Next
‘Once मोअर’मध्ये ही अभिनेत्री दिसणार आजोबांच्या रूपात
आजोबांचे पुरुषी रुप साकारण्यासाठी मेकअपला लागायचे पाच तास
BOI
Thursday, June 27, 2019 | 06:42 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : एक ऑगस्टला प्रदर्शित होत असलेला दिग्दर्शक नरेश बीडकर यांचा आगामी ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे, तो त्यामध्ये एका अभिनेत्रीने साकारलेल्या आजोबांच्या भूमिकेसाठी. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या पोस्टरमध्ये आजोबांच्या वेशात दिसत आहेत. 

चित्रपटातील एका विचित्र पात्रासाठी एका अभिनेत्रीला पुरुष साकारायचा होता आणि त्यातही ती एका आजोबांची भूमिका होती. ‘Once मोअर’ चित्रपटासाठी असलेल्या या आव्हानाला खरी उतरेल अशा अभिनेत्रीचा विचार सुरू असतानाच चित्रपटाच्या टीमच्या वतीने एकत्रितपणे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे नाव समोर आले आणि रोहिणी ताईंना या भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचे या टीमच्या वतीने सांगण्यात आले. 

चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, ‘पती-पत्नीमधील पूर्वजन्मीचे वैर दाखवणारी चित्रपटाची कथा आहे. याच चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाच वेळी स्त्री आणि पुरुष या दोन्ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कलाकाराची गरज होती, अशा वेळी टीमच्या वतीने एकमताने रोहिणी ताईंचे नाव सुचवले गेले. त्यानुसार ताईंना विचारण्यात आले. भूमिकेसाठीची आवश्यकता त्यांना समजावून सांगण्यात आली. तेव्हा या भूमिकेचे वेगळेपण आणि त्यातील आव्हान लक्षात घेऊन रोहिणी हट्टंगडी यांनी ही भूमिका करण्यास होकार दिला. हे एक विचित्र पात्र होते. त्यासाठी मेकअप केल्यानंतर माझाही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ताई पूर्णपणे आजोबांचे पुरुषी रूप धारण केल्यासारख्या दिसत होत्या.’ 


चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसत असलेल्या रोहिणी हट्टंगडी यांच्या या वेषावरून त्यांनी आणि मेकअप करणाऱ्यांनी यासाठी किती मेहनत घेतली आहे, हे लक्षात येते. बॉलीवूडचे प्रसिद्ध मेकअप कलाकार रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी या हा रोहिणीताईंचा मेकअप केला आहे. चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी पाच तास या मेकअपला सुरुवात करावी लागत असे आणि चित्रिकरण झाल्यानंतर हा मेकअप उतरवण्यासाठी तब्बल दोन तास लागत असत, असे या मेकअप आर्टिस्टनी सांगितले. विशेष बाब म्हणजे मेकअप, चित्रिकरण आणि मेकअप उतरवणे या सगळ्या प्रक्रियेदरम्यान रोहिणी हट्टंगडी या काहीही खाऊ शकत नव्हत्या. 

या आगळ्यावेगळ्या भूमिकेबाबत रोहिणी हट्टंगडीही भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘‘Once मोअर’ चित्रपटात साकारलेली ही भूमिका आजवरच्या माझ्या करीअरमधली सर्वांत निराळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. आव्हान स्वीकारायला मला नेहमीच आवडतं. त्यामुळे या भूमिकेसाठीची प्रत्येक प्रक्रिया मी खूप आनंदाने घेतली. मेकअप, चित्रिकरण, भूमिकेचा अभ्यास या गोष्टी करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांना माझी ही भूमिका नक्कीच आवडेल.’ 

दरम्यान या भूमिकेत रोहिणीताईंना केवळ संवाद बोलून अभिनय करायचा नव्हता, तर त्यासोबत बरेचसे अॅक्शन सीन्सही होते. धावणे, उड्या मारणे अशा कितीतरी आव्हानात्मक गोष्टी या मेकअपमध्ये आणि वेषभूषेत करायच्या होत्या. त्यामुळे ही भूमिका करणे हे खरोखर आव्हानात्मक होते, असे दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी सांगितले.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search