Next
पुणेकरांनी अनुभवली तीन पिढ्यांच्या गायकीची सुरेल मेजवानी
BOI
Monday, July 29, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:

पं. उपेंद्र भटपुणे : किराणा घराण्यातील तीन पिढ्यांमधील सुरेल गायकीचा आस्वाद घेण्याची संधी शनिवारी पुणेकर रसिकांना मिळाली. किराणा घराण्यातील उदयोन्मुख कलाकार अभयसिंह वाघचौरे, गायिका आरती ठाकूर-कुंडलकर व ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायकीने रसिक भारावून गेले.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कलाश्री संगीत मंडळातर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. औंधमधील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ही मैफल रंगली होती. या वेळी उस्ताद रईस बाले खान, ‘टॉक्ड’ कंपनीच्या सहसंस्थापिका प्रणाली विचारे, डॉ. रेखा खेडेकर, रजनीकांत खेडेकर, युनियन बँकेचे सुळे, अॅड. सुलभा गुळवे, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण आदींची विशेष उपस्थिती होती. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून, आजवर अनेक मान्यवरांनी यात आपली कला सादर केली आहे.

अभयसिंह वाघचौरेकिराणा घराण्याचे गायक सुधाकर चव्हाण यांचे शिष्य अभयसिंह वाघचौरे यांच्या मुलतानी राग गायनाने मैफलीला सुरुवात झाली. बहारदार आवाज, स्पष्टता यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांनी विलंबित एकतालातील ‘गोकुल ग्राम का छोरा...’ या बंदिशिद्वारा बडा ख्याल व ‘कंगन मुंदरीया...’ या बंदिशिद्वारा तीन तालातील छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर ‘सावरे आईजैय्यो...’ हा दादरा सादर करून आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना अश्विनी वाघचौरे (तबला), गंगाधर शिंदे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांनी या सुरेल वातावरणात आपल्या गायकीने विविध रंग भरले. त्यांनी राग अपूर्वकल्याणने सुरुवात केली. बाहेर बरसणाऱ्या पाऊसधारांबरोबर ही सुरेल बरसात रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. ‘अरज सुनो..’ म्हणत विलंबित एकतालातील बडा ख्याल व ‘करम करो जग जननी...’ तीनतालातील छोटा ख्याल पेश केला. द्रुत तीनतालातील ‘होवन लागी सांज...’ ही बंदिश सादर केली. शेवटी संत नामदेव यांचा ‘सुखालागी करिसी तळमळ...’ हा अभंग त्यांनी सादर केला. त्यांना संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), गंभीर महाराज अवचर (पखावज), दिगंबर महाराज (टाळ), हेमलता जोशी, योगिनी ढगे (तानपुरा) यांनी साथसांगत केली.

आरती ठाकूर-कुंडलकरपं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने मैफलीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी राग मियाँमल्हार गात बाहेर कोसळणाऱ्या पावसालाच साद घातली आणि सभागृहात रसिकांवर सुरांची बरसात केली. ‘करीम नाम तेरो..’ गात विलंबित एकतालातील बडा ख्याल तर ‘मोमदशा रंगीले...’ म्हणत तीनतालातील छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर ‘जादूभरेली कौन एक अलबेली नार...’ ही ठुमरी पेश केली. शेवटी ‘अवघा आनंदी आनंद...’ हा अभंग म्हणून या आनंदमयी मैफलीला त्यांनी विराम दिला. त्यांना सचिन पावगी (तबला), कुमार करंदीकर (हार्मोनियम), गंभीर महाराज अवचर (पखावज), बाळासाहेब गरुड (टाळ), देवव्रत भातखंडे (गायनसाथ व तानपुरा) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search