मराठी घरांत आज जी साधारणपणे चाळिशीतली आणि त्याच्यापुढची मंडळी आहेत त्यांना ‘बालपणीच्या आठवणी सांगा’ म्हटलं तर हटकून ‘भातुकली’ची आठवण निघेल! भातुकलीची मिनिएचर खेळणी आता कालौघात पाहायला मिळत नाहीत; पण पुण्यातल्या विलास करंदीकर यांनी मात्र भातुकलीच्या तब्बल तीन हजार भांड्यांचा संग्रह केलाय. मोक्षपट, सारीपाट, गंजिफा, जुने पत्ते आणि जुना व्यापार असे दुर्मीळ खेळसुद्धा त्यांच्या संग्रहात आहेत. भातुकलीच्या खेळाच्या या ‘राजा’शी ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी मारलेल्या गप्पा...
........
- भातुकलीची भांडी आणि बाकीचे हे दुर्मीळ खेळ जमवायला तुम्ही सुरुवात कधी आणि कशी केलीत?
- साधारणपणे तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. घरामध्ये मोठा लाकडी झोपाळा लावायचं ठरलं आणि त्यासाठी पितळी फुलं हवीत, म्हणून शोधाशोध सुरू केली. गंमत म्हणजे ज्या पितळी वस्तूंच्या दुकानात ती फुलं मिळाली, तिथेच कोपऱ्यात मोडीत घातलेली काही भातुकलीची पितळी छोटी भांडी होती. ती पाहताक्षणी आवडून गेली आणि झोपाळ्यासाठी पितळी फुलं आणायला गेलेला मी, ती भांडीही घेऊन घरी आलो. तिथूनच या छंदाची सुरुवात झाली.
- घरच्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावर?
- सुरुवातीला अर्थातच नापसंती आणि नाराजी. ‘हे काय? ही भांडी काय कामाची? त्यांचा काय उपयोग,’ वगैरे ऐकवलं गेलं; पण जेव्हा ती छोटी छोटी भांडी चिंचेने छानपैकी घासून लख्ख केली, तेव्हा मात्र झळाळून उठली आणि त्यांना शोकेसमध्ये जागा मिळाली. ती सुरुवात होती माझ्या छंदाची! मग सुट्टीच्या दिवशी अशी भातुकलीची छोटी भांडी शोधण्याचा नादच लागला. एका ठिकाणी काही एकदम १०-१२ भांडी मिळत नाहीत. मग अक्षरशः एकेक भांडं विकत घेऊन संग्रहात भर घालायला लागलो. मिळतील तिथून भांडी खरेदी करायला लागलो. हळूहळू भातुकलीच्या भांड्यांची संख्या वाढायला लागली. आणि त्यातूनच पुढे मग प्रदर्शनाची कल्पना सुचली. आजपर्यंत या भांड्यांची तीनशेहून अधिक प्रदर्शनं झाली आहेत.
- आता किती भांडी असतील साधारणपणे?
- आजमितीला माझ्याकडे तांबे, पितळ, माती, लाकूड, लोखंड, एवढेच नव्हे तर चांदी अशा वेगवेगळ्या धातूंची आणि घटकांची मिळून भातुकलीची जवळपास तीन हजार भांडी जमली आहेत. माझं हे वेड माझ्या मित्रांना आणि ओळखीच्यांनाही माहीत झाल्यामुळे त्यांचीही वेळोवेळी मदत होत गेली. मी शोध घ्यायला लागल्यावर असं समजलं, की आपल्या संस्कृतीत स्वयंपाकघरात वापरायच्या भांड्यांची नावंच मुळी दोनशेच्या घरात आहेत. कचोळं, शकुंतला, संपुट, डोणी, अग्निहोत्र, वसुदेव प्याला, तीर्थोटी, अभिषेक पात्र, गडवे, गंज, रोवळी, ओगराळं, वेळण्या, वेड्भांडे अशा अद्भुत नावांची इतक्या विविध प्रकारची भांडी आणि त्यांचे ते विलक्षण आकार हे सारं भुरळ पाडत गेलं.
- पण आताच्या पिढीत आणि त्याहीपुढे हे जपलं जाणं कठीण आहे, असं नाही वाटत?
- हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जावा असं आतून फार वाटतं; पण ते आता कठीण दिसतंय. लोकं मॉलमध्ये जाऊन, हॉटेलात जाऊन हजारो रुपये खर्च करतील, मुलांना प्लास्टिकची खेळणी देतील; पण त्यांना तांब्या-पितळेची अशी भातुकली आणणार नाहीत. भातुकलीतून संस्कार होऊ शकतात, असं बहुधा कुणी मानत नाही आता. या जुन्या ठेव्याचा प्रसार व्हावा, भातुकली आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसे संस्कार व्हावेत, याचसाठी मी प्रदर्शन मांडतो. आता मला काळजी आहे, की माझ्यानंतर या तीन हजार भांड्यांच्या संग्रहाचं काय? आता कुणालाच या सांस्कृतिक ठेव्याचं काही देणं-घेणं नाही असं दिसतं. ना सामान्य लोकांना ना राज्यकर्त्यांना! हेच तुम्ही युरोपमध्ये, बाहेरच्या देशांत पाहिलंत, तर तिथे असा वारसा आनंदाने जपला जातो. एकेक वीटसुद्धा सांभाळली जाते. तिथल्या म्युझियम्सचं उदाहरण त्यासाठी घेता येईल.
- भातुकलीबरोबर काही जुने खेळही तुमच्या संग्रहात आहेत ना?
- हो. प्रदर्शनाच्यावेळी मी ते जुने खेळही मांडतो. कारण लोकांना आपलं बालपण आठवलं, की ते खेळसुद्धा ‘नॉस्टॅल्जिक’ करतात. मोक्षपट, सारीपाट, गंजिफा, जादू, जुने पत्ते, काचापाणी आणि जुना व्यापार असे खेळ मी प्रदर्शनात ठेवतो. इतर खेळांबरोबर माझ्याकडे ‘ठकी’सुद्धा आहे, जी आता कुठेच बघायला मिळत नाही.
- मोक्षपट, गंजिफा या खेळांबद्दल थोडं सांगा...
- डेक्कन कॉलेजच्या देवधर प्रोफेसरांमुळे हा २८४ घरांचा मोक्षपट मला मिळाला. ‘हरिहरलोक हिरण्यगर्भ’ असं त्यावर लिहिलं आहे. मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु श्रीगुलाबराव महाराजांनी हा तयार केला आहे. ते स्वतःला ज्ञानेश्वरांची ‘मानसकन्या’ मानायचे. स्त्री-वेशात राहायचे. त्यांनी खेळातून परमार्थाची भावना दृढ करण्यासाठी हा मोक्षपट तयार केला होता. मनुष्यजन्मापासून त्याची घरं सुरू होतात आणि मोक्षाप्रति पोहोचण्याचा साधनामार्ग त्यात आखलेला आहे. त्या वाटेत काही धोकेही आहेत, त्या ठिकाणी साप दाखवले आहेत. प्रातःकाळी स्नान करून हा खेळ खेळावा, असं म्हटलं जायचं. त्याच्या बाराखडीतून आध्यात्मिक संदेश दिलेले आहेत. ‘गंजिफा’ हा विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित पत्त्यांचा खेळ आहे. प्रत्येक अवताराची बारा पानं याप्रमाणे गोलाकार आकाराचे १२० पत्ते त्यात असतात. दुपारी १२नंतर रात्री १२पर्यंत खेळल्यास ‘राम’ हा हुकूम आणि रात्री १२ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १२पर्यंत खेळल्यास ‘कृष्ण’ हा हुकूम. तीन जणांनी प्रत्येकी ४० पानांच्या साह्याने हा खेळ खेळायचा असतो. विष्णू हा डावाचा राजा. हा खेळसुद्धा इंटरेस्टिंग आहे. पत्ते ठेवायची डबीसुद्धा छान आहे. जुने पत्ते साधारणपणे नव्या पत्त्यांसारखेच आहेत. फक्त त्यात एक्का ते दश्शीपर्यंतच्या पानांवर आकडे छापलेले नसायचे. त्याचीही डबी आकर्षक बनवलेली असायची.
- भविष्यात काही योजना?
- जपानी माणसं त्यांच्या बाहुल्या घेऊन भारतात येऊन प्रदर्शन भरवतात; मग आपण जपानमध्ये जाऊन आपल्या भातुकलीचं प्रदर्शन का भरवू नये, असंही वाटतं. भातुकलीच्या तीन हजार भांड्यांच्या संग्रहाचा विक्रम गिनेस बुकमध्ये जावा, यासाठीही प्रयत्न करून पाहिले; पण त्यांचं नकाराचं पत्र आलं. कारण हा विक्रम ठरण्यासाठी मुळात आधी तुलनेकरिता कुणाकडे तरी १२००-२००० भांडी हवीत. तीच कुणाकडे नाहीत. सध्या आपल्याकडची काही मोजकी माणसं भातुकलीचे सेट्स मागतात. मग त्यांना हवे तसे तांब्या-पितळीचे भातुकलीचे सेट्स बनवून मी विकत असतो; पण हा सांस्कृतिक वारसा कितपत टिकेल याबद्दल शंकाच आहे. नव्याबरोबर काही जुने खेळसुद्धा भावी पिढ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख राहण्यासाठी टिकून राहावेत, असं वाटत राहतं. दूरदर्शनवरच्या प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी माझा हा संग्रह पाहून खूप उत्सुकता दाखवली, माहिती घेतली. त्यांनी आता ‘भातुकली’ या विषयावर संपूर्ण माहिती देणारं पुस्तक लिहिण्याचं काम हाती घेतलंय. त्यातून लोकांपर्यंत जास्त माहिती जाऊ शकेल.
(भातुकलीच्या संग्रहाबद्दलचे वसंत करंदीकर यांचे मनोगत आणि त्यांच्या संग्रहाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)