Next
‘बचत गटांना ‘सरस’च्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ’
विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Friday, March 01, 2019 | 12:26 PM
15 0 0
Share this storyनवी मुंबई : ‘कोकण सरसमुळे बचत गटांच्या उत्पादनासाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलत आहे,’ असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड व ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभाग व जिल्हास्तरीय ‘कोकण सरस विक्री व प्रदर्शन २०१९’चे आयोजन केले आहे. हे प्रर्दशन बेलापूर येथील सिडको अर्बन हट येथे २७ फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत सुरू राहणार आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ‘एमएसआरएलएम’चे संचालक रवींद्र शिंदे, ठाणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपायुक्त (विकास) भारत शेंडगे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, सहाय्यक आयुक्त दीपाली देशपांडे, मंजिरी व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. पाटील म्हणाले, ‘बचत गटांमुळे महिला एकत्र येतात. महिला एकत्रित आल्या, तर विचारांची देवाण-घेवाण होऊन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.  कोकणाला निसर्गाने वरदान दिले असून, येथे पर्यटकांची गर्दी वर्षभर असते. येथील उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळते. त्यामुळे बचतगटांनी आपल्या उत्पादनाचे उत्पादन वर्षभर चालू ठेवले पाहिजे. आपण पर्यटकांसाठी कायमस्वरूपी भोजनव्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत. तालुक्यातील बचत गटांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपल्या उत्पन्नाची गुंतवणूक आरोग्य व शिक्षणात केली पाहिजे. बचत गटांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते, त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. प्रशिक्षणातून तुमच्या वस्तूंचा दर्जा उंचावतो व मुल्यवृधी मिळते.’

‘एमएसआरएलएम’चे संचालक शिंदे म्हणाले, ‘महिलांचा आर्थिक विकास, सबलीकरण व स्वावलंबी होण्यासाठी बचत गट हे साधन उपयोगी आहे. गटांनी आपल्या मालाचा दर्जा उंचावून स्पर्धेत आपला माल बाजारात कसा विकला जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण  जीवनोन्नती अभियानातंर्गत कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर सरस प्रदर्शने दर वर्षी भरविण्यात येतात. मुंबईमध्ये ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना  बाजारपेठ मिळते. या अभियानाच्या माध्यातून विभागातून १२ हजार ८४६ स्वयंसहाय्यता गट निर्माण केले आहेत. राज्यात तीन लाख ६० हजार स्वयंसहाय्यता गट निर्माण झाले आहेत. अस्मिता बाजाराच्या माध्यमातून बचत गटांची उत्पादने ऑनलाइनही खरेदी करण्यात येतात.’ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी या वेळी समयोचित भाषण केले. चिरनेर येथील महिला बचत गटाच्या प्रमुख शंकुतला चिरनेरकर यांनी त्यांच्या बचत गटांनी उत्पादित केलेली मातीची भांडी या वेळी मान्यवरांना भेट दिली.  

प्रास्ताविक करताना उपायुक्त (विकास) भारत शेंडगे म्हणाले, ‘महिला बचत गट, उत्पादक तसेच ग्राहक यांच्यामधील साखळी कमी करून उत्पादकांचा माल ग्राहकांपर्यत पोहचविण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होते. यावर्षी प्रदर्शनात सुमारे १०० बचत गटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाण्यातील २४, रायगडातील ३६, रत्नागिरी व पालघरमधील प्रत्येकी आठ, सिंधुदुर्गमधील नऊ व इतर जिल्ह्यांतील १५ गट सहभागी झाले आहेत.’

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील बचत गटातील महिला व कोकण विभागातील  शासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link