Next
‘भारतीय व्यवस्थापनशास्त्रातून प्रगती साधावी’
प्रेस रिलीज
Thursday, April 26, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this story

‘ग्लिम्प्सेस ऑफ इंडियन मॅनेजमेंट- अ होलिस्टिक अप्रोच’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.

पुणे :
‘आपल्याकडील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन शिकविताना आपण शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन, चाणक्यचे व्यवस्थापन, बुद्धाची मूल्ये, रामदास स्वामी यांचा दासबोध शिकविले पाहिजे. त्याकाळी औद्योगिक क्रांती झाली नव्हती, तरी ही या थोर लोकांनी जे काम केले ते अजोड आहे,’ असे मत प्रख्यात व्यवस्थापनाचे गुरू डॉ. पी. सी. शेजवलकर यांनी मांडले.

विश्‍व शांती केंद्र (आळंदी) आणि पुणे येथील माईर्स एमआयटी, आणि हिमालया पब्लिशिंग हाऊस यांच्यातर्फे प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ इंडियन मॅनेजमेंट- अ होलिस्टिक अप्रोच’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, लेखक प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी व मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.

प्रा. डॉ. कुलकर्णी यांचे हे चौथे पुस्तक असून, आपल्या चार तपांचा म्हणजे जवळपास पन्नास वर्षांचा अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकात मांडलेले विचार हे डॉ. कुलकर्णी यांचे स्वतःचे विचार असून, आपल्याला आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडणारे आहेत.

डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘आज भारतात कुठेही व्यवस्थापन शिकले, तरी हे भारतीय व्यवस्थापन मुलांना शिकविले जात नाही. धर्म, काम, अर्थ, मोक्ष यांना आधार ठेऊन आपल्या संपूर्ण आयुष्याचे व्यवस्थापन आपण केले पाहिजे हा जीवनाचा उद्देश्य असला पाहिजे, हेच भारतीय व्यवस्थापन मूल्ये सांगतात. भारतीय व्यवस्थापनात एक माणूस म्हणून आपला नैतिक विकास कसा व्हायला हवा यावर भर दिला जातो. निष्ठा, प्रामाणिकपणा ही मूल्ये आजच्या पिढीतील मुलांमध्ये रुजवायला हवीत.’

‘भारतीय व्यवस्थेतील कुटुंब पद्धती हा आपला मूलाधार आहे. यामुळे आपण मुलांना त्याग शिकवितो पण परदेशात असे चित्र नाही. भारतीय गृहिणी कशाप्रकारे घर चालवितात यासारखे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण मुलांपुढे आपल्याला ठेवता येणार नाही. कमी संसाधनांमध्ये देखील भारतीय माता ज्याप्रकारे घराचे उत्तम व्यवस्थापन करतात यातूनही बरेच शिकण्यासारखे आहे. भारतीय व्यवस्थापन हे अध्यात्माला केंद्रित ठेऊन असलें पाहिजे गरजूंची मदत करणारे असले पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले.

भारतीय व्यवस्थापनातील त्रुटी सांगताना डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘दुसर्‍याकडून काम करून घेणे हे एक कौशल्य आहे. आचारसंहिता, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन यांची कमी आपल्या येथील व्यवस्थापनात आढळते; तसेच ब्लॅक मार्केटिंग, नफ्यासाठी चुकीचे उत्पादन विकणे, कर्मचार्‍यांना पगार कमी देणे अशा अनेक वाईट प्रवृत्ती आपल्याकडील उद्योग जगतात आढळतात. वैचारिक भ्रष्टाचाराचे प्रमाण आपल्याकडे वाढत चालले आहे याला आळा बसायला हवा. याचे समीक्षण झाले पाहिजे. याचबरोबर आपल्या येथील कार्यसंस्कृती सुधारण्याची गरज आहे. या इंडियन मिसमॅनेजमेंटबद्दल देखील भाष्य करणारे लिखाण व्हायला हवे.’

डॉ. कुलकर्णी  म्हणाले, ‘डॉ. पी. सी. शेजवलकर हे माझे गुरू आहेत आणि त्यांची माझ्या या पुस्तक प्रकाशनाला उपस्थिती लाभणे हे माझ्यासाठी भाग्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो. हे २१ वे शतक हे आपल्या भारत देशाचे शतक आहे आणि हे पुस्तक या काळाला सुसंगत असे आहे. त्यामुळे व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असेच हे पुस्तक आहे.’

‘तंत्रज्ञानाच्या आणि आर्थिक प्रगतीमुळे आपल्याला नेहमीच पाश्‍चिमात्य गोष्टींचे आकर्षण वाटत राहिले आहे; पण जग आपल्याकडील चांगल्या गोष्टी स्वीकारते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते आणि आपण त्यास महत्त्व देऊ लागतो. पाश्‍चिमात्य देशांतील व्यवस्थापन हे समस्यांवर आधारित आहे. जपानमधील व्यवस्थापन हे समाधानावर आधारित आहे; पण भारतातील व्यवस्थापन हे तृप्तीवर आधारित आहे, मात्र आपणच भारतीय व्यवस्थापनाबद्दल आपल्याकडील विद्यार्थ्यांना शिकवत नाही. असे न करता आपण भारतीय व्यवस्थापनाबद्दल जागरूकता मुलांमध्ये निर्माण करायला हवी.’

डॉ. भटकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती आजही टिकू शकली आहे याचे कारणच भारताचे व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान हे आहे. युवकांना या भारतीय व्यवस्थपनाबद्दल आपण जागरूक करणे आवश्यक आहे. पाश्‍चिमात्यांचे अनुकरण करताना आपण आपल्याकडील मूल्यांना विसरतो. तंत्रज्ञानाच्या या २१व्या शतकात रामराज्य आणायचे असेल तर मानवी व्यवस्थापन खूप आवश्यक ठरते. आयुष्य कसे मॅनेज करायचे हेच खरेतर व्यवस्थापनाचे उद्दिष्ट असते. भारतीय संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालणारे व्यवस्थापन या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कळू शकेल.’

डॉ. कराड म्हणाले, ‘भारताची अस्मिता तरुणांमध्ये जागी करण्यासाठी अशा पुस्तकांची गरज आहे. कारण आपल्याला भारतीय संस्कृती आणि मूल्यांचाच विसर पडत चालला आहे. आपल्याला श्री रामदास स्वामी यांच्या दासबोधाचे खरे स्वरूप जाणून घ्यायला हवे. व्यवस्थापनशास्त्र शिकविणारा त्यासारखा दुसरा ग्रंथ नाही. याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करून हा ग्रंथ जगासमोर आणला पाहिजे.’

डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अपर्णा दीक्षित यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link