Next
वासंती मुजुमदार, माधवराव किबे, आनंदराव टेकाडे
BOI
Thursday, April 05, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘अशा जळत्या उन्हात अर्धा मोहोर जळावा, मुक्या आंब्याच्या शाखेने अश्रू एकला सांडावा’ असं म्हणणाऱ्या कवयित्री वासंती मुजुमदार, ‘रामायणातील लंकेचा शोध’ पुस्तकाचे लेखक सरदार माधवराव किबे आणि ‘आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा’ लिहिणारे आनंदराव टेकाडे यांचा पाच एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
वासंती मुजुमदार 

पाच एप्रिल १९३९ रोजी कराडमध्ये जन्मलेल्या वासंती मुजुमदार या कवयित्री आणि ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. सहज आणि मोहक लय असणारी कविता हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठंसुद्धा केली आहेत. 

‘रूप’ या लघु अनियतकालिकामधून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आणि नंतर सत्यकथा, दीपावली, स्त्री, अनुष्टुभ, मरवा अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांनी कवितालेखन केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गप्रतिमांची उत्कट भावानुभूती व्यक्त होताना दिसते. उदाहरणार्थ त्यांची ‘पाऊसपान’ ही कविता- 

झड घाली पाऊसपान
हत्ती माझा भिजला छान
न्हाणावलेल्या परीचा
एकच केस चिंब ओला
परीला नाही कसले भान
झड घाली पाऊसपान..
थरथरपंखी चिमणीचा
मुकाट झाला मधला दात
पोपटरंगी पोरीचा
पदर उडाला गाणे गात
उन्ह उसवुनी
आले पाणी
सरसर चढले ढगांवर
त्याची माझी जुळली तान
झड घाली पाऊसपान...
कौलारावर चार पारवे
उखाण्यांतले कदंब हिरवे
हिरवी कृष्णा
हिरवे डोंगर
हिरवा तनुल पिसारा भवती
झड घाली पाऊसपान
माझी मात्र कोरडी तहान
झड घाली पाऊसपान
झड घाली पाऊसपान...’

सहेला रे, सनेही हे काव्यसंग्रह, नदीकाठी, झळाळ असे ललितबंधसंग्रह आणि कविता असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. ग्रंथाली वाचक चळवळीच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. 

त्यांना दमाणी पुरस्कार तसंच राज्य शासनाचा बहिणाबाई पुरस्कार मिळाला आहे. 

सात नोव्हेंबर २००३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(वासंती मुजुमदार यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......

माधवराव विनायक किबे 

पाच एप्रिल १८७७ रोजी जन्मलेले माधवराव किबे हे इंदूर संस्थानाचे पंतप्रतिनिधी होते. त्यांना इंदूरच्या होळकरांनी ‘सरदार’ हा किताब दिला होता, तर देवासच्या राजेसाहेबांकडून त्यांना ‘रावबहादूर’ अशी पदवी मिळाली होती.

मध्य हिंदुस्तानातील गॅरंटीड संस्थाने, रामायणातील लंकेचा शोध, मोहेंजोदारो संस्कृतीच्या नाशाची कारणे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१९२६ साली झालेल्या महाराष्ट्र ग्रंथकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

१२ ऑक्टोबर १९६३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
.......

आनंदराव कृष्णाजी टेकाडे 

पाच एप्रिल १८९० रोजी जन्मलेले आनंदराव कृष्णाजी टेकाडे हे कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. 

‘आनंदकंद ऐसा हा हिंद देश माझा’ ही त्यांची कविता विशेष गाजली होती. 

आनंदगीत (भाग १ ते ४), संगीत मधुरा, संगीत मधुरमीलन, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१६ फेब्रुवारी १९६४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link