Next
शेअर खरेदीसाठी उत्तम संधी
BOI
Sunday, October 06, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


शेअर बाजारात गेल्या आठवड्यात अनेक चढ-उतार झाले. सप्ताहाखेर चार ऑक्टोबरला सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी घट नोंदवली. आता कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर होतील. त्यामुळे शेअर बाजारात तेजीचेच वारे वाहतील, असा अंदाज आहे. या तेजीचा फायदा घेण्यासाठी कोणते शेअर्स घेणे उचित राहील, हे जाणून घेऊ या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्याकडून, ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
.....
गेल्या शुक्रवारी (चार ऑक्टोबर) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३७ हजार ६७३ अंकांवर बंद झाला. त्या एका दिवसात तो ४३८ अंकांनी खाली गेला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १४० अंकांनी खाली जाऊन ११ हजार १७४ अंकांवर बंद झाला. 

बजाज फायनान्स कंपनीचा शेअर तीन हजार ९०२ रुपये किमतीवर स्थिरावला. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बजाज फायनान्सचे विक्रीचे व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध झाले, की तो पुन्हा किमान तीनशे रुपयांनी वर जाईल. बजाज फिनसर्व्हच्या शेअरचा भावही आठ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. 

स्टरलाइट टेक्नोलॉजी कंपनीचा शेअर सध्या १४६ रुपयांना उपलब्ध आहे. या कंपनीने दक्षिण आफ्रिकेत ब्रॉडबँडची सेवा जोहान्सबर्गमध्ये सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. त्यामुळे यंदा तिची विक्री वाढेल. स्टरलाइट टेक्नोलॉजीच्या शेअरचा गेल्या बारा महिन्यांतील कमाल भाव ४०० रुपये होता, तर किमान भाव ९७ रुपये होता. रोज सुमारे सात ते १० लाख शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किंमत/उपार्जन गुणोत्तर १०.२ पट दिसते. जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांनी या शेअरमध्ये जरूर गुंतवणूक करावी. एडलवाइज या ब्रोकरेज संस्थेने हा शेअर घेण्याची शिफारस केली असून, तिच्या मते वर्षभरात हा शेअर २९६ रुपयांची पातळी गाठेल. ३० जून अखेरच्या तिमाहीसाठी तिची विक्री १४३१ कोटी रुपये होती. मार्च २०१९ तिमाहीपेक्षा ती कमी आहे. जून तिमाहीसाठी तिचा नफा १४३ कोटी रुपये होता. 

टाटा ग्लोबल हा शेअर विकत घेण्यासाठीदेखील या ब्रोकरेज संस्थेने शिफारस केली आहे. तिच्या मते टाटा ग्लोबलचा शेअरही २९६ रुपयांचा भाव दाखवेल. आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअरही घेण्यासारखा आहे. या शेअरच्या किंमतीचे लक्ष्य ५० रुपयांपर्यंतचे आहे. आयआयएफएल ब्रोकरेज कंपनीने वेदान्त या अनिल अगरवाल समूहाच्या कंपनीच्या शेअरची शिफारस केली आहे. या शेअरचा भाव १७० रुपयांपर्यंत वाढेल. एचडीएफसी बँकेचा शेअर सध्या खरेदी केल्यास नजीकच्या भविष्यात त्याची २२५० रुपयांपर्यंत विक्री करता येईल. ग्रासीम इंडस्ट्रीजच्या शेअरचे विक्रीचे लक्ष्य ७६५ रुपये आहे. 

आयटीसी कंपनीच्या शेअरचा भाव गेल्या आठवड्यात थोडा उतरला आणि २५७ रुपयांपर्यंत आला. या कंपनीची पंचतारांकित हॉटेल्स असल्यामुळे पुढील काही महिन्यांतील पर्यटनवाढीचा फायदा तिला होऊ शकेल. वर्षभरात या शेअरचा भाव किमान ३५ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँकेचा शेअर सध्या ४१३ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचा भावही मार्च २०२०पर्यंत २५ टक्के वाढावा. केंद्र सरकारने २०१९-२०२० या वर्षासाठीची निर्गुंतवणूक पुढच्या दोन महिन्यांत करायची ठरवले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत अर्थमूव्हर्स, कोल इंडिया, भारत पेट्रोलियम या शेअर्सचा त्यात समावेश असू शकेल. 

पुढील काही दिवस शेअर बाजारात तेजीचीच झुळूक दिसेल.  

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)    

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search