Next
भारतीय वाद्यसंगीत - भाग ४ : गिटार आणि मोहनवीणा
BOI
Tuesday, August 27, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गिटारसारख्या पाश्चात्य संगीतात लोकप्रिय असलेल्या वाद्यावर हिंदुस्थानी संगीतातले राग वाजवणारे पं. ब्रिजभूषण काब्रा हे पहिले कलाकार. ब्रिजभूषणांची हवाईयन स्लाइड गिटार आणि पं. रविशंकरांनी लोकप्रिय केलेली सतार या दोन वाद्यांचा मिलाफ करून पं. विश्वमोहन भट्ट यांनी मोहनवीणा हे नवीन वाद्य तयार केलं. ‘सूररंगी रंगले’ या सदरात मधुवंती पेठे या वेळी लिहीत आहेत ही दोन वाद्यं आणि त्यांच्या वादकांबद्दल...
..........
गिटार – पं. ब्रिजभूषण काब्रा
१९५० ते १९६०च्या दशकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या वादन क्षेत्रात बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया, संतूरवादक शिवकुमार शर्मा यांच्यासारखे नवनवीन कलाकार रसिकांसमोर येत होते. त्यांच्या समकालीन असलेलं आणखी एक नाव म्हणजे गिटारवादक पं. ब्रिजभूषण काब्रा. 

गिटारसारख्या पाश्चात्य संगीतात लोकप्रिय असलेल्या वाद्यावर हिंदुस्थानी संगीतातले राग वाजवणारे ते पहिले कलाकार. गिटार म्हणजे धांगडधिंगा, गिटार म्हणजे झिंग आणणारं संगीत, गिटार म्हणजे ऱ्हिदमची नशा चढवणारं वादन... ही सगळी समीकरणं ब्रिजभूषण काब्रा यांनी पार बदलून टाकली. 

... पण गंमत म्हणजे हे एवढं क्रांतिकारी कार्य करणारे ब्रिजभूषण यांना लहानपणी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत अजिबात आवडायचं नाही. जोधपूरच्या दरबारी महाराजांचे सल्लागार असलेले त्यांचे वडील दरबारात होणारं गायन-वादन ऐकायला त्यांना नेहमी घेऊन जायचे; पण तेव्हा त्यांना त्यात कधीच रस वाटला नाही. फक्त निरनिराळ्या कलाकारांची नावं कानावर पडायची इतकंच. पुढे त्यांचं अकॅडमिक शिक्षण चालू असताना गिटारच्या आवाजानं त्यांना मोहिनी घातली. वाद्यांच्या दुकानातली हवाईयन गिटार वडिलांनी त्यांना लगेच आणूनही दिली; पण आता पुढे काय?

पं. ब्रिजभूषण काब्राकेवळ कुतुहलापोटी स्वत:च काहीतरी धडपड करून, त्या वेळची लोकप्रिय गाणी वाजवण्याचा ते प्रयत्न करू लागले. ते जमायला लागल्यावर, वडिलांनी त्यांना विचारलं, यावर शास्त्रीय संगीतातले राग वगैरे काही वाजवायला जमतंय का ते बघ. एव्हाना गिटारच्या नादानं (आवाजानं) तर त्यांच्यावर मोहिनी घातली होतीच. मग त्यांनी रागसंगीत शिकायची तयारी दाखवताच वडिलांनी थेट सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांनाच ब्रिजभूषणला शिकवण्यासाठी गळ घातली. जोधपूरच्या दरबारात ते कलाकार म्हणून यायचे तेव्हापासूनची त्यांची ओळख होती. त्यामुळे ते ब्रिजभूषणला शिकवायला तयार झाले. त्यांनी बेसिक थिअरी, स्वरांची ओळख, राग, वादनशैली... सगळं सगळं शिकवायला सुरुवात केली. या समज आलेल्या वयात मात्र ब्रिजभूषण यांना शास्त्रीय संगीत शिकणं आवडू लागलं. दिवसातून १८-१८ तास ते रियाज करू लागले. कालांतरानं त्यांनी मैफलीत गिटारवर रागदारी गती वाजवून दाखवल्या. सतत नावीन्याला आतुर असलेल्या संगीतरसिकांना बासरी, सतार, संतूरप्रमाणेच हा हवाईयन गिटारचा नाद पसंत पडला. त्यांचं कौतुक होऊ लागलं. 

मग मात्र त्यांनी आपल्या वाद्याबद्दल अधिक गंभीरपणे विचार सुरू केला. ते वाजवत होते ती हवाईयन स्लाइड गिटार होती. तिच्या रचनेत त्यांनी प्रयोगात्मक बदल करायला सुरवात केली. 

मुळात गिटारला सहा तारा असतात. त्यात त्यांनी सिम्पथेटिक स्ट्रिंग्ज (अनुनादी तारा) आणि ड्रोन स्ट्रिंग्ज (बास) बसवल्या. त्यामुळे रागसंगीताला आवश्यक असलेली मेलडी आणि स्वरांचा विशिष्ट लगाव त्यांच्या वादनात आणता आला. याच वेळी निघाला तो जगप्रसिद्ध अल्बम... पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी), पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पं. ब्रिजभूषण काब्रा (गिटार) या तिघांच्या वादनानं सजलेला ‘कॉल ऑफ दी व्हॅली’ हा अल्बम. अहिरभैरव, देस, पहाडी, भूप, बागेश्री अशा रागांमधल्या गती-धून त्या अल्बममध्ये तिघांनी वाजवल्या होत्या. पहाडी प्रदेशातल्या मेंढपाळाच्या रोजच्या दिनचर्येची थीम त्यात होती. या अल्बमने देश-विदेशात लोकप्रियता मिळवली. बासरी, संतूर, गिटार या वाद्यांच्या नादांनी रसिकांना वेड लावलं. पाश्चात्य संगीतरसिकांना हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख करून देण्याचे जे प्रयत्न अनेक कलाकारांनी केले, त्यात १९६७मध्ये निघालेल्या या अल्बमचा मोलाचा वाटा होता, असं म्हणायला हरकत नाही. (हा अल्बम यू-ट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)

१९७०च्या दशकापर्यंत हिप्पी संस्कृतीच्या कंपूमध्ये ब्रिजभूषण फिल्मी गाणी वाजवणारे गिटारवादक म्हणून लोकप्रिय होते. आता पाश्चात्य संगीतातल्या गिटारवर हिंदुस्थानी संगीतातले ‘राग’ ऐकायला मिळाल्याने, परदेशातले रसिकही या रागसंगीताच्या प्रेमात पडले. त्यानंतर ब्रिजभूषण काब्रा यांनी, हरिजी, शिवजी यांच्याबरोबरच पं. व्ही. जी. जोग (व्हायोलीन), उस्ताद रईस खाँ (सतार), पं. जसराज (गायन) अशा अनेक समकालीन कलाकारांबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रम केले. १९९०पर्यंत ते कार्यक्रम करत होते आणि २०१८मध्ये वयाच्या ८१व्या वर्षापर्यंत शिष्यांना शिकवतही होते. 

मोहनवीणा

मोहनवीणा - पं. विश्वमोहन भट्ट

पं. ब्रिजभूषण काब्रा यांनी गिटारला हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात स्थान मिळवून दिलं, त्याचाच पुढचा प्रवास म्हणजे १९८०च्या दशकात जयपूरच्या पं. विश्वमोहन भट्ट यांची केलेली ‘मोहनवीणे’ची निर्मिती.... 

ब्रिजभूषणांची हवाईयन स्लाइड गिटार आणि पं. रविशंकरांनी लोकप्रिय केलेली सतार या दोन वाद्यांचा मिलाफ म्हणजेच ही नवीन मोहनवीणा. आणि वादनशैली पूर्वीपासून चालत आलेल्या वीणावादनासारखी. त्यामुळेच मींडकाम हे या वाद्याच्या वादनाचं मुख्य वैशिष्ट्य. ही मोहनवीणा सतारीप्रमाणे उभी न धरता, मांडीवर आडवी घेऊन (lap style) वाजवली जाते. 

पं. विश्वमोहन भट्ट

पं. विश्वमोहन भट्ट यांनी मोहनवीणा या नवीन वाद्याची निर्मिती करताना हवाईयन स्लाइड गिटारला वरच्या बाजूला सतारीसारखा भोपळा बसवला. मूळ वाद्याच्या नादाचं गुंजन वाढवण्यासाठी हा बदल होता. शास्त्रीय संगीतातले राग वाजवताना विशिष्ट रागासाठी जो विशिष्ट पद्धतीनं स्वरलगाव लागतो, त्यासाठी काही तारा अधिक लावल्या. गिटारच्या मूळ सहा तारांबरोबर तीन तारा मेलडीसाठी (ट्रेबल), चार तारा बाससाठी (ड्रोन स्ट्रिंग) वाढवल्या. मूळ तारांचा नाद खुलवण्यासाठी, सतारीसारख्या बारा अनुनादी तारा (तरफा) लावल्या. जो राग वाजवायचा, त्याप्रमाणे या बारा तारांचं ट्युनिंग करतात. त्यामुळे वादनात त्या रागाची परिणामकारकता वाढते. या स्वत:च्या नवनिर्मित वाद्याला त्यांनी नाव दिलं ‘मोहनवीणा.’ खरोखरच रसिकांनाही या नवीन वाद्याच्या नादानं (आवाजानं) मोहून टाकलं होतं. 

१९९३मध्ये त्यांच्या ‘ए मीटिंग बाय दी रिव्हर’ या अल्बमला ग्रॅमी ॲवॉर्ड मिळाला. हे त्यांच्या मोहनवीणेच्या रचनात्मक बदलाचं यश आहे. अजूनही जगभर त्यांच्या मोहनवीणेचा नाद दुमदुमत आहे. (सादरीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(पं. विश्वमोहन भट्ट यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search