Next
लयपश्चिमा : म्युझिकल मास्टरक्लास
BOI
Tuesday, October 30, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


बॉलिवूडमधील ‘रॉक ऑन’, ‘रॉक स्टार’ हे सिनेमे पाहायच्या आधी, ‘रॉक’ हा प्रकार न ऐकलेले कैक जण असतील. त्यातलाच मीसुद्धा एक! या प्रकाराशी, सिनेमाव्यतिरिक्त माझी अजून एकदा ओळख झाली, ते डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या कार्यक्रमातून. पाश्चात्य गाण्याचं चांगलं भारतीयीकरण करण्यात आलं, तर काय जादू पाहायला मिळते, याचं ते एक सुंदर उदाहरण. या कार्यक्रमाची प्रेरणा असलेलं जावडेकर यांचं ‘लयपश्चिमा’ हे केवळ एक पुस्तक नाही, तर ती एक अनुभूती आहे. वाचकाला समृद्ध करणारी. वाचताना गाणं प्रत्यक्ष ऐकल्याचा, संगीत मैफलीत भाग घेतल्याचा अनुभव देणारी. या पुस्तकाला, मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिला जाणारा लक्ष्मीकांत चंद्रगिरी स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या निमित्तानं ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘लयपश्चिमा’ या संगीतविषयक पुस्तक आणि कार्यक्रमाबद्दल...
..........................
एका रॉक कॉन्सर्टसाठी एका मोठ्या स्टेडियमबाहेर गर्दी जमलेली असते. उत्सवी वातावरण. गायकाचं चित्र छापलेल्या साहित्याची विक्री होत असते. स्टेडियमच्या आत स्टेजचा फायनल चेक सुरू असतो. चेक ओके झाल्यानंतर, तिथली ड्रमर त्वेषानं ड्रम वाजवायला सुरुवात करते. आतापर्यंत पडद्यावर छोट्या चौकोनात मधोमध दिसत असलेलं चित्र, ड्रम-बीट्सबरोबरच एकदम पडदाभर पसरतं. इलेक्ट्रिक गिटारचा खर्ज, ड्रम्ससोबत असतानाच, आपल्याला एका माणसाला चार-पाच माणसं लुटण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं. त्या माणसांशी झटापट करत तो माणूस आपली कशीबशी सुटका करून घेतो आणि एका बसमधून स्टेडियमपाशी उतरतो. बॅरिकेड्सना लाथा घालतो. सिक्युरिटीही त्याला सुरुवातीला ओळखत नाही. नंतर मात्र बॅरिकेड्स सरकवली जातात आणि चित्र एकदम बदलतं. त्या माणसाच्या सुरक्षेकरता सिक्युरिटी त्याला गराडा घालते. त्या माणसाच्या चालीत जोम येतो. तो स्टेजवर पोहोचतो, गळ्यात गिटार घालतो, चेहऱ्यावर पाणी मारतो आणि जखमी, चवताळलेल्या सिंहासारखा दमदार पावलं टाकत माईकजवळ पोहोचतो आणि तिथेच शॉट कट होतो. इम्तियाज अलीच्या रॉकस्टार सिनेमाची सुरुवात ही अशी आहे! ‘जॉर्डन’ या रॉकस्टारची शोकांतिका. 

‘रॉक’ प्रकाराचं भारतीयीकरण, रॉक-कलाकारांच्या वेशभूषा, केशभूषा आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात ठासून भरलेला अॅटिट्यूड, अशी सगळी चटकदार भेळ इम्तियाजनं बनवली. इम्तियाजचं दिग्दर्शन, रहमानचं दैवी संगीत, रणबीर कपूरने जीव तोडून केलेला अभिनय इत्यादी घटक असलेली, दुःखाची झालर असलेली ही रॉकस्टारची शोकांतिका अनेकांच्या पसंतीस उतरली. कोणताही हिट आणि वेगळा सिनेमा एक विशिष्ट ‘वेव्ह’ तयार करतो, ट्रेंड निर्माण करतो. तशी ‘रॉकस्टार’नं केली. त्या आधी चार-एक वर्षं आलेल्या ‘रॉक-ऑन’नंही काही प्रमाणात अशी वेव्ह निर्माण केली होती. ‘मॅजिक’ नावाच्या एका रॉक बँडची सुरस संगीतमय कथा पडद्यावर पाहताना अनेकांना आपले कॉलेजचे दिवस, मैत्री आणि हेवे-दावे आठवले असतील. ‘सोचा है, के तुमने क्या कभी..’ या ओपन एयर कॉन्सर्टमध्ये गायल्या जाणाऱ्या दणकेबाज गाण्यानं सिनेमाची सुरुवात होते, तशीच सांगताही. ‘तुम हो तो...’ या कॉन्सर्ट गाण्यानंच होते. ‘रॉक’ या अद्भुत प्रकाराची, इतक्या जवळून ओळख करून देणारे हे बॉलिवूडचे महत्त्वाचे सिनेमे आहेत. 

डॉ. आशुतोष जावडेकरखरं-खुरं ओरिजिनल रॉक कसं आहे, हे ऐकून तरी पाहू, असा इंटरेस्ट बऱ्याच भारतीयांच्या मनात निर्माण करण्याचं श्रेय, फरहान अख्तर, शंकर एहसान लॉय, इम्तियाज अली, ए आर रहमान, मोहित चौहान आणि रणबीर कपूरला जातं, असं म्हटलं, तरी वावगं ठरू नये. हे सिनेमे पाहायच्या आधी, रॉक हा प्रकार न-ऐकलेले कैकजण असतील. यातलाच मीसुद्धा एक! या प्रकाराशी, सिनेमाव्यतिरिक्त माझी अजून एकदा ओळख झाली, ती डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या कार्यक्रमातून. लहानपणापासून मी बॉलिवूड संगीताला जास्त सामोरा गेलोय. त्याच्या जोडीला कधी मराठी भावगीतं, क्वचित काही नाट्यगीतं, कधी थोडसं शास्त्रीय तर कधी इन्स्ट्रुमेंटल; पण अनेकदा ऐकलं गेलेलं, किंबहुना अजूनही ऐकलं जाणारं संगीत म्हणजे माझ्याकरता ‘बॉलिवूड संगीत’. बाकी विदेशी संगीत मी फारसं ऐकलं नाही. बॉनी एम, अॅबा, वेंगाबॉईज, ब्रिटनी स्पिअर्स, डेझर्ट रोझ, हॉटेल कॅलिफोर्निया, राहुल शर्मा, अनुष्का शंकर, केनी जी हे एवढंच मी ऐकलंय आणि ऐकतो. 

‘लयपश्चिमा’ कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि अक्षरशः एका जादुई नगरीत प्रवेश केल्यासारखं वाटलं. आशुतोष जावडेकर अत्यंत मृदुभाषी आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक घटना आणि किस्से असतात. प्रचंड प्रमाणात माहिती असते. ज्ञानानं आणि कर्तृत्वानं एवढा मोठा माणूस असूनही, हे सगळं सांगताना, तो एखाद्या मित्रासारखा वाटतो. आपल्यावर, माझं ऐकून घ्याच किंवा मी सांगतो ते तुम्हाला पटायलाच हवं, असं कोणतंही बंधन नसतं. मला बघा किती कळतं, असा आविर्भावही नसतो. कायम हसतमुख आणि आनंदी चेहरा असणारा हा मल्टिटॅलेंटेड मनुष्य एखाद्या जिवलग मित्राप्रमाणं आपल्याला हात धरून विदेशी सुरांच्या जगात फेरफटका मारायला घेऊन जातो. ही सैर सुरू असताना आपल्याला खूप आपलेपणानं माहिती देतो. तऱ्हेतऱ्हेचे प्रकार ऐकवतो. काय ऐकलं पाहिजे याची ओळख करून देतो. पाश्चात्य गाणी आणि आपली गाणी यातली साम्यस्थळे दर्शवून देतो. विदेशी कलाकार, त्यांची आयुष्यं, त्याचं संगीत, त्या संगीतासंदर्भात असणारे किस्से सांगतो. एकंदरीत सगळंच भन्नाट असतं. महत्त्वाचं म्हणजे, हा कार्यक्रम सतत बदलता असतो. प्रत्येक वेळी कार्यक्रमाची थीम वेगवेगळी असते. मी पाहिला तो कार्यक्रम ‘टीनएजर स्पेशल’ होता. कार्यक्रमात सुरुवातीला सियाचं ‘चीप थ्रिल्स’ (कम ऑन कम ऑन) दाखवण्यात आलं. नंतर या ओरिजिनल गाण्याचं ‘सदर्न स्टाइल मिक्स’ दाखवण्यात आलं. हे ‘सदर्न मिक्स’ कमाल होतं. पाश्चात्य गाण्याचं चांगलं भारतीयीकरण करण्यात आलं, तर काय जादू पाहायला मिळते याचं ते एक सुंदर उदाहरण होतं.

यानंतर, ‘कट्यार’मधल्या ‘मन मंदिरा..’ गाण्याचा विषय निघाला. आशुतोष सरांनी हे अत्यंत अवघड असं गाणं, ‘कराओके’शिवाय, कोणत्याही पार्श्वसंगीताशिवाय, हरकती घेत उत्तम गायलं. गाण्याचा अर्थ उलगडून दाखवला. साधारणतः त्याच अर्थाचं ‘हना मोन्टाना’मधलं, ‘बटरफ्लाय फ्लाय अवे..’ हे गाणं दाखवलं. ते ही गाणं अतिशय सुंदर. यानंतर ‘रॉक’ या प्रकाराबद्दल बोलण्यात आलं. जिमी एन्रिक, ‘ए. आर.’चं ‘नादान परिंदे’, करीबियन आयलंड्स, लॅटिन अमेरिकन संगीत, रिकी मार्टिन, त्याचं आयुष्य, शकिरा या सगळ्याच विषयांवर बोललं गेलं. शकिराचं जिप्सी गाणं पाहिलं. अतिशय कमाल गाणं. पहिल्यांदाच पाहत असतानाही मंत्रमुग्ध करणारं. हृदयाचा ठाव घेणारं. अफलातून! मग विषय निघाला तो ‘रॅप’, ‘हिप-हॉप’चा. यो यो हनी सिंग, लीन मिरांडा ते बा. भ. बोरकर अशा विस्तृत परीघाचं वर्तुळ होतं हे.

पुढे मग विद्या वोक्स नावाच्या एका व्यक्तीच्या कामाची ओळख झाली. विद्या मॅश-अप्स करते. ‘रे कबीरा.. मान जा..’ या गाण्याचं तिनं केलेलं ‘मॅश-अप’ केवळ अफलातून! लोक किती काय काय करत असतात, कमाल वाटते. मला स्वतःला हे सर्व मॅश-अप्स पाहून, त्यातल्या विदेशी सुरांशी ओळख पटवून घेऊन मग या कोल्ड्प्ले – शकिरा - वन-डी कडे जायला आवडेल. डॉ. आशुतोष याचं संगीतविषयक ज्ञान, एखाद्या मित्राप्रमाणं, आपलेपणानं समजून सांगायची पद्धत, साधेपणा आणि या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांशी सहज कनेक्ट होणं, हा या कार्यक्रमाचा ‘यूएसपी’ आहे. 

कार्यक्रम झाल्या झाल्या ह्याच सगळ्या प्रभावाखाली असताना ‘लयपश्चिमा’ पुस्तक घेऊन आलो. त्याच्या पहिल्या पानावरची ज्ञानेश्वरीची ओवी आणि ‘हारबर्ग’चं कोट वाचलं. त्यापुढे मनोगतात आशुतोषने म्हटलं आहे त्याप्रमाणे, संगीत ही सामाजिक घटना आहे. ते शून्यातून निर्माण होत नाही. नंतर तो स्पष्ट करतो, तो संगीत व दृष्यकलेचा संबंध. मनोगतातच मांडलेले अनेक नवे आणि महत्त्वाचे मुद्दे आपलं लक्ष वेधून घेतात आणि तिथूनच पुस्तक पकड घेतं. एकदम घट्ट. पहिलं प्रकरण ‘रॉक’बाबत. रॉक संगीत हे काळ्या ढगांमागून चमकणाऱ्या विजेसमान आहे विजेइतकंच नाट्यपूर्ण आणि प्रवाही. ताकदीचं आणि घातक! काय सुरेख उपमा आहे! अतिशय समर्पक. या पहिल्या ओळीपासून ते प्रकरण पूर्ण संपेपर्यंत आपण त्यात गुंतून राहतो. रॉक संगीत, त्यामागची एकंदर भूमिका, कॉन्सर्टस्, तिथला जल्लोष, तिथलं वातावरण, रॉकमधली हिंसा, ड्रग्स हे सगळं एकामागून एक येत जातं. वाचताना अनेकदा आपण थक्क होऊन जातो. रॉक म्युझिकचे प्रकार, त्यातली वाद्यं, त्यांचे बारकावे, रॉक गाणारे कलाकार, यातले प्रसिद्ध ग्रूप्स, त्यांची लोकप्रियता, त्या लोकप्रिय होण्यामागची तत्कालीन समाजाची मानसिकता व राजकीय पार्श्वभूमी हे सगळं ‘बर्डस आय व्ह्यू’ या प्रकरणात मिळतं. एल्विस प्रिस्ले, जिमी हेंड्रिक्स, बॉब डिलन, बीटल्स, बीटल्सचं इंडिया कनेक्शन, त्यातून जन्माला आलेलं रागा रॉक, सायकेडेलिक रॉक, मेटल इत्यादी प्रकारांची ही अफाट वेगवान तरीही सुरस, रंजक अशी रोलर कोस्टर राइड आहे. 

विशेष गाणी, विशेष गायक, त्यांच्या वेशभूषा, केशभूषा, गाण्याच्या प्रकारांमधले बारकावे, गाण्यामागची विशिष्ट पार्श्वभूमी, तिला दुजोरा देणारे अनेक संदर्भ इत्यादी अनेक गोष्टी यात आहेत. प्रकरण संपताना, ‘रॉक’मागच्या मानसिकतेची काव्यात्मक उकलही केलेली आढळते, जी फार मनोरंजक आहे. यानंतर सुरू होतं, ‘मैत्रीण झालेली आई’ नावाचं प्रकरण. जे ‘कंट्री संगीता’बाबत बोलतं. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच या संपूर्ण लेखनात एक लय आहे. ताल आहे. सूर आहे. वाचता वाचता वाचकाला थेट म्युझिक कॉन्सर्टला घेऊन जायची ताकद आहे. ‘रॉक’ आणि ‘कंट्री’ संगीताबाबत लिहिताना आशुतोषनं वाद्यांचं वर्णन इतक्या प्रभावी पद्धतीनं केलं आहे, की तुमच्या डोक्यात तो नाद निर्माण होतो. तुम्ही नकळत डोळे मिटता आणि मनानं पोहोचता, थेट त्या संगीत मैफिलीत. तिथे असलेल्या प्रेक्षकांपैकीच एक होता. ज्या गाण्यांविषयी लिहिलं आहे, ती गाणी स्ट्रीम करू लागता. पुस्तक मधेच वाचायचं सोडून दोन-तीनदा ती गाणी ऐकता. तो कैफ उतरला, की मग परत वाचन सुरू करता. जाता जॉन डेन्व्हर सोबत त्याच्या विमानात, शनाया ट्वेन बरोबर जंगलांमध्ये. जाणून घेता तिच्या गाण्यातल्या सशक्त स्त्रीवादाविषयी. मग भेटते मायली सायरस. तिची मधाळ गाणी तुम्हाला ऐकावीशी वाटतातच. परत एखादी विश्रांती घेऊन गाणी ऐकता. ती ऐकताच, तुम्ही येऊन पोहोचता ते हिप-हॉपपर्यंत. ‘कृष्णवर्णियांची निळी जखम’ असं नाव देतो आशुतोष याला. मग भेटतं शरीर प्रणयोत्सुक असं लॅटिन अमेरिकन संगीत. यात ओघानेच भेटते शकीरा, एमिलिओ आणि ग्लोरिआ एस्तेफान, एन्रिके, जे लो आणि बरेच सारे. पॉपबद्दल लिहिताना ‘पुलं’च्या संदर्भामुळे, एकदम वेगळाच फ्लेवर जाणवतो. पॉपच्या प्रकरणात भेटतो बीबर, त्याची आई, त्याचं स्टारडम, मायकेल जॅक्सन, त्याच्या म्युझिक व्हिडियोजमधल्या कल्पना आणि एक्झेक्युशनमागचं आशुतोषचं सखोल अभ्यासातून तयार झालेलं मत. काही व्यक्तींना अरे-तुरे करावं की अहो-जाहो असा मला प्रश्न पडतो. ही अशी नाती फार गमतीदार असतात. या व्यक्तींचं ज्ञान, व्यासंग आणि कर्तृत्त्व इतकं जबरदस्त असतं, की त्यांना अरे-तुरे करायला तुमची जीभ बऱ्याचदा रेटतच नाही. तर कधी गप्पा मारता मारता यांच्याशी समवयस्क मित्राप्रमाणे कनेक्ट व्हायला होतं. तेव्हा त्यांना अरे-तुरे म्हटलं जातं. आशुतोषबद्दल बोलताना, अशी गंमत खूपदा अनुभवायला मिळते. आत्ताही, या लेखात पाहा, मी इतका वेळ अहो-जाहो करत होतो आणि आता अरे-तुरे म्हणतोय. गंमत आहे ना ही? काही व्यक्तिमत्वच गंमतीदार असतात. ज्यांना तुम्ही अरे-तुरे ही करता, मित्राच्या मायेनं, पण त्याच वेळी त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं भान ठेऊन अहो-जाहो ही करता.

अभिजात अशा ‘जॅझ’बद्दलही आशुतोष अतिशय मायेनं लिहितो. कुठेही कंटाळवाणेपणा येऊ न देता त्यामागचं शास्त्र समजावतो. शेवटचं प्रकरणही खूप काही बोलतं. भरभरून माहिती देतं. प्रत्यक्ष भेटीत आशुतोष बोलतो, तसंच! बऱ्याचदा रिसिव्हिंग एंडला असलेल्याची पंचाईत व्हावी इतपत. हा इतकं सगळं सांगतोय, पण मला लक्षात राहिल का हे सारं? असं वाटतं. ती अडचण येऊ नये, याकरताच हे पुस्तक आहे. पुस्तक वाचलं, की तुमचं अनुभवविश्व कैकपटींनी समृद्ध होईल. इतके दिवस एक्सप्लोर करून न बघितलेलं पाश्चात्य संगीताचं विश्व तुम्ही निश्चित उलगडून बघाल. कार्यक्रमांना हजेरी लावायला लागाल. अशा कार्यक्रमांमधला पहिला कार्यक्रम, लयपश्चिमाच असेल कदाचित. त्या तास-दोन तासांत, तुम्हाला हे पुस्तक ऑडियो-व्हिज्युअल स्वरूपात पुन्हा भेटेल. त्यातल्या स्टायलो रॉक, पेपी पॉप आणि अतिशय शालीन अशा जॅझचं कॉम्बो असणाऱ्या सिंगिंग सेन्सेशन आशुतोषसह! आता तुम्ही, नवी गाणी आणि पूर्वी ऐकलेली जुनीच गाणी अधिक लक्षपूर्वक ऐकाल. कान टवकारून. 

शास्त्रीय संगीतातले राग ओळखू येऊ लागले की कशी गंमत वाटते, अगदी तशीच गंमत येते, ती विदेशी संगीतातला आपण आत्ता ऐकतोय तो प्रकार नेमका कोणता? ते ओळखताना. ‘लयपश्चिमा’ हे केवळ एक पुस्तक नाही. ती एक अनुभूती आहे. वाचकाला समृद्ध करणारी. वाचताना गाणं प्रत्यक्ष ऐकल्याचा, संगीत मैफलीत भाग घेतल्याचा अनुभव देण्याची ताकद या लेखनात आहे. आपल्या समवयस्क मित्रानं आपल्या गळ्यात गळा घालून अवघड गोष्टी अत्यंत प्रेमानं सोप्या करून समजावून सांगाव्यात, असं वाटावं, इतकी ही भाषा सुरेख आहे. यात प्रचंड माहिती असली, तरी त्याचं दडपण येत नाही. अनेक चपखल उदाहरणं, दाखले, गाणी, त्यांचे सुरेख असे मराठी भावानुवाद, वाद्यं, वाद्यांचे प्रकार, गायकीची शैली, प्रसिद्ध गायक कलाकारांचे अनेक किस्से, कहाण्या यांच्या सहाय्यानं उलगडणारा आणि सर्वार्थानं सुरेल आणि रम्य असा हा संगीतप्रवास आहे. त्यात माहिती तर आहेच, शिवाय संगीतविषयक बारकावे आहेत. गाणं कसं ऐकावं, कसं पाहावं याबद्दलच्या बहुमोल अशा टिप्पण्णी आणि निरीक्षणं आहेत. गाण्याच्या प्रकारांचा इतिहास व भुगोल आहे. सामाजिक व राजकीय स्थित्यंतरांचा आलेखही आहे. एखाद्या अतिशय हुशार, टॉपर मित्रानं आपल्या सवंगड्यांचा ‘मास्टरक्लास’ घ्यावा, तशा धाटणीचं हे पुस्तक आहे. लयबद्ध, तालबद्ध आणि उत्साहानं भारलेला हा शब्दबद्ध संगीतसोहळा जरूर अनुभवा....

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rashmi kolhatkar Gosavi About 264 Days ago
Apratim
1
0
Priya About 265 Days ago
Sundar lekh
2
0

Select Language
Share Link
 
Search