साहित्यकारांची प्रतिष्ठा वाढावी यासाठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मी जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे; मान-सन्मान म्हणून नव्हे,’ अशी भूमिका अरुणाताईंनी विशद केली.  

‘भांडारकर’मधील दुर्मीळ पुस्तके डिजिटल
भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी डिजिटल लायब्ररी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सी-डॅक’ संस्थेच्या सहयोगाने ‘बोरीलिब डॉट कॉम’ (borilib.com) हे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘डिजिटालय’ नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये संस्थेतील दुर्मीळ पुस्तके डिजिटल स्वरूपात साठवली जात आहेत. त्यातून कोणत्याही व्यक्तीला ही पुस्तके शोधणे, त्यातील माहिती घेणे शक्य होणार आहे. ‘सी-डॅक’चे अधिकारी दिनेश कात्रे यांनी या वेळी प्रात्यक्षिकासहित संकेतस्थळासंबंधीची संपूर्ण माहिती दिली. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या या संकेतस्थळाला केवळ पाच ते सहा दिवसांमध्ये तब्बल १८ लाख पेज हिट्स मिळाल्याची माहिती कात्रे यांनी दिली. 

‘लोकांकडील ग्रंथ मिळवूनही डिजिटायझेशन करावे’
‘भांडारकर संस्थेचा ई-लायब्ररीचा उपक्रम पाहता, संस्थेने कात टाकण्यास सुरुवात केली आहे, असे वाटते. आपल्याकडील ज्ञान इतरांना न देण्याच्या वृत्तीमुळे आपल्या लोकांनी लिहिलेले लाखो ग्रंथ काळाच्या ओघात लुप्त झाले. ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. असे पूर्वजांनी लिहिलेले ग्रंथ आजही कित्येकांच्या घरात सापडतात. असे ग्रंथ ‘भांडारकर’सारख्या संस्थेने घेऊन त्यांचे डिजिटायजेशन करून ते जतन करावेत,’ असे आवाहन माधव भांडारी यांनी व्यक्त केले.   

‘‘ई-लायब्ररी’ ही संस्थेच्या कायापालटाची सुरुवात’
‘भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे. ई-लायब्ररी ही त्याची सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. संस्थेचे प्राच्यविद्येच्या संदर्भातील जे मूळ कार्य आहे, त्यात अनेक नवीन माणसे जोडली जावीत, असाही प्रयत्न आहे. संशोधकांनी पदवी आणि इतर शिक्षणापेक्षा संशोधनासाठी अधिक वेळ दिला पाहिजे,’ असे मत संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. 

‘संग्रहालय सुरू करण्याचा मानस’
‘गेले दहा दिवस सुरू असलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. संस्थेत होणाऱ्या संशोधनाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी येत्या काळात संस्थेत एक संग्रहालय बनवण्याचा मानस आहे. नवीन शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रम सुरू करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. त्यावर काम सुरू आहे. संस्थेत होणाऱ्या सुधारणा पाहून समाजातील काही घटक मदतीसाठी पुढे येत आहेत, याचा आनंद आहे,’ असे प्रतिपादन संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष उद्योगपती अभय फिरोदिया यांनी अध्यक्षीय भाषणात केले. 

भांडारकर संस्थेचे डॉ. श्रीनंद बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष पटवर्धन यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 89 Days ago
There are practical difficulties . Habits die hard . It takes time to realise that something has become out-of- date. There are vested interests which are opposed to changes .
0
0

Select Language
Share Link
 
Search