Next
‘संगीत गुरू पुरस्कारा’चे वितरण
प्रेस रिलीज
Monday, April 02, 2018 | 12:49 PM
15 0 0
Share this storyपुणे : ख्यातनाम शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेल्या ‘गणपत विघ्नहर गजानन’ या बंदिशीला कर्नाटकी संगीतातील प्रख्यात गायिका गायत्री व्यंकटराघवन यांनी गायलेल्या ‘वातापि गणपतीं भजेहं’ या सुप्रसिद्ध रचनेची साथ मिळाली आणि संपूर्ण वातावरण हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतातील माधुर्याने भरून गेले. निमित्त होते कन्नड संघ व कलमाडी परिवारातर्फे आयोजित संगीत गुरू पुरस्कार सोहळ्याचे.

कन्नड संघाचे संस्थापक डॉ. शामराव कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने संस्थेतर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील पहिल्या कार्यक्रमात ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान, प्रख्यात गायिका आरती अंकलीकर- टिकेकर आणि रजनी पच्छापूर यांना ‘संगीत गुरू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. शामराव कलमाडी यांचे पुत्र सुरेश कलमाडी यांच्या हस्ते उस्ताद उस्मान खान यांना, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे यांच्या हस्ते रजनी पच्छापूर यांना, तर मीरा कलमाडी यांच्या हस्ते आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘संगीत गुरू पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या वेळी संस्थेच्या सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्ष इंदिरा सालियन, डॉ. शामराव कलमाडी यांचे पुत्र मुकेश कलमाडी, रागिणी कलमाडी, आरती कलमाडी, नारायण हेगडे, राधिका शर्मा, कन्नड संघाचे सदस्य व कलमाडी परिवार उपस्थित होते.

‘अशा पुरस्कारांमुळे उत्साह वाढतो आणि आपण जे करत आहोत ते आणखी उमेदीने करावेसे वाटते’, अशा भावना उस्ताद उस्मान खान यांनी व्यक्त केल्या. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी शिष्यांमुळेच मी गुरू होऊ शकल्याने हा सन्मान माझ्या शिष्यांमुळेच मिळाल्याचे नमूद केले. रजनी पच्छापूर यांनी कन्नड संघाबरोबर जोडले गेलेल्या तीस वर्षांचे ऋणानुबंध मनोगतातून उलगडले.

कार्यक्रमानंतर आरती अंकलीकर-टिकेकर आणि गायत्री व्यंकटराघवन यांच्या सांगीतिक जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी राग भीमपलासी आणि कर्नाटकी संगीतातील राग अभेरी यातील आलाप, पल्लवी आणि नोमतोम असे बहारदार सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘मोरे कान्हा जो आए पलटके’, ‘अवघा रंग एक झाला’ या आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेल्या रचनांसह व्यंकटराघवन यांनी गायलेल्या कर्नाटकी रचनांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

राजेश श्रीनिवासन (मृदंगम), चारुलता रामानुजन (व्हायोलीन), विभव खांडोळकर (तबला), तन्मय देवचके (हार्मोनियम), सुजित लोहोर (पखावज), अनिल भुजबळ (विविध तालवाद्ये), स्वरूपा बर्वे, अबोली गद्रे (तानपुरा व गायनसाथ) यांनी त्यांना साथसंगत केली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link