Next
हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे संस्थापक स्वामी सत्यमित्रानंद गिरी
BOI
Sunday, July 14, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

मानवता धर्माच्या प्रसारासाठी, आध्यात्मिक ज्ञान समाजात रुजवण्यासाठी आपले सर्व जीवन ज्यांनी व्यतीत केले त्या स्वामी सत्यमित्रानंदजींचे नुकतेच, २५ जून २०१९ रोजी दीर्घ आजारानंतर निधन झाले. हरिद्वारमध्ये भारतमाता मंदिराची स्थापना हे त्यांचे एक मोठे कार्य ठरले. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत स्वामी सत्यमित्रानंद गिरींच्या कार्याबद्दल...
.............
उत्तराखंडातील हरिद्वारला गेल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळांबरोबर तिथल्या आठ मजली भारतमाता मंदिराला पर्यटक भेट देतातच. ही सुंदर वास्तू स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी आपल्या दिव्य कल्पनेनुसार बांधून घेतली. या इमारतीचे उद्घाटन माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते १५ मे १९८३ रोजी झाले. स्वामी सत्यमित्रानंदजींचे नुकतेच, २५ जून २०१९ला दीर्घ आजारानंतर निधन झाले. 

स्वामीजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. त्यांचा परिवार सीतापूरचा होता. अंबिकाप्रसाद पांडेय हे त्यांचे मूळ नाव. लहानपणापासूनच त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता आणि संन्यास आश्रमाबद्दल रुची वाटत होती. स्वामीजींचे वडील शिवशंकर पांडेय शिक्षक होते. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. हिंदी व संस्कृत भाषांचा अभ्यास करून अंबिकाप्रसाद आग्रा विद्यापीठातून एमए झाले. हिंदी भाषा आणि साहित्य विषयासाठी ‘साहित्यरत्न’ ही पदवीसुद्धा त्यांनी प्राप्त केली. तसेच वाराणसी विद्यापीठातर्फे ‘शास्त्री’ ही पदवी मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वामी वेदव्यासानंद यांच्या सान्निध्यात आले आणि त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. त्यानंतर ते स्वामी सत्यमित्रानंद गिरी या नावाने ओळखले जाऊ लागले. अवघ्या २७व्या वर्षी उत्तरेच्या ‘उत्तराम्नाय’ अर्थात ‘ज्योतिर्मठा’चे शंकराचार्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर दहा वर्षांतच त्या पदाचा त्याग करून त्यांनी मानवता धर्माच्या प्रसारासाठी, आध्यात्मिक ज्ञान समाजात रुजवण्यासाठी आपले पुढील सर्व जीवन व्यतीत केले. 

स्वामी गोविंददेव गिरी यांच्यासमवेत स्वामी सत्यमित्रानंद गिरी

‘श्री रामकृष्ण वचनामृत’ हा ग्रंथ आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडलेला होता. तरुण वयातच हिमालयाच्या तलहटी भागात त्यांची साधनाही झाली. स्वामी अखंडानंद, श्री आनंदमयी मा, स्वामी करपात्रीजी, पं. राम शर्माजी यांचे आशीर्वाद त्यांना लाभले होते. ते उत्तम प्रवचनकार आणि प्रभावी व्यक्ते होते. भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व जगभर बिंबवण्यासाठी त्यांनी ४०-४५ देशांचा प्रवास केला. विश्व हिंदू परिषदेच्या पाच संस्थापक संतमंडळापैकी ते एक होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत स्वामी सत्यमित्रानंद गिरी

भारतभरातील छोटी-छोटी गावे आणि वनक्षेत्रात जाऊन हिंदू समाज एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य स्वामीजींनी केले. इंदिराजींच्या हत्येनंतर हिंदू-शीख ऐक्यासाठी त्यांनी अमृतसरपर्यंत एकता यात्रा काढली. त्यांच्या सन्मानार्थ इंग्लंड, कॅनडा या देशांत त्यांचा छाप असलेली नाणी निघाली. राम मंदिर आंदोलनात १९९० साली त्यांनी तुरुंगवासही भोगला. न्यूयॉर्कमधील विश्वधर्म संमेलनात २००० साली त्यांनी संतमंडळाचे नेतृत्व केले. भारत सरकारने २०१५ या वर्षी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘पद्मभूषण’ सन्मान त्यांना प्रदान केला. 

जातिभेद, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अखंड जागृतीपर कार्य त्यांनी केले. विकलांग सेवा आणि पूर-भूकंप इत्यादी संकटांमध्ये मदत करण्यासाठी ते अग्रेसर राहिले. विश्वभर यज्ञसंस्कृतीच्या प्रसारार्थ त्यांनी शेकडो महायज्ञ घडवून आणले. वेदांचे शिक्षण आणि गोसेवा यांचे महत्त्व ते लोकांना सदैव सांगत राहिले. गीता आणि रामचरित मानस या ग्रंथांचा त्यांनी विशेष अभ्यास केलेला होता. हिंदी, गुजराती, इंग्रजी आदी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. 

त्यांच्या प्रमुख शिष्यवर्गात स्वामी प्रज्ञाभारती गिरी, स्वामी गोविंददेव गिरी, स्वामी अखिलेश्वरानंद, स्वामी देवमित्रानंद यांचा समावेश आहे. स्वामी अवधेशानंद गिरी हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत. हरिद्वारमध्ये भारतमाता मंदिराची स्थापना हे त्यांचे एक मोठे कार्य ठरले. समन्वय परिवार आणि समन्वय कुटीर यांचीही स्थापना करून जगभर सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन ते करत राहिले. त्यासाठी केनिया, युगांडासह अनेक देशांमध्ये त्यांनी केंद्रे निर्माण केली. 

भारतमाता मंदिर

भारतमाता मंदिर :
भारतामधील देवदेवता, ऋषिमुनी आणि निवडक प्रसिद्ध व्यक्तींचे एक भव्य मंदिर हरिद्वारमध्ये उभारावे असे स्वामीजींचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात पूर्ण झाले १५ मे १९८३ रोजी. सप्त सरोवर भागात असलेले हे आठ मजली, १८० फूट उंचीचे मंदिर पर्यटकांचे मोठे आकर्षण स्थळ बनले आहे. ‘मातृमंदिर’ (Mother India) या नावानेही ते ओळखले जाते. पहिल्या मजल्यार भारतमातेचा पुतळा असल्याने भारतमाता मंदिर असे नाव त्याला देण्यात आले. तेथील सर्व मूर्ती जणू जिवंत असल्याप्रमाणे आपल्याला दिसतात. मंदिरात वाळूने बनवलेला भारताचा नकाशा आहे. त्यावर लाल-निळा प्रकाश सोडल्याने तो फारच सुंदर दिसतो. 

प्रत्येक मजला एक स्वतंत्र इमारत असल्याप्रमाणे बनवलेला आहे. दुसरा मजला शूरवीरांना मानवंदना देतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्व जीवन समर्पित केले. त्यात गुरू गोविंदसिंग, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र बोस, शिवाजी महाराज, झाशीची राणी, महात्मा गांधीजी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लालबहादूर शास्त्री यांच्या मूर्ती आहेत. 

तिसऱ्या मजल्यावर ‘मातृमंदिर’ आहे. तिथे मैत्रेयी, सावित्री, मीराबाई आदी विदुषी महिलांच्या मूर्ती आहेत. चौथ्या मजल्यावर गौतम बुद्ध, तुलसीदास, कबीर, रहीम, साईबाबा आदी महान भारतीय संत आहेत. पाचव्या मजल्यावर निरनिराळ्या धर्मांविषयी माहिती, इतिहासातील घटना आणि भारतामधील सुंदर विभाग प्रदर्शित केलेले आहेत. 

सहाव्या मजल्यावरील शक्तिमंदिरात दुर्गामाता, पार्वती, काली, राधा, सरस्वती आदींच्या मूर्ती आहेत. सातव्या मजल्यावर भगवान विष्णूचे दहा अवतार दिसतात (मत्स्य, कूर्म ते कल्की). आठवा मजला निसर्गप्रेमी आणि आध्यात्मिक प्रकृतीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे. तिथे शिवाचे मंदिर आहे आणि त्यातून सप्त सरोवर, हरिद्वार आणि हिमालयाची सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. पाचव्या मजल्याला ‘सर्वधर्मसमभाव सभागृह’ असेही म्हणतात. तिथे भारतीय उपखंडातील सर्व धर्म, पंथ, विचारधारांचे एकत्रित दर्शन घडते. 

२००० साली महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या दशकपूर्तीनिमित्त प्रसिद्ध झालेल्या ‘वेदामृतम्’चे संपादन आणि निर्मिती केल्याबद्दल रवींद्र गुर्जर यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार झाला होता.

स्वामी सत्यमित्रानंद गिरींच्या निधनाने आध्यात्मिक जगताची फार मोठी हानी झाली आहे. ‘भारताच्या मातीचा एक एक कण ईश्वरी शक्तीच्या आधाराने निर्माण झालेला आहे,’ असा विश्वास त्यांना होता. म्हणून भारतमातेलाच ते आपली इष्ट-आराध्य देवता मानत. सन १९९८मध्ये स्वामीजींच्या नावे एक ‘फाउंडेशन’ स्थापन झाले आहे. जगभर त्याच्या शाखा आहेत. 

स्वामीजींचे कार्य महान तर आहेच! भारताचे भाग्य असे, की त्यांच्यासारख्या शेकडो व्यक्ती देशभर निर्माण होत आल्या आहेत. आपली संस्कृती, तत्त्वज्ञान आणि आदर्श गुरुपरंपरा या गोष्टी प्रतिकूल परिस्थितींमधूनही अखंड टिकून राहिल्या आहेत. 

या लेखाद्वारे स्वामी सत्यमित्रानंदजींना आदरांजली!

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search