Next
स्वराज्याची राजधानी – रायगड!
BOI
Saturday, June 15, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

रायगड किल्ल्याचे हवाई दृश्य

‘करू या देशाटन’
सदराच्या आजच्या भागापासून आपण माहिती घेऊ या रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची. आजच्या पहिल्या भागात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा फेरफटका.
............
रायगड जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते. बॅ. अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी जिल्ह्याला ‘रायगड’ हे नाव दिले. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजे किल्ले रायगड या जिल्ह्यातच आहे. हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. वैशिष्ट्यपूर्ण सागरकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, जलदुर्ग, गिरिदुर्ग, बंदरे, पुरातन मंदिरे, अष्टविनायकापैकी काही गणपती मंदिरे, पुरातन गुंफा, शिल्पसमृद्ध लेणी, औद्योगिक वसाहती, मिठागरे व गिरिस्थाने यांमुळे हा जिल्हा सर्व बाबतींत समृद्ध आहे. रायगड जिल्ह्याची पश्चिम सीमा म्हणजे अरबी समुद्र, तर पूर्व बाजू म्हणजे सह्याद्री पर्वतावरील पुणे, सातारा हे जिल्हे. उत्तरेस ठाणे, मुंबई, तर दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमाप्रदेशालगत सह्याद्री पर्वत उत्तर-दक्षिण पसरलेला असून या सह्याद्रीच्या रांगा ओलांडून पुणे, सातारा जिल्ह्यात जायचे झाल्यास भीमाशंकर, सावळा, कुसूर, बोर, लिंगा, कुंभा, कवळ्या, शेवत्या, वरंधा, ढवळा व पार हे घाट पार करून जावे लागते. माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, आचार्य विनोबा भावे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके असे अनेक सुपुत्र या भागात जन्माला आले. त्यामुळे रायगडाला सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील लाभली आहे. 

इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात या प्रदेशावर मौर्यांची राजवट होती. नंतर शिलाहार, निजाम, विजयनगर, आदिलशाही, मोगल, हबशी, पोर्तुगीज, मराठे व अखेर इंग्रज अशा अनेक राजवटी या भागाने पाहिल्या. आदिमानवाचे अस्तित्वही या भागात आढळून आले आहे.

रायगड तटबंदी

किल्ले रायगड :
ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड-सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची संरक्षक फळी रायगडाभोवती उभी आहे. शिर्के घराणे हे यादव काळात उत्तर कोकणाचे सुभेदार होते व रायगड त्यांच्या आधिपत्याखाली होता. शिर्के हे तोमर घराण्यातील होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. त्याच वेळी शिरकाईदेवीचे मंदिर बांधले असावे. हा किल्ला पुरातन असला, तरी त्याचा प्रथम उल्लेख विजयनगरच्या इतिहासात झाला आहे. बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचे निवासस्थान होते. चौदाव्या शतकात या पाळेगारांनी विजयनगरचे मांडिलकत्व पत्करले. इ. स. १४३६मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमनीशाहने तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आदिलशाहीत हा किल्ला जावळीच्या मोऱ्यांकडे होता. शिवाजी महाराजांनी सहा एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. महाराज १६६७मध्ये किल्ले रायगडावर आले व तेथून त्यांनी कारभार सुरू केला. प्रत्यक्ष राजधानीच्या कामाचा आदेश त्यांनी १६७०मध्ये दिला. म्हणजे त्यापूर्वी गडावर जुन्या इमारती असाव्यात. तेथे असतानाच कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. 

रोप-वे

किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर हिरोजी इंदुलकर/इटलकर यांनी किल्ल्याची बांधणी केली. त्यांनी केलेल्या बांधकामाचा शिलालेखही आहे. त्या वेळी आबाजी सोनदेव हे सुभेदार होते. या कामी पन्नास हजार होन खर्च करण्यात आला. तिथे तीन-चार वर्षांत लहानमोठ्या तीनशे वास्तू बांधण्यात आल्या. एखाद्या नगररचनाकाराने करावी तशी राजधानीची योजना होती. बारीकसारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करूनच गडावरील इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यांनी हिरोजींवर विश्वासाने गडाचे बांधकामाची जबादारी टाकली होती. महाराजांच्या मोहिमा चालूच होत्या. त्यांचा मुक्काम कायम रायगडावर नव्हता. मोहिमा संपल्यावर ते किल्ल्यावर परत येत असत, पुन्हा मोहिमेवर जायचे, असे चालू असायचे. थोड्या मुक्कामात बांधकामाची प्रगती पाहत असत. काम पूर्ण झाल्यावर छत्रपती शिवाजीराजे बेहद्द खूश झाले आणि त्यांनी हिरोजीला सांगितले, की या गडावर कोणत्याही एका ठिकाणी तू तुझे नाव लिहावेस आणि स्मृती जतन कराव्यात. म्हणूनच त्यांनी जगदीश्वराच्या पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले ‘सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर.’ 

हिरोजींची पायरी

या किल्ल्याला रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशा १५ विविध नावांनी ओळखले जायचे. रायगडावर रोप-वे झाल्यापासून किल्ला चढून जाणे हा प्रकार कमी झाला आहे. अर्थात काही वेळा एवढी गर्दी होते, की चालत जाणे उपयुक्त ठरते. चालत जाण्यासाठी सकाळची वेळ उत्तम. सकाळी सहा वाजता किंवा त्याही अगोदर येण्याचे नियोजन करावे. किल्ला चढताना सावकाश चढल्यास एक ते दीड तासात वर जाता येते. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनी रोप-वेचा पर्याय निवडावा. जाताना रोप-वेने गेल्यास येताना तरी पायी गड उतरावा. 

जिजाऊंची समाधी

पाचाड कोट :
वयोमानाप्रमाणे राजमाता जिजाऊंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे. म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी गडाच्या पायथ्याशी पाचाडजवळ एक वाडा बांधला होता. आता त्याचे फक्त जोते शिल्लक आहे. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी, तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. येथे पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन आहे. त्यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात. पाचाड कोटात असलेल्या जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घ्यावे व वाटचाल सुरू करावी. रोप-वेने जाणाऱ्यांनी रोप-वेकडे जावे व ज्यांना पायी जायचे आहे, त्यांनी चितदरवाज्याकडून जावे. 

रायगड संग्रहालय

रायगड संग्रहालय :
पाचाडपासून दोन किलोमीटरवर रोप-वे जिथे सुरू होतो, तेथे एक सुंदर संग्रहालय उभारण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व निनाद बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय पर्यटन विकास महामंडळामार्फत १५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. येथे अनेक शस्त्रे, शेतीची अवजारे, ऐतिहासिक वस्तू व छायाचित्रे, तसेच शिवकालीन इतर किल्ल्यांची छायाचित्रे व माहिती देण्यात आली आहे. एका लघुचित्रपटाद्वारे माहितीही सांगितली जाते. 

चितदरवाजा : पाचाड खिंडीतून चालत पुढे आल्यावर एके ठिकाणी प्रागैतिहासिक (अश्मयुगीन) मानवाच्या अस्तित्वाची खूण मिळते. किल्ला चढण सुरू करतानाच पुढील बाजूस पाचाड खिंडीतच अवघ्या चार-पाच मिनिटांच्या चढणीवर ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ नावाची एक गुहा आहे. ट्रेकर्स या गुहेला ‘गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणतात. या गुहेतील दोन मोठ्या खिडकीवजा झरोक्यातून पाचाडपासून जवळ असलेल्या रस्त्यावर नजर ठेवता येत असे. येथे आदिमानवाचे अस्तित्व होते. जवळच चितदरवाजाचा फलक आहे; मात्र आता येथे दरवाजा नाही. चितदरवाजाला लागूनच खूबलढा बुरुज आहे. येथूनच किल्ल्याची चढण सुरू होते. रायगडावर जाण्यासाठी १४५० पायऱ्या चढून जावे लागते. 

नाणे दरवाजा : या दरवाज्याला ‘नाना दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ. स. १६७४च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाज्याने आला होता. या दरवाज्याला दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाज्यास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. 

मदारमोर्चा : याला मशीदमोर्चा असेही म्हणतात. चितदरवाजाने वळणावळणाने पुढे गेल्यावर पुढे गेल्यावर थोडी सपाटी लागते. येथील मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांसाठीची जागा असून, दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा आहेत. 

महाद्वार

महादरवाजा :
महादरवाज्याच्या बाहेरील बाजूस वर दोन्ही बाजूंना ‘श्री आणि सरस्वती’चे प्रतीक असलेल्या कमळाकृती कोरलेल्या आहेत. महादरवाज्याला दोन भव्य बुरुज असून, एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात, त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उत्तरेस उजवीकडे टकमक टोकापर्यंत, तर दक्षिणेस हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. 

नगारखाना

चोरदिंडी :
महादरवाज्यापासून टकमक टोकापर्यंची तटबंदी जेथे संपते, त्याच्या थोड्या अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाज्यापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. 

हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावातील पाण्याचा उपयोग होत होता. हत्ती तलावाच्या पुढे मदारशहाची कबर आहे. 

गंगासागर तलाव

गंगासागर तलाव :
रायगडावरील जलव्यवस्थापन हा एक अभ्यासाचा विषय आहे. रायगडावर आठ छोटे-मोठे तलाव आहेत. राजधानी असल्यामुळे लांबलांबच्या राजांचे दूत, व्यापारी यांची सतत वर्दळ होती. तसेच कायम राहणारे कामगार, सैनिक, अधिकारी, मंत्री, राजघराण्यातील व्यक्ती, त्यांचे सेवक यांची निवासस्थाने येथे होती. या सर्वांना लागणाऱ्या पाण्याचा विचार केला होता. यापैकी गंगासागर हा सगळ्यात मोठा तलाव आहे. १०-१५ वर्षांपूर्वी हा तलाव संशोधनासाठी उपसण्यात आला होता. त्या वेळी पाच-सहा दिवस पाणी कमी होत नव्हते. त्यावरून त्याच्या नैसर्गिक स्रोतांची कल्पना येते. 

शिवराज्याभिषेकाच्या वेळी सुमारे लाखभर लोक आले होते. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसरितांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे नाव गंगासागर असे पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई. त्या काळात दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले. या पर्जन्यमापकाची कोणालाच माहिती नव्हती. इतिहासाचे आणि रायगडाचे अभ्यासक व संशोधक गोपाळ चांदोरकर (आर्किटेक्ट) यांना ते पहिल्यांदा दिसले. 

हिरकणी बुरुज : गंगासागर तलावाच्या उजवीकडे पश्चिमेला छोट्या वाटेने येथे जाता येते. या हिरकणी बुरुजाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. येथे काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले, तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खूबलढा बुरूज, मशीदमोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या, तसेच लढाईच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे. मनोरे/स्तंभ :
गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यांनाच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाचमजली होते असे म्हणतात. ते बारा कोनी असून, बांधकामात नक्षीकाम आढळते. मनोऱ्याच्या पश्चिमेस ३१ पायऱ्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा पालखी दरवाजा लागतो. 

पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. पालखी दरवाज्याने वर गेल्यावर मेणा दरवाजा लागतो. 

मेघडंबरी

बालेकिल्ला :
पूर्वेकडून महाद्वाराने आत शिरल्यावर समोरच दिसतो तो सिंहासनाचा चौथरा (दिवाणे खास) व त्यावर अलीकडे बसविलेली मेघडंबरी. १९८५मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी या मेघडंबरीचे अनावरण केले. तेव्हा त्यात पुतळा नव्हता. तो नंतर बसवण्यात आला. शिवाजी महाराजांचे सिंहासन त्या जागी होते. म्हणून ती जागा मेघडंबरी बसवण्यासाठी निवडण्यात आली असावी. डावीकडील चौथरा व महाद्वार यांच्यामधील जागेमध्ये दोन जोती आहेत. त्यापैकी मोठ्या जोत्यावर राज्याभिषेक सोहळा झाला. याला ‘दिवाणे आम’ म्हणतात. महाद्वाराच्या उजव्या बाजूला एक खडक व विहीर आहे. सिंहासनाच्या दक्षिण बाजूला नजराण्याची खोली होती. राजसभेच्या डाव्या कोपऱ्यात पश्चिमेला पालखी दरवाजा. त्याच्या मागे राणीवसा स्नानगृहे व त्याच्या मागे मुदपाकखाना, पश्चिम बाजूस महाराजांचे निवास्थान, त्या मागे ओवऱ्या व कचेऱ्या (कार्यालये) होत्या. तसेच महाराजांचे निवासाच्या दक्षिणेसही कचेऱ्या होत्या. बालेकिल्ल्यातील सांडपाणी निचरा करण्याची व्यवस्था उल्लेखनीय आहे. स्वच्छतागृहामध्ये संडास भांडेही वापरले होते. तसेच व्हेन्ट पाइपही दगडात खोदलेले आढळून येतात. त्यावर झाकणेही आहेत. बालेकिल्ल्यात खजिना, सराफकट्टा, रत्नशाळेसाठीही महाराजांच्या निवासाच्या उत्तरेस व्यवस्था होती. 

कोणत्याही इमारतीमधील वापर अनेकदा परिस्थितीनुरूप, तसेच वापरणाराच्या इच्छेनुसार बदलत असतो. त्यामुळे पर्यटकांनी राणीवसा, कचेऱ्या यांचे घोळात पडू नये. सर्व लेखकांच्या, संशोधकांच्या मते सिंहासन व राजसभेबाबत फारसे दुमत दिसत नाही. त्यामुळे जेथे राज्याभिषेक झाला ती जागा व राजे जेथे बसून कारभार करीत ती मेघडंबरीची जागा येथे नतमस्तक व्हावे. 

शिवाजी महाराजांचा पुतळा

शिवाजी महाराजांचा पुतळा :
बालेकिल्ल्याच्या महाद्वारातून डावीकडे निघाले, की कोपऱ्यावर होळीचा माळावर सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन केला आहे. बालेकिल्ल्यात पुतळा बसविण्यास त्या वेळी परवानगी मिळाली नाही. म्हणून हा पुतळा येथे बसविण्यात आला आहे. 

शिरकाई मंदिर : ही किल्ल्याची मूळ देवता. तुळजाभवानीचे हे मंदिर अगोदर शिर्के यांच्या कालावधीमध्ये बांधले गेले. मातेसमान असलेली देवी म्हणून ते शिरकाई असे म्हणत. मूळ मंदिर अस्तित्वात नाही. सध्याचे मंदिर नंतर बांधले गेले. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळीच्या माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूने खालच्या बाजूला गंगासागराच्या पूर्वेस हे मंदिर आहे. पर्जन्यमापक :
बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस थोडे खालच्या बाजूस अष्टप्रधानांचे निवास होते. त्याचे थोडे पुढे कुशावर्त तलाव असून, तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहे. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतील नंदी आहे. तेथेच शिवकालीन पर्जन्यमापक आहे. येथे एक टाके असून, छपराला तीन छिद्रे आहेत. झरोक्यातून आलेले पाणी मोजून पर्जन्यमाप घेण्याची पद्धत होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्राप्रमाणे एका द्रोणामध्ये दोन इंच पाऊस होतो. हे विस्ताराने समजून घेण्यासाठी आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकर यांची पुस्तके वाचावी. (गोपाळ चांदोरकर यांची रायगडासंबंधीची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 

अष्टप्रधान निवासाच्या दक्षिण-पूर्वेस पोटल्याचा डोंगर आहे. येथूनच इंग्रजांनी किल्ल्यावर सन १८१८मध्ये तोफांचा मारा केला व दारूगोळा आणि धान्याची कोठारे उडवून दिली. हा किल्ला दुसऱ्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिने अखेरच्या क्षणापर्यंत लढविला. 

वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून खालच्या बाजूला उतरून वाघ दरवाज्याकडे जाता येते. किल्ला बांधतानाच आज्ञापत्रात लिहिले आहे,  -‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाज्याशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले, तरी दोर लावून खाली उतरू शकतो. झुल्फिकारखानाचा वेढा फोडून राजाराम महाराज व त्यांची मंडळी याच दरवाज्याने निसटली होती. 

बाजारपेठ

बाजारपेठ :
महाराजांच्या पुतळ्यापासून उत्तर-पूर्व बाजूस बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ का कचेऱ्या, याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आहे. बाजारपेठेच्या मागे नाट्यगृह होते. नाट्यगृहाच्या उत्तर-पूर्व बाजूस हनुमान टाके आहे. त्याच्या उत्तरेस किल्ल्यावरील लोकांची वसाहत होती. वसाहतीच्या डावीकडे धान्याची कोठारे व पुढे टकमक टोक आहे. 

टकमक टोक

टकमक टोक :
या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. बाजारपेठेच्या उत्तर-पूर्व बाजूला टेपावरून खाली उतरून हनुमान टाक्यावरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच दारूगोळ्याच्या एका कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे, तसतशी वाट निमुळती होत जाते. उजव्या बाजूसच सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे तोल जाण्याची शक्यता असते. 

जगदीश्वर मंदिर

जगदीश्वर मंदिर :
बाजारपेठेच्या उत्तरेकडील टोकाकडून उजवीकडे पूर्वेस आहे ते गडावरचे प्रसिद्ध जगदीश्वर मंदिर. जगदीश्वराच्या पायऱ्यावर हिरोजी इंदुलकर/इटलकर यांच्या नावाचा ‘सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’ असा शिलालेख आहे. मंदिरासमोर भग्रावस्थेतील नंदीच्या भव्य आणि सुबक मूर्तीचे दर्शन होते. मंदिरात सभामंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीला हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. त्याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे – ‘सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला गेला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आदींची उभारणी केली आहे. ती चंद्र-सूर्य असेतोवर खुशाल नांदो.’ 

जगदीश्वर मंदिरातील शिलालेख

मंदिराच्या पूर्वेस दहनभूमी व पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. तेथे सैनिकांची राहण्याची व्यवस्था होती. त्याच्या पुढे काळा हौद, दारूची कोठारे आणि बारा टाकी दिसतात. सैनिकांच्या वस्तीपासून बाजूला असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ. स. १६७४मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. येथून पूर्वेकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन होते. 

शिवरायांची समाधी

महाराजांची समाधी :
मंदिराच्या पूर्वेकडील दरवाज्यापासून थोड्या अंतरावर अष्टकोनी चौथरा आहे. येथेच महाराजांचे अंत्यसंस्कार झाले. या जागी महाराजांची समाधी बांधण्यात आली. सभासदाच्या बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून, वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ 

जगदीश्वर मंदिर व शिवरायांच्या समाधीचे हवाई दृश्य

वाघ्या कुत्र्याची समाधी :
असे बोलले जाते, की शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार सुरू होते, तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली. त्याचे स्मारकही जवळच बांधले आहे. 

आज (१५ जून २०१९) ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. शिवशकाची सुरुवात आजच झाली. तिथीप्रमाणे राज्याभिषेक आजच झाला. योगायोगाने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर रायगडाची माहिती आज प्रसिद्ध होत आहे. 

(रायगड किल्ल्याच्या स्थापत्य इतिहासासंदर्भातील विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suryakant Gaikwad About 45 Days ago
Very nice information So satisfied...
0
0
Smita jadhav About 65 Days ago
खूप छान माहिती मिळाली
0
0
Nilkanth Patil About 70 Days ago
Good work. Keep it up.
1
0

Select Language
Share Link
 
Search